
मुंबई : सिनेविश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. १० नोव्हेंबर रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. त्यावेळी देखील धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी समोर आली होती. पण ती अफवा असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. पण आज (२४ नोव्हेंबर) रोजी त्याचं निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. विलेपार्ले स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
दरम्यान, धर्मेंद्र यांना डिस्चार्ज दिल्यानंतर जुहू येथील त्यांच्या निवासस्थानीच पुढील उपचार त्यांच्यावर करण्यात आले होते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली होती. पण आता धर्मेंद्र यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्याने सिनेविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक दशके सातत्याने ते सिनेविश्वाशी जोडलेले होते.
धर्मेंद्र यांचा चुलत भाऊ आणि निर्माते गुड्डू धनोआ यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “ते ठीक आहेत. यापेक्षा अधिक मी काही बोलू शकत नाही. मला तेवढी माहिती नाही. पण ते ठीक आहेत आणि त्यांची प्रकृती हळूहळू सुधारतेय.” पण आज सकाळी धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली.
धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यात अनेक सुपरहीट सिनेमांचा समावेश आहे. 'शोले', 'चुपके चुपके', 'सत्यकाम', 'सीता और गीता' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं. धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या मनात कायम जिवंत राहतील.