आधुनिक धन्वंतरींचा दीपस्तंभ

24 Nov 2025 12:08:39

आधुनिक युगात वेद, संस्कृती आणि आयुर्वेदाचा विसर पडत असताना आरोग्य, संस्कार आणि योग्य आहाराचे महत्त्व पुन्हा जागवण्याचे काम करणारे वैद्य डॉ. अजिंक्य नेरली यांच्याविषयी...

तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात जेव्हा माणूस स्वतःपासून, संस्कारांपासून आणि निसर्गापासून दूर जात चालला आहे; तेव्हा या धकाधकीच्या प्रवाहात शांत, स्थिर, आणि वेदज्ञानाची मशाल हातात घेऊन, काहीजण समाजजागृतीसाठी पुढे सरसावतात. पुण्यातील वैद्य डॉ. अजिंक्य नेरली यांचे व्यक्तिमत्त्व, हे त्यापैकीच एक म्हणायला हवे.

कौटुंबिक पार्श्वभूमी ही वैद्यकीयक्षेत्राची असल्याने, बालपणापासूनच डॉ. अजिंक्य नेरली यांच्यावर आयुर्वेदाची मोहिनी आणि रुग्णसेवेची प्रेरणा मनावर बिंबवली गेली. डॉ. नेरली यांचे मामा रुग्णसेवाच करत. त्यावेळी रुग्णसेवेनंतर रुग्णांच्या चेहऱ्यावर असणारा समाधानाचे तेज, डॉ. अजिंक्य बारकाईने टिपत होते. ‌‘मानवाची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा‌’ हे ब्रीद, अगदी बालपणीच त्यांच्या मनावर कोरले गेले. लहानपणीच आपल्या कुटुंबातील अनुभवातून अजिंक्य यांनी, वैद्यकीय सेवेचे बाळकडू घेतले. दहावीला असतानाच अजिंक्य यांनी, आपली आयुष्यातील दिशा ठरवली. आयुर्वेद, सेवा आणि संस्कार याचा वसा आयुष्यभर जपण्याचा प्रणच त्यांनी केला असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. गोव्यात आयुर्वेदाचे शास्त्रशुद्ध शिक्षण पूर्ण झाल्यावर, अजिंक्य यांनी पुण्यात पुढील वाटचाल करण्याचे निश्चित केले.

पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात. त्यामुळेच शिक्षणासाठी लाखो तरुण आजही या शहराकडे येताना दिसतात. दुसरीकडे पुणे शहराची सांस्कृतिकताही चर्चेचा विषय असतो. हाच सांस्कृतिक वारसा आणि बालपणाच्या आठवणी, अजिंक्य यांना पुण्याकडे जाण्याबाबत खुणावत होत्या. पुण्यात येताच अजिंक्य यांनी शहरातील नागरिकांमध्ये आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करण्यास प्रारंभ केला. ‌‘वेद‌’, ‌‘उपनिषद‌’, ‌‘लोक‌’ हे केवळ ग्रंथ नाहीत, तर जीवन जगण्याचे मार्गदर्शक आहेत, हे अजिंक्य अगदी सहज सोप्प्या भाषेत पटवून देतात.

आजच्या धकाधकीच्या जीवनात चुकीचा आहार, अनियमित विश्रांती आणि झटपट उपाय शोधण्याची सवय वाढली आहे. पण अजिंक्य यांची या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. ‌’तत्काळ आराम नव्हे, तर मुळापासून आरोग्य‌’ या विचारावर त्यांनी भर दिला. रुग्ण कोणताही असो, ग्रामीण-शहरी, तरुण किंवा ज्येष्ठ, ते प्रथम त्यांचे मन जिंकतात. त्यांच्याशी मायेने बोलतात. संवादातून अर्धा आजार दूर होतो, असे अजिंक्य यांचे ठाम मत आहे. त्यानंतर ते आजाराचे कारण आणि त्याची मूळ समस्या, तसेच बरे होण्याचा नैसर्गिक मार्ग रुग्णाला सहजपणे समजावून सांगतात.

अजिंक्य म्हणतात, “आयुर्वेदानुसार, योग्य आहार हा स्वभाव आणि मनावरदेखील परिणाम करतो. आपण काय खातो, तसाच आपला विचार घडतो. सकाळी उठल्यापासून, दिनक्रमात आपल्या श्रद्धा असणाऱ्या देवतेचे स्मरण, कृतज्ञता आणि चांगले संस्कार रुजवले, तर निम्मे मानसिक-शारीरिक आजार आपोआप कमी होतात. भारतीय संस्कृती हीच सर्वोत्तम आरोग्यसंहिता आहे.”

पुण्यातील शहरी भागात जनजागृती करण्यावरच अजिंक्य थांबत नाहीत. ते खेड्यापाड्यांत जाऊनही आरोग्य, आहार आणि संस्कृतीचा जागर करतात. आयुर्वेदाचा जनजागर ही मोहीमच त्यांनी हाती घेतली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य उपचाराची गरज अधिक जाणवते. हे लक्षात आल्यावर अजिंक्य अधिक गतीने त्या दिशेने कार्यरत झाले आहेत. ते म्हणतात, “सुस्पष्ट भाषेत सांगितलेल्या आहारामुळे, सांगोपांग निर्देशांमुळे जनतेला आपल्या चुकांची जाणीव होते आणि बदलाची बीजे पेरली जातात.” शेतकऱ्यांसाठी तर ते विशेष कार्य करतात. औषधी वनस्पतींची लागवड, रसायनमुक्त शेती आणि निसर्गाशी एकरूप शेतीपद्धती यावरही ते मार्गदर्शन करतात. कारण चांगला आहार शेतातूनच तयार होतो. ‌’शेतकरी समृद्ध तर आरोग्य समृद्ध‌’ असा अजिंक्य यांना ठाम विश्वास आहे. गोवा, कर्नाटक, नाशिक, मुंबई अशा अनेक भागांत त्यांनी, समुपदेशन शिबिरे घेतली आहेत.

अजिंक्य यांचा औषधे घरच्या घरी बनवण्याचा आग्रह, हा त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. ही औषधे अधिक प्रभावी आणि आरोग्यमयी होण्यासाठी, ते तेवढेच सखोल संशोधनही करतात. पुस्तके वाचणे, कोणत्याही गोष्टीच्या खोलात शिरून त्याचा अभ्यास करणे, या सवयीचा फायदाच डॉ. अजिंक्य यांना वैद्यकीयक्षेत्रात होत आहे. यासाठी ते सातत्याने विविध आजारांवरील पुस्तके, प्राचीन आणि महत्त्वाची वनस्पतिशास्त्राची पुस्तकांचे वाचम करत असतात. त्यासाठी ते विविध तज्ज्ञांचीही भेट घेऊन, त्यांच्याकडून वनस्पतींची योग्य माहिती घेतात. तसेच औषध तयार करत असताना, विविध प्रयोगही करून बघतात. रुग्णांना देताना योग्य तेच द्यायचं आणि त्यांचा आजार मुळापासून संपवायचा, हेच अजिंक्य यांचे धोरण आहे.

अजिंक्य यांना वाटते की, आज प्रत्येक घरात एक छोटेखानी आयुर्वेदिक औषधालय असावे. औषध तयार करणे म्हणजे फक्त पद्धत नव्हे, तर शुद्ध हेतूची साधना असल्याचे ते आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतात. रुग्णसेवेचा नवा आदर्श घडवण्यासाठी ते तरुणांना प्रोत्साहित करतात. आज जेव्हा समाज झपाट्याने आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे, तेव्हा वैद्य अजिंक्य नेरली हे परंपरा आणि विज्ञानाचा सेतू बांधण्यात व्यस्त आहेत. वेदज्ञान, संस्कृती, आयुर्वेद आणि मानवता या चार आधारस्तंभांवरच त्यांनी, एक निरोगी समाज घडवण्याचे व्रत घेतले आहे. त्यांचे हे व्रत सुफळ संपूर्ण होण्यासाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!

Powered By Sangraha 9.0