बालनाट्य आणि तारखा

23 Nov 2025 12:45:23
 
Stage
 
तारीख पे तारीख, ‘तारीख पे तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलॉर्ड. मिली है तो सिर्फ ये तारीख!’ हे वाय वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर दिसत असेल तो, ‘सनी पाजी’चा आवेश आणि ‘दामिनी’ सिनेमातला कोर्टरूम ड्रामा. कोर्टातल्या या वकिलाला न्याय न मिळाल्यामुळे तो बिथरला आहे, चेकाळला आहे, किंचाळून सांगतोय की मला न्याय द्या, तारीख नको. कोर्टरूम ड्रामामध्ये त्याचा हा केविलवाणा प्रयत्न तारखांसाठी नसून, न्यायासाठी आहे. मला सनी पाजी आणि माझ्या अवस्थेमध्ये साम्य जाणवतं. फरक एवढाच की, त्याला हवा आहे न्याय आणि मला हवी आहे तारीख!
 
कोर्टरूम ड्रामा असो किंवा असो बालनाट्य, तारीख महत्त्वाची. जर तारीखच मिळाली नाही, तर मिलॉर्ड तरी काय करतील! त्यामुळे मत मांडायचं असेल, तर तारीख हवीच. आता तारीख न मिळाल्यामुळे बालनाट्यावर अन्याय होतो आहे का? हे वाचकांनी हा लेख वाचून ठरवावं. बालनाट्य सादर करण्यासाठी काय लागतं हो? मानसिक आणि भावनिक तयारीविषयी आपण बोलायलाच नको. न्यायलयात सिद्ध होईल अशा भाषेत बोलायचं झालं, तर तांत्रिकदृष्ट्या लागतात ते नाट्यगृह, प्रेक्षक आणि बालकलाकार. यातही महत्त्वाचं असतं ते नाट्यगृह. जर नाट्यगृहच मिळालं नाही, तर प्रेक्षक आणि बालकलाकार असून काय उपयोग? सगळा खेळ हा तारखांवर आहे. सध्या व्यावसायिक नाट्यव्यवसायाला उधाण आलं आहे. रोजच्याला एक अप्रतिम कलाकृती निर्माण होत आहेत. वर्तमानपत्रातलं एक संपूर्ण पानच, नाटकांच्या जाहिरातींनी भरलेलं आपल्याला दिसतं. त्यातल्या प्रत्येकाला तारीख मिळालेली आहे. कोणाला उत्तम तारीख मिळाली आहे, कोणाला चांगली, तर कोणाला वाईट. यात निर्माते एकतर आपलं नशीब आजमावताहेत, नाहीतर उत्तम तारीख मिळवण्यासाठी लढत आहेत. बालरंगभूमीवर सातत्याने काम करणारी निर्माती म्हणून, मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे.
 
प्रेक्षक यावेत आणि बालकलाकारांची कलाकृती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी म्हणून, उत्तम नाट्यगृहात, उत्तम वेळेवर, उत्तम तारीख मिळणं आवश्यक आहे. त्याकरता निर्माती म्हणून प्रथम कर्तव्य हे की, या तीनही गोष्टी मला साध्य करता याव्यात. याकरता कष्ट, प्रयत्न मी करत असते, कोणताही निर्माता करेलच. माझ्या अनुभवातून उत्तम तारीख ही शनिवार-रविवारची असते, कारण या दिवशी जास्तीत जास्त प्रेक्षक येऊ शकतात. प्रेक्षक आले तर आर्थिक गणितसुद्धा साधता येतात. ही सगळी कसरत वाटते तितकी सोपी नाही. कारण बालनाट्याला पूर्णतः व्यावसायिक दर्जा नसल्यामुळे, बालनाट्य निर्मितीला प्राधान्य दिलं जात नाही. नाटक व्यावसायिक नसलं, तरीसुद्धा आमची नाटकं व्यावसायिक पद्धतीनंच बसवली जातात. बालरंगभूमी ही व्यावसायिक रंगभूमीची महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे नाट्य निर्मितीपासून ती लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंतचे सगळे पैलू, मुलांना त्यांच्या आकलनशक्तीप्रमाणे शिकवले जातात. त्यामुळेच आपण बालनाट्य करत असल्यानेच, आपल्याला उत्तम वेळ आणि तारीख मिळणार नाही हे मुलांना सांगायला मला आवडत नाही.
 
एक निर्माती आणि रंगभूमीची कलाकार म्हणून मला हे पटतं की, व्यावसायिक नाटक आणि त्यात काम करणार्‍या कलाकारांचं पोट त्याच्यावर आहे; पण मला हेही प्रकर्षाने दिसतं की, उद्याचा कलाकार आणि प्रेक्षक निर्माण करण्याचं काम बालरंगभूमीचंही तितकंच आहे. बालरंगभूमीवर काम करणार्‍या निर्मात्याचं, त्यात काम करणार्‍या कलाकारांचं पोट जरी त्यावर अवलंबून नसलं, तरी उद्याच्या रंगभूमीचं भवितव्य आजच्या बालरंगभूमीवर निश्चितच अवलंबून आहे. आजच्या ‘जेन झी’ कलाकाराला नको आहे तात्पुरते पडदे, तकलादू रंगमंचावर काम करणं. त्यांना हवी आहे; आधुनिकता, स्वच्छता, सुबकता. आजच्या पिढीला नाही आवडत मोडका रंगमंच, भारतीय बैठक आणि चार उभ्या माइक समोर ओरडून-ओरडून वाय म्हणायला, आणि का म्हणून आवडेल! त्यांनीही तितयाच प्रामाणिकपणे, तल्लीन होऊन जर नाटकाच्या तालमी केल्या असतील, तर त्याचं सादरीकरण तसंच उत्तम सोयीसुविधा असलेल्या नाट्यगृहात, हाऊस़फुल्ल प्रेक्षकांसमोर व्हावं असं वाटतं; पण तारखा मिळणं अवघड काम आहे. एकदातर मला पुण्यातल्या नाट्यगृहातल्या व्यवस्थापकाकडून चक्क सांगण्यात आलं आहे की, "तुला उत्तम तारीख नाही मिळणार. कारण तू बालनाट्य करतेस.” हे वाय हृदयाला चिरणारं होतं.
 
सरकारनं बालनाट्यासाठी वेळ ठरवून दिलेली आहे, सकाळी ९ ते ११. ही आणि हीच वेळ आहे बालनाट्याची. इतर वेळेत करता येत नाही असं नाही; पण प्राधान्य दिलं आहे ते या वेळेला. कोणते आईवडील आणि बालप्रेक्षक उत्साहाने, या वेळेत येतात सांगा बरं मला? नाहीच येत असंही नाही; पण संख्या कमीच होते की नाही? मी जी नाटकं बसवते, ती तांत्रिकदृष्ट्या भक्कम असतात. नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत या सर्व बाजू व्यावसायिक नाटका एवढ्याच प्रोफेशनल आणि खर्चिकही. मला बालकलाकारांना तोच अनुभव द्यावासा वाटतो किंबहुना, असा अनुभव त्यांच्या पाठीशी राहायला हवा, जो त्यांना आयुष्यभर लक्षात राहील; पण असं घडवून आणणं महाकठीण. म्हणजे म्हणतात ना; घर, लग्न आणि परदेशगमन हा योगाचा भाग आहे. नाट्यगृहाची तारीख मिळणं ही अजून एक गोष्ट त्यात जोडा.
 
आजच्या आधुनिक जगात जिथे सारंकाही एका लिक वर होतं, तसं अजून नाट्यगृहाचं बुकिंग काही होत नाही. त्याची प्रक्रिया सुरू निश्चित झाली आहे; पण त्यात स्वतः येऊन अर्ज द्या, ऑनलाईन अर्ज करा. बरं कन्फर्मेशनसाठीही किमान १० दिवस वाट पाहावी लागते. त्याचा मुहूर्त काढावा लागतो आणि मिळेल त्या वेळेत, त्या तारखेला करा हा एकाच पर्याय उरतो. सध्या कार्यक्रमांचे वाढते प्रमाण बघता, तारीख मिळणं अवघड झालं आहे. आता पुणे शहराचंच घ्या. पुण्याच्या प्रत्येक घरात एक कलाप्रेमी जरी पकडला, तरी तीन लाख नाट्यप्रेमींकरता १० च्या आसपास शासकीय नाट्यगृह आहेत. यामुळे जीवघेणी स्पर्धा आणि कलाकाराची गळचेपी होते आहे, यात अजिबात अतिशयोक्ती नाही.
 
‘राजे शिवबा’ हे बाल महानाट्य बसवायला घेतलं आहे आणि त्याच्या सादरीकरणासाठी, योग्य अशा शनिवार-रविवारची तारीख हवी आहे. अर्ज केला आहे बघू, याला मुहूर्त कधीचा मिळतो. शेवटी कलाकारांनी जीवापाड मेहनत करायची, कलाकृतीचा दर्जा वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर निर्मात्याने खर्च करायचा, कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हे मात्र तारखांच्या जुगारावर सोडून द्यायचं. सरकारकडून नेहमीच दुर्लक्षिलेला विभाग हा सांस्कृतिक विभाग आहे, हे मी अत्यंत गांभीर्याने बोलते आहे, निदान बालरंगभूमी तरी. भारतात एकतरी आधुनिक सुविधांनी युक्त केवळ बालकलाकारांसाठी समर्पित असं नाट्यगृह आहे का? तुम्ही म्हणाल, अहो एक काय घेऊन बसलात आज किमान हजार हवीत. किमान एकाने तर सुरुवात व्हावी. शेवटी the ball is in your court म्हणतात तसं, नाट्यगृह मिळणं, त्यांची संख्या जास्त असणं, ते सुचारू रूपात उपलब्ध असणं हे पूर्णतः सरकारवर आहे. तोपर्यंत ‘तारीख, तारीख, तारीख’ करत हिंडत राहण्याशिवाय पर्याय नाही.
 
- रानी राधिका देशपांडे
 
 
Powered By Sangraha 9.0