एआयचा आर्थिक-चक्रव्यूह : गोल फिरणार्‍या गुंतवणुकीचे रहस्य

23 Nov 2025 11:54:12
 
AI
 
सध्या जगात ‘एआय’ने तांत्रिक जगतावर गारुड केले आहे. त्यामुळे जगाचा वेग वाढला आहे, तसाच आर्थिक समृदद्घीही येत आहे. आज ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘एनव्हिडीया’ या दोन कंपन्या ‘एकमेका साहाय्य करु, अवघे होऊ श्रीमंत’ या न्यायाने व्यवसाय करत आहेत. या कंपन्यातील गोल गोल फिरणार्‍या गुंतवणुकीचे रहस्याचा घेतलेला मागोवा...
 
रविवारची ती सकाळ. हॉटेलातील टेबलावर चहा-पोहे आणि वातावरणात नेहमीचे निवांतपण; पण आज जयंतरावांचे लक्ष वर्तमानपत्रातील एका बातमीने वेधून घेतले. ‘एनव्हिडीया’ जगातील सर्वाधिक मूल्यवान कंपनी ठरली! त्यांनी चहाचा कप खाली ठेवत, शेजारी बसलेल्या आदित्यकडे वळून विचारले, "अरे, ही ‘एनव्हिडीया’ कंपनी इतकी सामर्थ्यवान कशी बनते आहे? आणि मागच्या महिन्यातच ‘मायक्रोसॉफ्ट’च्या एआय गुंतवणुकीचीही विक्रमी रक्कम दिसली होती. दोघांची वाढ इतकी एकाचवेळी आणि इतया वेगाने का होतेय?”
 
आदित्यने मान डोलावली आणि समजावून सांगितले, "आजोबा, जगात सध्या सर्वात वेगाने वाढणारा आर्थिक प्रवाह म्हणजे ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘एनव्हिडीया’ यांच्यातील गोल फिरणारी गुंतवणूक. दोघांची वाढ एकमेकांवर केवळ अवलंबून नाही, तर ती एकमेकांच्या वाढीला गती देते आहे. हा प्रवाह अर्थतज्ज्ञांमध्ये ’सर्युलर कॅपिटल फ्लो’ म्हणून ओळखला जातो.” माधवकाका हसून म्हणाले, "अरे साध्या भाषेत सांग! इतका मोठा शब्द कशाला?” आदित्यने मग एआयच्या अर्थशास्त्रातील हा ’स्वयंचलित फिरता चक्रव्यूह’ सोप्या भाषेत उलगडून दाखवला.
 
मायक्रोसॉफ्ट - एनव्हिडीया : पैशाचा ’फ्लायव्हील’ कसा फिरतो?
 
आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेचे जग ‘एनव्हिडीया’ च्या ‘जीपीयु’ अर्थात ‘ग्राफिक्स प्रोसेसिंग युनीट’ चिप्सभोवती फिरते. कारण या चिप्सशिवाय मोठी एआय मॉडेल्स चालवणे शयच नाही. दुसरीकडे, ‘मायक्रोसॉफ्ट’ एआयक्षेत्रातील सर्वात मोठा खेळाडू आहे. मग, ते ओपन ‘एआय’ असो, कोपायलट असो किंवा अझुर क्लाऊड एआय असो. या सर्व सेवा ‘एनव्हिडीया’ चिप्सशिवाय चालू शकत नाहीत.
 
चक्राचा पहिला फेरा : मागणीतून महसूल
 
‘मायक्रोसॉफ्ट’ आपल्या एआय सेवांना लाउडवर चालवण्यासाठी, अब्जावधी डॉलर्स खर्च करुन, जगात सर्वाधिक प्रमाणात ‘एनव्हिडीया जीपीयु’ खरेदी करते. इतिहासात कधीही कोणत्याही एका हार्डवेअर निर्मात्याकडून, इतका मोठा माल घेतला गेला नव्हता. ही रक्कम अब्जावधी डॉलर्सच्या घरात जाते.
 
परिणाम : ‘मायक्रोसॉफ्ट’चा हा प्रचंड खर्च ‘एनव्हिडीया’साठी विक्रमी महसूल आणि नफा निर्माण करतो. नफा वाढल्यामुळे ‘एनव्हिडीया’चे शेअर्स वाढतात आणि ती जगातील सर्वाधिक मूल्यवान कंपनी बनते.
 
चक्राचा दुसरा फेरा : अपेक्षेवर आधारित मूल्यांकन
 
बाजारपेठेत जेव्हा दोन बलाढ्य कंपन्या एकाच वेळी अशी भरारी घेताना दिसतात, तेव्हा गुंतवणूकदारांची मानसिकता बदलते. त्यांना एआय म्हणजेच भविष्य वाटते आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘एनव्हिडीया’ हे त्याचे केंद्रबिंदू ठरतात.
 
परिणाम : गुंतवणूकदारांकडून (उदा. पाश्चात्य जगातील पेन्शन फंड, म्युच्युअल फंड इत्यादि) दोन्ही कंपन्यांत पैशाचा पूर येतो. या प्रचंड गुंतवणुकीमुळे दोघांचे शेअर मूल्य आणखी वाढते, जरी प्रत्यक्ष नफा त्या वेगाने वाढत नसला तरीही. दोघांचे ’मूल्यांकन’ हे केवळ ’अमर्याद वाढ’ या अपेक्षेवर आधारलेले असते.
 
चक्राचा तिसरा फेरा : स्वयंचलित गती आणि विस्तारीकरण
 
मायक्रोसॉफ्ट आपली एआय सेवा अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तारते आहे, त्यासाठी तिला अधिक प्रोसेसिंग पॉवर लागते.
 
परिणाम : मायक्रोसॉफ्ट पुन्हा अधिक चिप्सची मागणी एनव्हिडीया कडे वाढवते. एनव्हिडीया चा नफा आणखी वाढतो आणि मायक्रोसॉफ्टला वाढलेले भांडवल वापरून, एआयमध्ये पुन्हा खर्च करण्याची क्षमता मिळते. याच प्रक्रियेला अर्थतज्ज्ञ एआय कॅपिटल फ्रीव्हील म्हणतात.
 
चक्रव्यूहाचा विस्तार :एनव्हिडीयाचे धोरणात्मक सर्युलर डील्स
 
वॉल स्ट्रीटवर सध्या जी सर्वात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे, ती केवळ ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘एनव्हिडीया’च्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची नाही, तर ‘एनव्हिडीया’ने आपल्या इतर प्रमुख ‘एआय’ ग्राहकांमध्ये केलेल्या थेट गुंतवणुकीची आहे.
 
गुंतवणुकीची पद्धत : ‘एनव्हिडीया जीपीयु’ (जीपीयु विक्रेता) ‘कोअरवेव्ह’ सारख्या एआय स्टार्टअप्समध्ये मोठ्या प्रमाणात पैसा (व्हेंचर कॅपिटल) गुंतवते. हे स्टार्टअप्स याच नवीन भांडवलाचा उपयोग नव्याने ‘एनव्हिडीया जीपीयु’ खरेदी करण्यासाठी करतात, ज्यामुळे ‘एनव्हिडीया’चा महसूल वाढत राहतो.
 
उदाहरणार्थ : एलॉन मस्क यांच्या ’एक्स एआय’ मध्ये ’एनव्हिडीया’ने ६ अब्ज डॉलर गुंतवल्यानंतर, ’एक्स एआय’ या पैशाचा वापर त्यांचे मॉडेल प्रशिक्षित करण्यासाठी लागणारे ‘एनव्हिडीया जीपीयु’ खरेदी करण्यासाठी करणार आहे.
 
वॉल स्ट्रीटची टीका : आर्थिक विश्लेषकांच्या मते, ही पद्धत २००० च्या ’डॉट-कॉम बूम’ मधील ’विक्रेता वित्तपुरवठा’ सारखी आहे. यात कंपन्या आपल्या ग्राहकांना पैसा देऊन, स्वतःची उत्पादने विकत घेण्यासाठी प्रोत्साहित करतात.

धोका : ही पद्धत बाजारात कृत्रिम मागणी निर्माण करते आणि कंपनीचा महसूल वास्तविक मागणीपेक्षा जास्त दाखवते, ज्यामुळे ’आर्थिक बुडबुड्यासारखी’ परिस्थिती निर्माण होऊ शकते.
 
भ्रमित श्रीमंती : अर्थव्यवस्थेवरील सावट
 
ही वाढलेली श्रीमंती केवळ कागदोपत्री असून, ती प्रत्यक्ष रोख प्रवाहावर आधारित नसते. अर्थशास्त्रात अशी वाढ ’भ्रमित श्रीमंती’ म्हणून ओळखली जाते.
 
‘नोबेल’ विजेते पॉल क्रुगमन म्हणतात की, एआयची प्रगती खरी आहे; पण गुंतवणुकीचा वेग तंत्रज्ञानापेक्षा खूपच जास्त आहे. अशी तफावत नेहमी धोकादायक ठरते.
 
या चक्रातील चार मोठे धोके
 
१. अवलंबित्वाचा धोका : ’गुगल’,’अ‍ॅमेझॉन’, ’मायक्रोसॉफ्ट’ या सर्वांची ’एआय’ पायाभरणी केवळ ’एनव्हिडीया’ चिप्सवर आधारित आहे. सॅम ऑल्टमन (ओपन एआय) यांनी थेट भीती व्यक्त केली आहे की, एक कंपनी संपूर्ण जगाच्या कम्प्युटिंगचा केंद्रबिंदू बनली आहे. ’एनव्हिडीया’मध्ये पुरवठा किंवा तांत्रिक अडथळा आल्यास एआय उद्योग हादरू शकतो.
 
२. खर्च वि. नफा आणि कृत्रिम मागणी : ’मायक्रोसॉफ्ट’ आणि ’गुगल’चा एआय संगणकावरचा खर्च प्रचंड आहे (१०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त), परंतु, एआय सेवांमधून मिळणारा प्रत्यक्ष नफा अजूनही मर्यादित आहे. त्यातच एनव्हिडीयाकडून मिळणार्‍या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे झालेली खरेदी कृत्रिम ठरण्याची शयता आहे.
 
३. ऊर्जा संकट: एआय मॉडेल्स प्रचंड वीज आणि पाणी वापरतात.एका वर्तमानापत्राचे निरीक्षण आहे की, त्याची ऊर्जा-भूक जगातल्या पुढच्या मोठ्या संकटाला जन्म देऊ शकते.
 
४. शेअर बाजाराचा भार : अमेरिकेच्या एसपी ५०० निर्देशांकातील जवळजवळ १५ टक्के वजन ’मायक्रोसॉफ्ट’ आणि ’एनव्हिडीया’ या दोन कंपन्यांना आहे. जर या दोन कंपन्यांच्या शेअर मूल्यात मोठी घसरण झाली, तर पेन्शन फंडसह संपूर्ण जागतिक शेअर बाजारावर त्याचा मोठा आणि गंभीर परिणाम होईल.
 
निष्कर्ष : भरारी हवी, पाय जमिनीवर हवेत
 
सगळे मुद्दे ऐकून जयंतराव वर्तमानपत्र बंद करत म्हणाले, म्हणजे एआयची प्रगती खरी आहे; पण पैशाचा प्रवाह काहीसा कृत्रिम आहे. ’मायक्रोसॉफ्ट’, ’एनव्हिडीया’,’एक्स एआय’ या सगळ्याच कंपन्या एकमेकांना वर नेत आहेत; पण हा गोल फिरणारा प्रवाह एखाद्या क्षणी अडखळला, तर सगळेच घसरणार आहेत.
 
आदित्यने शांतपणे उत्तर दिले, हो आजोबा. एआयची लाट जगाला बदलून टाकणार आहे; पण त्यात होणारी गुंतवणूक किती स्थिर आहे, ते पुढची काही वर्षे ठरवतील. माधवकाकांचे मत होते, एआयमुळे प्रगतीची गती वाढणं नक्कीच चांगलं; पण या आर्थिक प्रगतीच्या गतीला वास्तवाचा आधार असणं याहून महत्त्वाचं. जयंतराव म्हणाले, एआयचा जमाना आलाय; पण एआयमुळे वाढलेला पैशांचा आणि गुंतवणुकीचा ओघ नेमका कुठे जाईल, हे अजून अस्पष्टच आहे.
डॉ. कुलदीप देशपांडे
 
 
 
Powered By Sangraha 9.0