भारतीय स्थापत्य कला कायमच तिच्या देखणेपणाने जगाला विस्मीत करत आली आहे. खजुराहो येथील कंदारिया महादेव मंदिर त्यातीलच एक. येथील स्थापत्याची भव्यता, कोरीव कामातील नजाकत सर्वार्थाने मनमोहकच ठरते. मानवी मनाला आपल्या बाह्य भव्यतेपासून आंतरिक शांततेपर्यंतच्या अनुभवाने समृद्ध करणार्या या मंदिराचा घेतलेला आढावा....
भारताची मंदिरे ही आपली सांस्कृतिक स्मृती, आध्यात्मिक गूढता आणि कलात्मक सौंदर्य यांचे जिवंत रूप असतात. मध्य प्रदेशच्या बुंदेलखंडच्या उबदार भूमीत उभे असलेले, ‘खजुराहो’चे मंदिरसमूह त्याचे सर्वात दिव्य उदाहरण आहे. या संपूर्ण वास्तुसृष्टीचा मुकुटमणी म्हणजे ‘कंदारिया महादेव मंदिर’. हे मंदिर म्हणजे शिवाच्या महिम्याचे दगडात रूपांतर केलेले सर्वोच्च प्रतिकच! मुंबईच्या डॉ. देवांगना देसाई या विदुषींचा ‘खजुराहो’ मंदिरांवरती प्रचंड अभ्यास आहे. त्या म्हणतात की, ही मंदिरे म्हणजे फक्त इमारत नसून, संपूर्ण ब्रह्मांडाची रचना दाखवायचा केलेला प्रयत्न आहे.
‘खजुराहो’च्या वनराईतून जेव्हा हे मंदिर अचानक नजरेत भरते, तेव्हा प्रथम जाणवतो तो त्याचा भव्य आकार आणि शिखरांची अद्भुत आरोही लय. दुरून पाहताना असे वाटते की, एखादा पाषाण-पर्वतच आकाशाकडे चढत आहे. पण, जवळ जाताना कळते की, हा पर्वत दगडांनी नव्हे, तर कल्पनाशक्तीने, भक्तीने आणि शिल्पकलेच्या विलोभनीय तंत्रांनी बांधलेला आहे.
‘कंदारिया महादेव मंदिरा‘ची कथा, ‘चंदेल’ राजवंशाच्या सांस्कृतिक अभिवृद्धीशी जोडलेली आहे. इ.स. नवव्या ते १२व्या शतकादरम्यान या राजघराण्याने कला, धर्म, शिल्पकला, संगीत आणि स्थापत्य या सर्व क्षेत्रांत एक सुवर्णकाळ घडवला. विशेषतः राजा विद्याधराच्या काळात, ‘खजुराहो’चे वैभव उच्च अवस्थेला पोहोचले. गझनीच्या मोहम्मदाविरुद्ध यश मिळाल्यानंतर, विद्याधराने हे भव्य मंदिर पूर्णत्वास नेल्याचे मानले जाते. म्हणजेच, ‘कंदारिया महादेव’ केवळ कलाकृती नसून, ‘चंदेल’ सामर्थ्याच्या गौरवाचे स्मारक आहे.
या मंदिराचे नावच त्याचे स्वरूप स्पष्ट करते. ‘कंदारिय’ म्हणजे गुहा किंवा पर्वताचा अंतर्भाग. ‘चंदेल’ वास्तुतज्ज्ञांनी संपूर्ण कैलास पर्वतालाच दगडात साकार केले आहे, अशीच त्याची रचना. प्रमुख शिखर उंच, भव्य आणि विश्वाशी जणू संवाद साधणारे, त्याभोवती असंख्य लहान-मोठी उपशिखरे, त्यांची मांडणी इतकी लयबद्ध की, ते सर्व मिळून एकत्र चढणार्या पर्वताचीच प्रतिमा तयार करतात. वास्तुशास्त्रातील ‘शिखर-अरोह’ संकल्पनेचा उत्कट अविष्कार म्हणजे ‘कंदारिया महादेव’.
या मंदिराची निर्मिती नागरशैलीमध्ये झाली आहे. बाहेरून भव्यतेची ओळख देत, प्रवेश करताना प्रथम अर्धमंडप, नंतर विस्तृत महामंडप, त्यानंतर अंतराळ आणि अखेरीस गर्भगृह, असा सुसूत्र प्रवास होतो. मंदिराची सप्तरथ योजना त्याच्या बाह्यभागाला एक अद्भुत त्रिमितीयता देते. मंदिरे केवळ धार्मिक केंद्रे नव्हती, तर नृत्य, संगीत, कलेचा उत्सव आणि समाजजीवनातील सर्जनशीलतेचा ध्यास यांचीही जिवंत केंद्र होती, हेच या रचनेतून स्पष्ट होते. मंदिरांचे ‘सांधार’ आणि ‘निरंधार’ असे प्रकार असतात. म्हणजेच, अनुक्रमे गर्भगृहाला लागून प्रदक्षिणा पथ असलेले मंदिर आणि थेट बाहेरून प्रदक्षिणा पथ असलेले मंदिर. सदरचे मंदिर हे पहिले म्हणजेच ‘सांधार’ प्रकारचे मंदिर होय.
या मंदिराचे एक विलक्षण गुणवैशिष्ट्य म्हणजे, त्यातील फ्रॅटल भूमिती. दगडातून उभ्या केलेल्या रेषांत, प्रक्षेपांमध्ये आणि शिखरांच्या वाढीमध्ये, एकाच पद्धतीची पुनरावृत्ती होते लहानातून मोठे, आणि मोठ्यातून आणखी विशाल. जणू विश्वाचीच रचना या मंदिरात, सूक्ष्मरूपाने पुन्हा बांधलेली आहे. बाह्यभागावर नजर फिरवताना, असंख्य लहान शिखरे एकसंध लहरीत वर चढत असल्याचे दिसते आणि त्या आरोहातून जणू एका अदृश्य केंद्राकडे, एका ऊर्जाबिंदूकडे सर्व रेषा एकवटत आहेत, असे जाणवते.
मंदिराच्या मंडोवरावर, बाह्य भिंतीवर तर ‘खजुराहो’चा खरा आत्मा वसलेला आहे. जवळजवळ ९०० पेक्षा जास्त शिल्पांकित मूर्ती, मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या आहेत. प्रत्येक वेगळ्या भावनांची, हालचालींची, कथा-विषयांची वाहक, शिवाची विविध रूपे इथे जिवंत होतात. अर्धनारीश्वराची समता, नटराजाचा नृत्यानंद, अंधकासुर वधातील आक्रमकपणा, त्रिपुरांतकाचा तेजोमय क्षण, उमा-महेश्वराची माधुर्यपूर्ण शांतता, देवतांच्या या रूपांमधून कलाकारांचे आध्यात्मिक चिंतन आणि शिवतत्त्वाची बहुआयामी अनुभूती दोन्हीही स्पष्ट दिसतात.
‘खजुराहो’तील ‘अप्सरा शिल्पे’ जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत आणि ‘कंदारिया’ मंदिरात तर त्यांची, अप्रतिम परंपरा शिखरावर पोहोचते. केशरचना करताना, नृत्यमुद्रेत रमलेली, दर्पणात आपले रूप न्याहाळणारी, कंबर हलवणारी, गोजिरे हसू फेकणारी, अशा शेकडो अप्सरा नजरेस भासतात. त्या केवळ स्त्रीसौंदर्याचे प्रतिक नाहीत; त्या भारतीय कलावैचारिकतेतील ‘रस’, ‘लय’, ‘कोमलता’ आणि ‘शक्ती’ यांच्या संतुलनाचेही प्रतिक आहेत. सर्व भिंती एका विशाल संगीतसृष्टीप्रमाणे वावरतात. प्रत्येक मूर्तीची स्वतःची ‘ताळ’ आणि ‘भावलय’ आहे. ‘शब्द’, ‘रस’, ‘स्पर्श’, ‘रूप’ आणि ‘गंध’ ही पाच तत्त्वं नियंत्रित असली, तर आपल्याला साधना करता येते. नाहीतर, हीच तत्त्वं आपल्याला साधनेपासून लांब घेऊन जाऊ शकतात. ही तत्त्वं मांडणार्या स्त्री-शिल्पांना ‘सुरसुंदरी’ असे म्हणतात. अनेक ‘सुरसुंदरी’ या मंदिरावर कोरलेल्या आहेत. मंदिरात जाताना आधी बाहेरून प्रदक्षिणा घालून मग आत का जायचे? याचे उत्तर यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला मिळते. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. देगलूरकर सर यांचे या विषयावर ‘सुरसुंदरी’ याच नावाने, एक सुंदर पुस्तकदेखील आहे.
या बाह्य विराटतेच्या विरुद्ध, गर्भगृहमात्र आश्चर्यकारकपणे लहान आणि शांत आहे. अंधुक प्रकाशात विसावलेले शिवलिंग, जणू विश्वाचे केंद्रभूत बीजच. बाहेरच्या शिल्पमालिकेतून आतल्या शांततेकडे जाणारा हा प्रवास, मनाला अत्यंत सूक्ष्मपातळीवर स्पर्श करतो. जणू जीवनाच्या कोलाहलातून अंतर्मनाच्या नीरवतेकडे नेणारी ही वास्तुकला आहे. मानवी अनुभवाच्या सर्व पातळ्यांना हात घालून, शेवटी त्या एकाच बिंदूवर, ‘शिवतत्त्वावर’ स्थिर करणारी ही अनोखी रचना आहे.
शिल्पकलेच्या आणि स्थापत्यकलेच्या दृष्टीने बघितले, तरी ‘कंदारिया महादेव’ अप्रतिम पूर्णतेचा नमुनाच वाटतो. प्रत्येक रेषा, प्रत्येक कोरीव तुकडा, प्रत्येक मूर्तीचे प्रमाण, प्रत्येक भागातील संतुलन, हे सर्व इतके मोजून ठेवलेले की, दगडातसुद्धा नृत्य होत आहे असे भासते. हे मंदिर म्हणजे कल्पनाशक्ती, गणित, भूमिती आणि कलात्मक सर्जनशीलतेचा सुसंवाद. आज ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांमध्ये गणना होणार्या ‘खजुराहो’ मंदिर समूहात, ‘कंदारिया महादेव’ मंदिराला सर्वोच्च स्थान आहे. शतकानुशतके वैज्ञानिक, इतिहासवेत्ते, शिल्पतज्ज्ञ, वास्तुशास्त्री आणि कलासमीक्षक या मंदिराचा अभ्यास करत आले आहेत.
भारतीय तत्त्वज्ञानाच्या जीवनातून शिवाकडे जाणार्या प्रवासाचे, हे उत्तुंग दर्शन आजही तितकेच प्रभावी आहे.
‘कंदारिया महादेव मंदिर’ म्हणजे केवळ दगडांचे रचलेले सौंदर्य नाही; ते जीवनाची अनेक रूपे, मानवी भावनांचे विविध रंग, देवाच्या अनंततेची अनुभूती आणि आत्म्याच्या उर्ध्वगामी प्रवासाची वास्तुरूप कथा आहे. बाह्य भव्यतेपासून आंतरिक शांततेपर्यंतचा हा प्रवास अनुभवताना असे वाटते की, शतके लोटली तरी शिवाचा एक अखंड स्वर त्या शिल्पांच्या मधून वाहत राहिला आहे - शिवोऽहम.
- इंद्रनील बंकापुरे