नरकाचा बाजार!

23 Nov 2025 12:07:17
 
Red-Light Area
 
देहविक्री करणार्‍या महिलांचा प्रश्न अनादिकाळापासून तोच आणि तसाच आहे. त्यांना आणि त्यांच्या मुलांना किमान माणूस म्हणून जगता यावे, यासाठी काय करता येईल? या महिलांवर, त्यांच्या वस्त्यांवर अनेकदा अनेक जणांनी लिहिले आहे, बोलले आहे, काम केले आहे; पण तरीही वास्तव काही बदलत नाही. या महिलांची अधिकृत नोंदणी व्हावी का? यासंदर्भात, तसेच त्यांच्या काही प्रश्नांचा घेतलेला मागोवा...
 
त्या अंधार्‍या गल्ल्या, त्या एका खोलीत सात-आठ पार्टिशन केलेले, प्रत्येक पार्टिशनमध्ये एक पलंग. थोडी जागा, हातपाय धुवायला, चूळ भरण्यासाठी ठेवलेली. मच्छर अगरबत्ती आणि डोक्यात जाईल अशा अत्तराचा सुगंध, सगळंच कसं भडक, बटबटीत! तो पलंग आणि त्या पलंगाच्या बाजूचे पार्टिशन म्हणजेच त्या महिलांचे घर. दररोज संध्याकाळ झाली की, त्या वस्तीतील महिला रस्त्यावर, गल्लीत उभ्या राहतात. तेव्हा त्यांची मुलं आजूबाजूला खेळत असतात, कुणी शाळेत गेलेली असतात. कुणी भिटभिट्या नजरेने, आजूबाजूला काय घडते ते पाहत बसलेले असतात. ’*डी का छोकरा’ किंवा ’छोकरी’ हे शब्द तर सामान्यच! पुढे जाऊन ही मुलं काय होणार? सटवी प्रत्येकाचे वेगळे नशीब लिहिते, असे म्हंटले जाते. पण, या वस्तीतल्या बालकांचे नशीब सारखेच असते, त्यात सहसा बदल नाहीच!
 
‘लहान मुलं देवाघरची फुलं’. या लहान मुलांवर कुसंस्कार, अत्याचार होऊ नये म्हणून, जगभरात काळजी घेतली जाते; पण कामाठीपुरा आणि तत्सम वस्त्यांतील देहव्रिकी करणार्‍या महिलांच्या मुलांचे काय? परिस्थितीमुळे देहविक्रीतून बाहेर न पडता येणार्‍या आईच्या मुलांचे वास्तव मनाला चटका लावणारे आहे. या वस्तीतील मुलं दिवसभर शाळेत किंवा बाहेर राहतात; पण रात्री? रात्री त्यातली अनेक मुलं-मुली बाहेर राहू शकत नाहीत. त्यांना पार्टिशन केलेल्या त्या नरकातच परतावे लागते. खोलीत फक्त पलंग ठेवण्यासाठी जागा असते. त्यामुळे ही मुलं पलंगाखाली झोपतात आणि पलंगावर त्यांची आई. आईसोबत दर अर्ध्या एक तासाने एक ग्राहक असतो. या सगळ्याचा त्या मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल? हे शब्दात सांगू शकत नाही. ज्या वयात जे कळू नये, तेच इतके विकृतपणे आणि हिंस्रपणे त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्या मुलांचा नात्यांवर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणुसकीवर विश्वास निर्माण कसा होईल? तो पलंग आणि त्या पार्टिशनपलीकडच्या जगाबद्दल, या मुलांना काय वाटत असेल? या मुलांच्या जागी स्वतःला ठेवून विचार केला, तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर काय मिळेल?
 
या वस्तीमध्येही काही स्वयंसेवी संस्था काम करतात. या मुलांसाठी रात्रीच्या निवासाची व्यवस्थाही उपलब्ध करतात; पण वाढत्या लोकसंख्येमुळे त्यांच्याकडेही जागांची कमतरता भासत आहे. सर्वच मुलांना ते त्यांच्याकडे आसरा देऊ शकत नाहीत. ज्या मुलांची संस्थांमध्ये किंवा इतरत्र झोपण्याची व्यवस्था होत नाही, त्यांच्या नशिबी मग त्या पलंगाखाली झोपणेच येते. कारण, बाहेर राहिले तर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होण्याची त्यांना रास्त भीतीही असते. त्यातही वस्तीतील महिला त्यांच्या मुलींना इतरत्र निवासाला पाठवणे टाळतात. आपल्यासोबत जे झालं, जे घडलं, ते आपल्या मुलीसोबत होऊ नये म्हणून मुलींना त्या खोलीतच पलंगाखाली झोपवतात. तसेच, मुलींना शिकून काय करायचे? मुलालाच शिकवायचे ही मानसिकता त्यांचीही आहेच. त्यामुळे अनेकदा मुलींना शाळेतही पाठवले जात नाही. त्या पलंगाखाली झोपलेल्या मुलींच्या मनात काय वादळ चालले असेल, याची कल्पनाही करवत नाही. आईसोबत पलंगावर असणार्‍या त्या व्यक्तीचे लक्ष तिच्याकडे जाऊ नये, यासाठी ती मुलगी आणि तिची आईही पराकोटीचा प्रयत्न करतानाचे चित्रही त्या अंधार्‍या खोलीमध्ये सातत्याने दिसते.
 
या परिसरात गेली अनेक दशके काम करणारे विनय वत्स म्हणतात की, "१९८०-९० च्या दशकात या परिसरात जास्त संस्था काम करत नव्हत्या. तेव्हा तर सात-आठ वर्षांच्या मुलीही या क्रूर धंद्यात ढकललेल्या पाहिल्या आहेत. आता शासन, प्रशासन आणि समाज जागृती झाली आहे. त्यामुळे या वस्तीमध्ये आता तशी परिस्थिती नाही. तरीदेखील आतासुद्धा या मुलांना त्या वस्तीतून बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. भायखळा येथे आमचे कार्यालय असून, तिथूनच या मुलांसाठी आमची संस्था काम करते. या वस्तीतील ५२ मुलांसाठी संस्थेने नियोजन केले आहे. सकाळी मुलं शाळेत जातात, दुपारी आमच्या संस्थेची बस या ५२ मुलांना आमच्या कार्यालयात आणते. इथे मुलांना भोजन दिले जाते.
 
मग, मुलांना अभ्यास शिकवला जातो, गृहपाठ करून घेतला जातो. खेळ, गप्पा, अंगभूत कलागुण यासंदर्भातील दररोज सत्रही घेतली जातात. संध्याकाळी मग परत मुलांना वस्तीत सोडले जाते. कारण संध्याकाळी मुलांना या कार्यालयात ठेवू शकत नाही. तशी आम्हाला शासनाची परवानगी नाही आणि रात्री मुलं निवास करतील, अशी साधनसुविधाही नाही. या ५२ मुलांमध्ये मुलीही आहेत. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचे सगळे विद्यार्थी आहेत. पुढे विनय यांनी सांगितले की, भिवंडी येथे कुही गावाजवळ ११ एकर जमीन घेतली आहे. या वस्तीतील बालकांसाठी तिथे निवासी शाळा उभारण्याची योजना आहे. बालकांचे संगोपन, शिक्षण सगळे काही तिथेच करायचे आहे. तसेच, या मुलांना कौशल्य विकाससंदर्भात प्रशिक्षण मिळेल, असे शिक्षणही सुरू करायचे आहे; पण तशा वास्तूच्या उभारणीसाठी निधीची व्यवस्था अजूनही होत नाही. यावर एकच वाटते की, समाज दानशूर आहे, त्यांच्या कार्याची महती पटली तर समाज त्यांना सहकार्य करेलच.” (त्यामुळे विनय वत्स यांचा संपर्क क्रमांक देत आहे- ९८९२०९१८५८)
 
असो. मुंबईतल्या अशाच एका वस्तीमधल्या महिलेला भेटले होते. हाडाची काडं, चेहराही काळवंडलेला. गाऊन घातलेल्या त्या महिलेला एड्सची लागण झाली होती. (याविषयी त्या महिलेला भेटवणार्‍या व्यक्तीनेही सांगितले होते.) यावर ती नित्यनियमाने उपचारही घेत होती. संध्याकाळ संपून रात्र होत होती. ती मला म्हणाली "अभी धंदे का टैम हैं, आता मला वेळ नाही. काय बोलायचे ते लवकर बोल.” न राहून मी तिला विचारले की, "तू आजारी आहेस. मग, तू हे का करतेस? तुझ्यामुळे तुझ्याकडे येणार्‍यालापण एड्स होणार.” ती म्हणाली, "मै किधर मेरे घरसे लायी थी? ज्यांनी दिला त्यांना परत देते. त्यांनी कुठं माझा विचार केला आणि येणारे लोक काय खूप चांगले आहेत? ते पण नशेत धूतच असतात. मी फक्त रात्रीच बाहेर उभी राहते, त्यांना काय बाई असल्याशी मतलब!” तिचे बोलणे ऐकून खरंच काही सुचलं नाही. राग-दुःख एकाच वेळी माझ्या चेहर्‍यावर आले असावेत. ते पाहून ती म्हणाली, ‘’मै जल्लाद नही हूं, उनसे तो अच्छी हू.”
 
तिने सांगितले की, ती प. बंगालमधील गावखेड्याची. घरची परिस्थिती गरिबीची होती. अब्बू -अम्मी आणि डझनभर भाऊ- बहीण. ती १४ वर्षांची असतानाच, तिच्यापेक्षा तिप्पट माणसासोबत तिचा निकाह झाला. मुंबईत जायला भेटते, हिच तिच्यासाठी मोठी गोष्ट. तो तिला घेऊन आला तोच त्या वस्तीत, खुराड्यासारखी खोली. काही दिवस बायको म्हणून त्याने तिला वागवले; पण महिन्याभरातच त्याने तिला देहविक्रीच्या धंद्याला लावले. तिने विरोध केला, तेव्हा तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. घरी परतायचे सगळे मार्गच बंद केल्याने, नाईलाजास्तव ती या धंद्यात अडकली.
 
तिच्या कमाईवर तो एैषोआराम करू लागला आणि त्याच्या गावी ठेवलेल्या बायकापोरांना पैसे पाठवू लागला. मुंबई, कुटुंब, घर, संसार, मज्जा ही तिची सगळी स्वप्नं धुळीस मिळाली. तो अधूनमधून गावी जाऊन बायकोमुलांना भेटून येत असे. तिही अधूनमधून घरी पैसे पाठवायची; पण ती कशी आहे, याची कुणीही कधीही चौकशी केली नाही. दुसरीकडे तिला मात्र मूल होऊ नये, यासाठी तो सदैव दक्ष असायचा. तरीही, तिचा कितीवेळा गर्भपात झाला, याची गणतीच नाही. याचदरम्यान तो गावी निघून गेला. कारण त्याची मुलं मोठी झाली होती, इथे हिलाही एड्स झाला. याहीपेक्षा विदारक आयुष्य जगणार्‍या महिला या वस्त्यांमध्ये आहेत. ‘माणसं’ आणि ‘माणुसकी’ हा शब्दच या वस्तीतून हद्दपार आहे का? असे वाटते.
 
औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाज़ार दिया
तुलती है कहीं दीनारों में, बिकती है कहीं बाज़ारों में
औरत ने जनम दिया मर्दों को
 
या जुन्या सिनेमा गाण्याचे काही अंशी वास्तवच या देहविक्री करणार्‍या महिलांच्या वस्त्या आहेत. काही अंशी वास्तव रूप यासाठी, कारण इथे केवळ पुरुषांनीच फसवलेल्या नाही, तर इथे अशाही मुली-महिला आहेत, ज्यांना महिलांनीच फसवून या बाजारात क्रूरपणे बसवलेले आहे. ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात फसून या वस्तीत नरकयातना भोगणार्‍या मुली-महिलाही इथे आहेत, हे नक्की!
 
फसलेल्या महिला या दलदलीत येऊ नये, यासाठी शासन आणि समाजाने एकजुटीने काम करायला हवे. देहविक्री करणार्‍या महिलांची नोंदणी होणे गरजेचे आहे. ही मागणी अनेक मान्यवरांनी यापूर्वीही केली आहे. अमृता फडणवीस यांनीही मागे याबाबत म्हटले होते. तेव्हा सुषमा अंधारेपासून सगळ्यांनीच त्यांच्या वक्तव्याविरोधात गदारोळ केला. मात्र, नीट आणि तार्किकदृष्ट्या विचार केला, तर त्यांच्या मागणीची सत्यता पटतेे. कारण मानवतेचा हा कलंक संपूर्णतः संपणार नाही, असे आतातरी वाटते. या महिलांना सन्मानाचे जगणे तर सोडाच; पण माणूसपणाचे जगणेही दुर्लभ आहे.
 
त्यामुळेच अमानवीपणे जीवन जगणार्‍या या महिलांची नोंदणी होणे गरजेचे आहे. यामुळे नोंदणी केेलेल्या महिलांची नियमित आरोग्य तपासणी, तसेच त्यांना सर्वच दृष्टीने सक्षम करण्यासाठी पावले उचलता येणे शक्य होईल. त्यांच्या छिन्नविछिन्न झालेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी नियोजनही करता येईल. त्याशिवाय, या धंद्यात येणार्‍या नव्या महिलांचे समुपदेशनही करता येईल. यासाठी शासनदरबारी यांच्यासाठी नियोजन होणे गरजेचे आहे. या महिलांची नोंदणी झाली म्हणजे, आता त्या अधिकृतरित्या देहव्रिकीचा धंदा करू शकतात किंवा त्यांचा देहविक्रीचा धंदा अधिकृत झाला, असेही होता कामा नये. या वस्त्यांमध्ये जाऊन आल्यावर माझ्याकडे शब्दच नाहीत. मुलगी मग कोणाचीही असू दे, तिला जगभरातल्या इतर सर्वच मुलींसारखे मन, भावना आणि शरीर आहे. या फसलेल्या महिलांच्या अमानवी जगण्यात, मानवता येणे गरजेचे आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0