डावा विचार आणि उजवा विचार म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. उजव्या विचारांनी होणारी चळवळ, ही हळूहळू आणि सकारात्मकतेच्या दिशेने होते. तर, डाव्या विचारांनी होणारी चळवळ ही जलद मात्र, हिंसक वळणावरच जाणारी असते. त्यामुळे डाव्या विचारसरणीचे परिणाम वेळीच ओळखणे आवश्यक आहे. सकारात्मकतेच्या दिशेने होणार्या चळवळीत घुसखोरी करून, ती हायजॅक करायची ही डाव्यांची रणनीती! असाच काहीसा प्रकार सध्या समाजात होताना आढळतो. डाव्या विचारांचा बुरखा फाडून, त्याचे भेदक वास्तव जगासमोर मांडणारे प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत अभिजित जोग यांच्याशी डाव्या विचारसरणीच्या वास्तवावर दै. ‘मुंबई तरुण भारत’चे हिंदुत्व विभाग प्रमुख ओंकार मुळ्ये यांनी साधलेला हा संवाद. ही मुलाखत दोन भागांमध्ये प्रकाशित होत असून, मुलाखतीचा उत्तरार्ध पुढील रविवारी प्रकाशित होईल.
‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ हे पुस्तक लिहिण्यामागची नेमकी संकल्पना आणि विचार काय होता?
लहानपणापासून डावा विचार, उजवा विचार म्हणजे काय? त्याचा जगावर आणि समाजावर काय परिणाम होतो? या विषयांमध्ये रस होताच. १९९१ साली सोव्हिएत युनियनचे पतन झाले आणि खूप मोठ्याप्रमाणात जगात बोलले गेले की, जगात डावा विचार संपला किंवा समाजवाद संपला. तर त्याच्यानंतर असे जाणवले की, अमेरिकन विद्यापीठांमध्ये डाव्या विचाराचे प्रभुत्व मोठ्याप्रमाणात वाढते आहे. तेव्हा माझा एक प्रबंध होता की, ही जी प्रक्रिया घडते आहे, ती १९९१ साली जे सोव्हिएत युनियनचे पतन झाले, त्याचा प्रतिशोध म्हणून डाव्या विचारांच्या लोकांनी कदाचित अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये आपले बस्तान बसवले असेल. असा एक विचार तेव्हा प्रबंधाच्या रूपाने माझ्या मनात आला आणि तो खरंच तसा आहे का? हे समजून घेण्यासाठी मग, मी अभ्यास करायला सुरुवात केली.
जसा अभ्यास वाढू लागला, तसं माझ्या लक्षात आले की, १९९१ नंतर नाही, तर त्याच्या अनेक दशकं आधी एक वेगळाच ‘मार्सवाद’ जगात जन्माला आला होता आणि त्यानुसार ‘मार्सवादा’ची वाटचाल पाश्चिमात्य जगात, अनेक दशकांपासून सुरू होती. ही वाटचाल कशी असणार, याची संपूर्ण योजना मागील काही दशकांतच लिहून ठेवली गेली होती. आज आपण बघतो आहोत की, गेल्या १०० वर्षांत मार्सवादाने पाश्चात्य जगताला विध्वंसाच्या पातळीवर आणून उभे केले आहे. हे सत्य जगासमोर मांडायलाच हवे असे मी तेव्हा ठरवले, आणि हे पुस्तक लिहायला सुरुवात केली व ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाच्या रूपातून ते सत्य मांडले.
‘डावी वाळवी’ हे पुस्तक डाव्या विचारांचा प्रवास दर्शवते; पण डावा आणि उजवा विचार म्हणजे नेमकं काय? याची अनेकांना स्पष्टता नसते. याविषयी काय सांगाल?
सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था या सर्वांमध्ये बदल घडवायचा असेल, तर तो कुठल्या मार्गाने घडवायचा याचे दोन विचार आहेत. एक डावा विचार आणि दुसरा म्हणजे उजवा विचार. डावा विचार असे म्हणतो की, आम्हाला समाजात बदल घडवायचाच नाही, तर आम्हाला सामाजिक व्यवस्थाच संपूर्णतः नष्ट करायची आहे. जर बदल घडवला, तर क्रांती पुढे ढकलली जाते. काही दिवस बदलांचे परिणाम चांगले असतात, माणसे संतुष्टही होतात मग, पुन्हा शोषण सुरू होते आणि क्रांती परत पुढे ढकलली जाते. त्यामुळे सकारात्मक बदल घडवणे, हे डाव्यांना मान्यच नाही. त्याला ते ‘प्रतिक्रांती’ म्हणतात. डावा विचार म्हणजे, समाजाला दोन वर्गांमध्ये विभाजित करायचे. त्या वर्गांमध्ये सतत संघर्ष भडकत राहिला पाहिजे. वर्गसंघर्ष हा डाव्या विचाराचा गाभा आहे. त्या संघर्षातून अराजक निर्माण झाले पाहिजे.अराजकातून हिंसा आणि हिंसेतून विध्वंस.
मार्सपासून सर्वच डावे विचारवंत स्वतः असे सांगतात की, मानवी सभ्यता आम्ही पूर्णपणे नष्ट करू आणि कोर्या पाटीवर आम्ही एका नव्या समाजाची, नव्या मानवाची निर्मिती करू. हा विचार म्हणजेच डावा विचार; परंतु, जेव्हा जेव्हा यांना संधी मिळाली, तेव्हा कुठलीही नवनिर्मिती करण्याची क्षमता यांनी दाखवलेली नाही. यांच्या शासनातून फक्त अराजक आणि विध्वंस एवढंच निर्माण होतं. डाव्यांनी अतिशय चलाखीने, उजवा विचार ‘नाझीझम’ आणि ‘फॅसिझम’शी जोडला. त्यामुळे आज कोणीही स्वतःला ‘राईट विंग’ म्हणवून घ्यायला तयार नाही वास्तविक, ‘नाझीझम’ आणि ‘फॅसिझम’ या दोन्हीही डाव्याच विचारसरणी आहेत.
मग, उजवा विचार म्हणजे नेमकं काय, तर समाजात बदल घडवायचा; पण तो सर्वांना विश्वासात घेऊन हळूहळू, कुठलाही विध्वंस घडणार नाही, अशा पद्धतीने. हा मार्ग थोडा कंटाळवाणा असल्याने, लोक डाव्या विचारांकडे आकर्षित होतात; पण त्याची परिणती शेवटी विध्वंसातच होते. उजव्या विचारसरणीतून झालेल्या बदलाची परिणती, ही चिरस्थायी अशा बदलात होते. क्रांतीच्या मार्गाने सगळे एकदम बदलायचे ठरवले तर, ज्यांच्या नावाने आपण क्रांती करतो, त्या शोषित आणि वंचितांचाच सर्वांत प्रथम बळी जातो, शेवटी हातात काही लागत नाही. हा फरक आहे, डावा विचार आणि उजवा विचार यांमधील.
विध्वंस हे डाव्यांचे उद्दिष्ट असल्याचे तुम्ही म्हणता; पण विध्वंस हे कोणाचंही उद्दिष्ट कसे असू शकते?
देव आणि असुर असे आपण दोन भाग मानतो. त्याचप्रमाणे पाश्चिमात्य समाजातही देव आणि असुर (सैतान) असे दोन भाग मानले आहेत. कम्युनिस्ट लोकं जाहीरपणे सांगतात की, आम्ही ‘सैतानवादी’ आहोत. त्यांच्यातील विचारवंतांनी अनेकदा, आपण ‘सैतानवादी’ असल्याचे जाहीर सांगितले आहे. अशाने ‘सैतानवाद’ स्वीकारला की, विध्वंस हा त्याचा परिणाम निश्चितच आहे. हे लोक अनेकदा सांगतात की, क्रांतीसाठी मनात विद्वेष असणे आवश्यक आहे, विद्वेषाशिवाय क्रांती होऊ शकत नाही.
लेनिननेदेखील म्हटले आहे की, ’पालक जर कम्युनिस्ट विचार स्वीकारत नसतील, तर त्यांच्या पाल्यांना आपल्या पालकांचा द्वेष करायला शिकवले पाहिजे.’ स्टॅलिन म्हणतो की, ’जगातला सर्वात जास्त आनंद कुठला, तर एखाद्या व्यक्तीचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्याच्या पाठीत सुरा खुपसायचा’; अशा विचारांचे हे लोक आहेत. आठ वर्षाच्या ‘माओ’ला मंदिर मुळासकट उखडायचा विचार मनात येत असेल, तर ही त्याची विकृतीच म्हणावी. असा मनाचा कल असलेले लोक, हे डाव्या विचारांकडे आकर्षित होतात.
डावा विचार हा शास्त्रशुद्ध आणि विवेकवादी असल्याचे म्हटले जाते, याविषयी तुमचे मत काय?
जगात ’पदार्था’शिवाय दुसरे काही अस्तित्वात नाही. म्हणजे आत्मा, देव यांसारख्या गोष्टी ज्या दिसत नाहीत, त्या आम्ही स्वीकारत नाही अशी डाव्यांची विचारसरणी. त्यामुळे डावा विचार हा शास्त्रशुद्ध आणि विवेकवादी असल्याचे म्हटले जाते. पण, हे सिद्धांत जे मांडण्यात आले, त्यांना वैज्ञानिक कसोटीची जोड दिली तर ते टिकत नाहीत. ’द्वंद्वात्मकते’चा पहिला सिद्धांत सांगतो की, जगातील सगळी ऊर्जा आणि मोशन हे दोन परस्परविरोधी शक्तींच्या संघर्षातून निर्माण होतात. मात्र, कुठल्याही शास्त्रज्ञास विचारले, तर तो हेच सांगेल की, त्या दोन शक्तींमध्ये स्वतःची मूलभूत ऊर्जा असल्याशिवाय, ते एकमेकांशी संघर्ष करू शकत नाहीत. त्यामुळे ऊर्जा आणि मोशन हे दोन परस्परविरोधी शक्तींच्या संघर्षातून निर्माण होते, हे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचेच आहे.
’नकारा’चा दुसरा सिद्धांत सांगतो की, कुठलीही नवनिर्मिती होण्यासाठी आधीची वस्तू/पदार्थ नष्ट होणे आवश्यक आहे. त्यातून पुढे आणखी नव्याची निर्मिती होते. म्हणजे प्रस्थापित व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय, दुसरी व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. हे देखील शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचे आहे. ’परिवर्तना’च्या तिसर्या सिद्धांतात ते म्हणतात की, एका वस्तूपासून अनेक वस्तू निर्माण होतात. म्हणजेच सगळ्या गोष्टी नैसर्गिक स्वरूपातच होतात, यात देवाचा काही संबंध नाही. एकंदरीत, त्यांना देव ही संकल्पना नाकारायची असल्याने, त्यांनी अशाप्रकारचे सिद्धांत निर्माण केले. आमची विचारसरणी ही शास्त्रीय आहे, हा त्यांचा दावा अतिशय पोकळ आहे. म्हणजेच, ‘कम्युनिझम’ ही अंधश्रद्धा आहे, असे म्हणायला हरकत नाही.
डाव्या चळवळी हे शोषितांचे उत्स्फूर्त उठाव होते; ज्यातून ‘स्वातंत्र्य’, ‘समता’, ‘बंधुभाव’ यांसारखी मूल्य निर्माण झाली असे म्हटले जाते. याविषयी काय सांगाल?
जग बदलण्यासाठी डाव्या चळवळी कारणीभूत होत्या, अशा स्वरूपाची मांडणी डाव्या विचारवंतांनी केली. त्यामुळेच अनेक लोक आजही याकडे आकर्षित होतात. त्या चळवळींचा थोडयात आढावा घेतला तर असे लक्षात येते की, पहिली चळवळ ज्यात शेतकरी असलेल्या शोषितांचा/वंचितांचा उठाव झाला, त्याला ‘बंशू मूव्हमेंट’ म्हणतात. मार्टिन ल्यूथर हा तेव्हा शेतकर्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्याने जमीनदारांना सांगितले की, ’ज्याप्रकारे तुम्ही वागताहेत, त्याअर्थी देवासमाोर तुम्हाला शरमेने मान खाली घालावी लागणार आहे.’ त्यामुळे जमीनदारांनी शेतकर्यांच्या काही मागण्या मानण्याचे ठरवले.
थॉमस मंजर या अतिरेकी विचारांच्या व्यक्तीने चळवळीत घुसखोरी करून, ती हिंसेच्या बाजूने वळवायला सुरुवात केली. त्याच्या प्रभावाखाली येऊन शोषित शेतकर्यांनी हिंसा सुरू केली, त्यात त्यांचाच बळी गेला. जे मार्टिन ल्यूथरच्या मध्यस्थीने मिळणार होते, तेही मिळाले नाही. म्हणजेच, डाव्या विचारांचे लोक अशा चळवळीत उडी मारून, ती ‘हायजॅक’ करतात आणि मग त्याला हिंसात्मक स्वरूप लागते. ‘फ्रेंच राज्यक्रांती’सुद्धा याचेच उदाहरण आहे, त्याबाबत विस्ताराने पुस्तकात वाचता येईल.
सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर डावा विचार संपला असे म्हटले जाते; पण तुम्ही डाव्या विचारांपासून जगाला धोका असल्याचे म्हणता, हे कसे काय?
"जगात जी क्रांती घडेल, ती बंदुकीच्या नळीतून येणारी क्रांती असेल, ती रक्तरंजित क्रांती असेल आणि सगळ्या जगातले कामगार एक होतील आणि ते ही क्रांती घडवतील, याने देशांच्या सीमा नष्ट होऊन, त्यांचे वेगळे अस्तित्व राहणार नाही”, असे कार्ल मार्स सांगतो. मात्र, त्याचे हे भाकित खोटे ठरले. अनेक देशांतील कामगार चळवळी पाहिल्या असतील, ज्यामध्ये अनेक कामगार देशासाठी लढल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कम्युनिस्टविश्वात भ्रम निर्माण झाला.
त्यातून जेव्हा डाव्यांनी विचारमंथन केले तेव्हा असे लक्षात आले की, पाश्चिमात्य संस्कृतीला कामगार चळवळीतील लोक आपली संस्कृती मानतात. त्यामुळे ते कम्युनिस्ट क्रांतीकडे आकर्षित होत नाहीत. जोपर्यंत संस्कृती नष्ट करत नाहीत, तोपर्यंत हे लोक आपल्याकडे आकर्षित होणार नाहीत. म्हणून संस्कृतीला बळ देणार्या संस्थांमध्ये घुसखोरी करून, त्यांना पोखरायचे डाव्यांनी ठरवले. ही प्रदीर्घकाळ चालणारी क्रांती होती. एखाद्या वाळवीसारखे काम करू, असे त्यांनी वर्णन केले होते. मानवी मनावर, धोरणांवर प्रभाव टाकणार्या संस्थांना पोखरायचे ठरवले. १९२० सालापासून संस्कृतीवर आघात करायचा ठरवलं. आज १०० वर्षांनंतर त्याचे उमटलेले परिणाम दिसून येत आहेत.