स्वमालकीच्या जागेवर गगनचुंबी टॉवर न उभारता, क्रीडा अकादमी सुरू करत नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी धडपडणार्या योगेश परमानंद कोठावळे यांच्याविषयी...
योगेश परमानंद कोठावळे यांचा जन्म १८ जानेवारी, १९७८ रोजी जुन्या नाशिकमध्ये झाला. वडील एसटी कामगार असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यात पाचजणांचा परिवार असल्याने, हौसमौज कधी पूर्ण झालीच नाही. कोठावळे यांचे शिक्षण नाशिकच्याच रवींद्रनाथ विद्यालयात मराठी माध्यमातून झाले, पण लहानपणापासूनच योगेश यांना खेळाची खूपच आवड होती. त्यातल्या त्यात क्रिकेटची जरा अधिकच असल्याने, सामने बघण्यासाठी ते शहरभर सायकलवर जात. योगेश यांनी आठवी-नववीपासूनच सीजन बॉल क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली; पण आतासारख्या विशेष अशा सुविधा नाशिकमध्ये तेव्हा नव्हत्या ना कोणती अॅकेडमी होती. असती तरी सर्वसाधारण माणसांना ते कुठे परवडणारे होत?. म्हणूनच फक्त मॅच बघायची आणि त्यातूनच मिळतील तितके क्रिकेटचे धडे गिरवायचे. पुढे बारावीचे शिक्षण विज्ञान शाखेमधून पूर्ण केल्यानंतर, चांदवड येथे सिव्हिल इंजिनिअरिंगला त्यांनी प्रवेश घेतला.
पण, शिक्षणाबरोबरच क्रिकेटची असलेली आवड योगेश यांना काही स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच महात्मानगर येथील ‘लोकमान्य क्रिकेट क्लब’मध्ये त्यांनी आपला संघ उतरवला. परंतु, घरच्यांना क्रिकेट खेळण्याबद्दल काहीच माहीत नसल्याने, योगेश त्यांच्या मित्रांकडे आपल्या वस्तू ठेवायचे. या स्पर्धेत त्यांचा संघ विजयी झाल्यावर, त्यांचे नाव पहिल्यांदाच वर्तमानपत्रामध्ये छापून आले. आपल्या मुलाच्या देदिप्यमान यशाबद्दल योगेश यांच्या आईवडिलांनी पहिल्यांदाच वर्तमानपत्रामध्ये वाचले. योगेश यांनी क्रिकेटची खूप आवड असल्याचे आईला सांगितलेे होेते. वर्तमानपत्रातील बातमी वाचून योगेश यांच्या आईने सांगितले की, "तुला जर क्रिकेट खेळायची आवड असेल, तर खोटे बोलून न जाता, घरी सांगून जात जा.” त्यानंतर योगेश यांना कधीच घरी खोटे बोलावे लागले नाही.
तेव्हा आम्ही मॅटवर खेळायचो, तर आताची खेळपट्टी ही ‘टर्फ विकेट’ असल्याची आठवण योगेश सांगातात. तेव्हा नाशिकमध्ये ‘टर्फ विकेट’ असती, तर नाशिकचे अनेक खेळाडू ‘रणजी’बरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील खेळले असते. खेळाविषयी प्रचंड आत्मियता असल्यानेच योगेश अजूनही क्रिकेट खेळतात. तसेच ते मुलांनाही खेळासाठी प्रोत्साहन देतात.
तुला कोणता खेळ आवडतो, असे त्यांनी आपल्या मुलांना विचारल्यानंतर मुलाने जिम्नॅस्टिक, तर मुलीने बास्केटबॉल निवडले. आपल्या व्यवसायात योगेश आणि त्यांच्या पत्नी हे उभयता व्यस्त असूनही, मुलांनी खेळामध्ये पुढे यावे असेदेखील दोघांना वाटे. शालेय जीवनात योगेश यांच्या पत्नी या क्रीडापटू असल्याने, खेळामध्ये मुलांचा विकास कसा होतो, हे त्यांना पक्के माहीत होते. खेळामध्ये असणार्या मुलांचे लक्ष इतर गोष्टींकडे जात नाही. त्यामुळे योगेश यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला खेळाशी जोडून घेतले; पण त्यांना खेळण्यासाठी अॅकेडमीत सोडणे व्यवसायामुळे शक्य होत नव्हते.
त्यांच्याप्रमाणेच शहरातील इतर पालकांचीही हीच समस्या होती. त्यातूनच योगेश यांना क्रीडा अकादमी सुरू करण्याची अभिनव संकल्पना सुचली. जर एकाच ठिकाणी सर्व खेळ उपलब्ध करून दिले, तर मुले आणि त्यांचे आईवडील दोघेही आनंदी राहतील. या कल्पनेतूनच दि. १० एप्रिल, २०२२ पासून योेगेश यांनी सिडको येथे ‘परमानंद स्पोर्ट्स’ नावाच्या अॅकेडमीचा श्रीगणेशा केला. सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त क्रिकेट आणि जिम्नॅस्टिक हे दोनच खेळ होते. त्यानंतर ते एक-एक खेळाची भर पडत गेली. सध्या त्यांच्या अॅकेडमीत ११ ऑलिम्पिक खेळ आहेत. यामध्ये बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक, बास्केटबॉल, फूटबॉल, क्रिकेट, आर्चरी, स्केटिंग, तायक्वांदो, तलवारबाजी, डान्स, झुंबा, बुद्धिबळ हे खेळ सध्या मुलांना शिकवले जातात. त्यांच्या अकादमीच्या अनेक विद्यार्थ्यांनी राज्य आणि देश पातळीवर, नाशिकचे नाव उज्ज्वल केल्याचे योगेश अभिमानाने सांगतात.
अकादमी सुरू करण्याच्या प्रवासाविषयी योगेश सांगतात की, आमच्याकडच्या मोकळ्या जागेवर मोठमोठे टॉवर उभे करून बक्कळ पैसा कमावता आला असता; पण आज मुलांना खेळताना पाहून मनाला जे समाधान मिळते, ते पैशातून मिळाले नसते. माझ्या अकादमीमध्ये येणारे खेळाडू इतके आनंदी असतात की, जाताना त्यांच्या चेहर्यावर असणारा आनंद आम्ही दररोज अनुभवतो. तसेच आम्ही दोन किंवा तीन तास मुलांना मोबाईलपासून दूर ठेवतो”. यामध्येदेखील आम्हाला खूप आनंद मिळत असल्याचे योगेश आठवणीने सांगतात. इथे येणारी मुले खेळण्याचा आनंद ते आपल्या घरी घेऊन जातात. यामधून व्यायाम खूप चांगला होत असल्याने, त्यांना एकदम शांत झोप लागते. यासोबतच अभ्यासातही चांगले लक्ष लागते. त्यामुळे योगेश यांची एवढीच इच्छा आहे की, त्यांच्या अकादमीच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हाव्यात. त्यामुळे प्रत्येक शहरात जाऊन योगेश यांना मुलांना खेळ शिकवता येतील. अशा या खेळवेड्या खेळाडूच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
- विराम गांगुर्डे