मुंबई : ( Vaishno Devi Medical Institute ) जम्मू-काश्मीर येथील श्री माता वैष्णोदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्सने त्यांच्या यावर्षीच्या प्रवेशामध्ये ५० उमेदवारांची यादी मंजूर केली. या यादीमध्ये ४२ मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यामुळे विश्व हिंदू परिषदेकडून कटरा येथील संस्थेच्या मुख्य इमारतीबाहेर निदर्शने करण्यात आली तसेच संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे पुतळेही जाळण्यात आले.
विश्व हिंदू परिषदेचे जम्मू काश्मीर अध्यक्ष राजेश गुप्ता म्हणाले की, २०२५-२६ साली दिलेले प्रवेश थांबवले पाहिजेत. महाविद्यालयाने या निर्णयातील चूका सुधारून पुढील वर्षी हिंदू विद्यार्थी असल्याची खात्री करून घ्यावी. बजरंग दलाचे जम्मू काश्मीरचे अध्यक्ष राकेश बजरंगी यांनी ही यादी पक्षपाती धोरणातून केल्याची टिका केली.
ते म्हणाले की, मंडळाच्या व्यवस्थापनाने त्याऐवजी केंद्राच्या एनईईटी मधून प्रवेश द्यायला हवा होता, ज्यात देशभरातील उमेदवार होते. श्री माता वैष्णोदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल हे महाविद्यालय देशभरातील यात्रेकरूंच्या देणग्यांमधून स्थापन करण्यात आले आहे. काश्मीरमधील उमेदवारांनी इतर कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यास आम्हाला हरकत नाही, परंतु वैष्णोदेवी महाविद्यालयात हिंदू उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवाव्यात, कारण त्यात वैष्णोदेवी मंदिरासाठी हिंदू भाविकांकडून देणगी देण्यात आली आहे.
उधमपूरचे भाजप आमदार आर. एस. पठाणिया यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, वैष्णोदेवी मंदिराला दिलेल्या देणग्यांद्वारे स्थापन करण्यात आलेल्या संस्थेत मुस्लिम समाजाचे वर्चस्व नसावे आणि जागा हिंदूंसाठी राखीव ठेवाव्यात, असे त्यांनी सांगितले.