वाळूशिल्पकाराचा कॅनव्हासवर कलाविष्कार

22 Nov 2025 10:37:08
 
Sudarshan Patnaik
 
मुंबईतील प्रभादेवीच्या ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’ येथे दि. १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये प्रख्यात वाळूशिल्पकार ‘पद्मश्री’ सुदर्शन पटनायक यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जगाच्या पाठीवर भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या आणि वाळूशिल्पकलेला आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त करुन देणार्‍या या दिग्गज कलाकाराच्या चित्रकृतींचा आस्वाद पहिल्यांदाच मुंबईकरांना घेता येणार आहे.
 
वाळूशिल्पकार म्हणून माझा प्रवास खूप पूर्वीपासून सुरू झाला. प्रत्येक कलाकार आपल्या कलेतून काही ना काही संदेश देत असतो. मला वाटतं, समाज सकारात्मक ठेवणे हे कलाकाराचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन प्रख्यात वाळूशिल्पकार ‘पद्मश्री’ सुदर्शन पटनायक यांनी केले. मुंबईच्या प्रभादेवी येथील ‘पु. ल. देशपांडे कला अकादमी’ येथे आपल्या कलाप्रदर्शनावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना पटनायक म्हणाले की, "कुठल्याही कलाकारासाठी सन्मान, पुरस्कार या गोष्टी महत्त्वाच्या असतातच. मात्र, त्याहून मोठी गोष्टी म्हणजे त्याचे कर्म. त्याची खरी ओळख त्याच्या रचनेतून प्रेक्षकांना होत असते. माझ्यासाठी वाळू हेच माझं कॅनव्हास आहे.”
 
आतापर्यंत ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पटनायक यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले असून, त्यांनी घडवलेल्या शिल्पांमधून पर्यावरणसंवर्धन, सामाजिक जाण, मानवी मूल्ये अशा प्रकारचा संदेश दिला आहे. २०१४ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले. २०२४ साली रशियातील ‘गोल्डन सॅण्ड मास्टर अ‍ॅवॉर्ड’ आणि २०२५ साली इंग्लंडमधील ‘फ्रेड डॅरिंग्टन सॅण्ड अ‍ॅवॉर्ड’ने त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक वाळूशिल्पकलेत नवीन क्षितिजं शोधत आहेत.
 
वाळूशिल्पकलेमध्ये आपल्या कामाची मोहोर उमटवणारे सुदर्शन पटनायक ज्याक्षणी चित्रविश्वामध्ये प्रवेश करतात; तेव्हा त्यांच्या हातून आपोआप निसर्गसृष्टीचं सौंदर्य रेखाटलं जातं. कलादालनामध्ये त्यांचे चित्रवैभव अनुभवताना, आपल्याला असे दिसून येते की, निसर्ग हा केवळ त्यांच्या कामाचा भाग नसून, तो त्यांच्या जीवनाचासुद्धा अविभाज्य घटक झाला आहे. पृथ्वीतलावरील निसर्गतत्त्वांना त्यांनी माणसांच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये अत्यंत समर्थपणे गुंफले आहे. मानवाचा विचार निसर्गाला सोडून स्वतंत्र करता येत नाही. आणि निसर्गाचेसुद्धा अनुबंध माणसाच्या जीवनाशी खोलवर जोडलेले असतात, याची आपल्याला चित्र बघताना प्रचिती येते.
 
हा विचार मांडताना, आपसूकच सनातन धर्माची ज्ञान प्रतीके कॅनव्हासवर उमटतात. निळ्या रंगांच्या छटांमध्ये साकारलेले श्रीगणेशाचे चित्र मनमोहक तर आहेच, त्याचबरोबर बुद्धीच्या देवतेचं आगळंवेगळं रुप दर्शवणारं आहे. या चित्रांमध्ये व्यक्त-अव्यक्त भावनांचे मिश्रण, तर आहेच; मात्र त्याचबरोबर या चित्रांना शांततेची किनार आहे. ही शांतता या सर्व तत्त्वांच्या अनुभूतीतून घडणारी आहे, म्हणूनच ती प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. हातातून निसटणार्‍या क्षणभंगुर वाळूवर काम करताना, जितया सफाईदरपणे ते काम करतात, तितकेच किंबहुना काकणभर जास्त जीव ते कोर्‍या कॅनव्हासवर ओतून रंगांचे शिल्पं घडवतात. कलाकृती ही कलाकाराला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जगण्याचे समाधान तर देतेच; मात्र त्याचसोबत समाजामध्ये नवा विचार पेरण्याचे कामसुद्धा सातत्याने करत असते. पेरला जाणारा हा विचार सकारात्मक असायला हवा, असा विचार करणारे सुदर्शन पटनायक म्हणजे येणार्‍या पिढीतील कलाकारांसाठी दीपस्तंभ आहेत.
 
Powered By Sangraha 9.0