मुंबई : ( Tipu Sultan Jayanti ) बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रूरकर्मा टीपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय परिपत्रकात कोणताही उल्लेख नसताना एका क्रूर शासकाचे उदात्तीकरण करणे हा नियमांचा भंग आहे. या राष्ट्रद्रोही कृत्यासाठी संबंधित शिक्षक, आयोजक आणि शिक्षण अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली.
हिंदू जनजागृती समितीकडून सांगण्यात आले की, टीपू सुलतानने सक्तीने हिंदुचे धर्मपरिवर्तन, मंदिरांचा विध्वंस आणि हजारो निष्पाप हिंदुच्या हत्यांची क्रूरकृत्ये केली आहेत. एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपत असताना शासकीय यंत्रणेचा भाग असलेल्या शाळेत अशा क्रूरकर्मा व्यक्तीचे उदात्तीकरण करणे म्हणजे पुढील पिढीला चुकीचा इतिहास शिकवून राष्ट्रविरोधी प्रवृत्तींना खतपाणी घालण्यासारखे आहे.
समितीने सांगितले की, हा कार्यक्रम आयोजित करणारे शिक्षक, मुख्याध्यापक व निष्काळजी शिक्षण अधिकारी यांच्यावर भारतीय दंड संहिते अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे आणि राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तातडीने गुन्हा दाखल करावा. तसेच संबंधित शिक्षकांचे त्वरित निलंबन करावे. जर या प्रकरणातील सूत्रधारांवर तातडीने आणि कठोर कारवाई झाली नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.