_202511221030164743_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
पुणे महानगरपालिकेचा अलीकडील काळातील कारभार अतिशय गलथान आणि सामान्य नागरिकांच्या अपेक्षांना धुळीस मिळवणारा असाच. एकीकडे महानगरात धुळीच्या कणांचे जागोजागी ढीग होत असताना, प्रदूषणाची पातळी अधिक वाढत असताना, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत असताना, त्यावर उपाय शोधण्याचे सोडून महापालिकेने कालपरवा काढलेला एक आदेश अजबच आहे. त्यामुळे नागरिकांना ‘हे राम‘ म्हणण्याचीच वेळ आली आहे. महानगरातील तापमान गेल्या आठवड्यापासून अतिशय घसरले आहे.
‘थंडी म्हणते मी...’चा प्रत्यय पुणेकर घेत आहेत. आता काळ बदलला आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्याचे उपाय आणि साधनांचा वापरदेखील नागरिक आपापल्यापरीने करत आहेत. तथापि, पुणे महापालिकेने जे यासंदर्भात आदेश काढले आहेत, ते अतिशय हास्यास्पद आणि बालिश असेच. प्रदूषण नियंत्रण कायद्यातील तरतुदींचा आधार घेत, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी चक्क शेकोटी पेटवण्यावर महानगरात बंदी आणली. त्यामुळे त्यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यांचा निर्णय कायद्यातील तरतुदींनुसार योग्य असला, तरी महानगरात जे वाहनांमुळे, धुळीमुळे, कर्कश्श आवाजांमुळे प्रदूषण होते, त्यावर नियंत्रण आणायचे सोडून, ते करणार्यांना शिक्षा द्यायचे सोडून ‘इन मिन साडेतीन’ महिने असलेल्या थंडीत शेकोटी पेटवणार्यांवर कायद्याचा बडगा उगारणे कितपत संयुक्तिक, हे ‘राम‘च जाणोत.
अलीकडील काळातील काही प्रदूषणवाढीची पुणे महानगरातील उदाहरणे घेतली, तर सध्या रस्तेदुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रचंड धुळीकण हवेत पसरत आहेत. वाहतूककोंडी तर नित्याचीच असल्याने, यामुळे होणारे वायू आणि ध्वनिप्रदूषण तर नागरिकांच्या आरोग्यावर नेहमीच विपरीत परिणाम करणारे. याकडे प्रभावी उपाययोजना करायचे सोडून, थंडी आली म्हणून शेकोटी पेटवू नका, असे सांगितल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. नवल किशोर राम आयुक्त म्हणून रूजू झाल्यावर नागरिकांना परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, एकंदरीत शहरातील रस्ते आणि प्रदूषण आणि वाढत्या समस्या पाहता, आपसूकच नागरिकांच्या ओठी ‘हे राम‘ शब्द येतात, त्याला कोण काय करणार?
हे पार्थ...
‘महाभारत’ ज्यांना समजले, त्यांना ‘हे पार्थ...‘ हा संवाद सुरू करण्याच्या प्रवासाबद्दल उमगले असेल. मात्र, ज्यांना मूळ ‘महाभारत’च कळले नाही, ते आजच्या काळात रोज होणार्या महाभारतातील ‘श्रीकृष्ण’ आणि ‘पार्थ’ कोण ही पात्रे शोधत राहतात आणि कौरवांवर तोंडसुख घेतात, तर कधी त्यांचे उदात्तीकरणदेखील करतात. त्यामुळे आजच्या काळातील महाभारतातील पात्रे प्रबोधनापेक्षा मनोरंजनच अधिक करत असतात, हे कित्येकदा अनेक प्रकरणांवरून किंबहुना, घडलेल्या महाभारतावरून स्पष्ट होत गेले आहे.
आतादेखील समाजात अनेक प्रकारचे प्रसंग महाभारतातील प्रसंगांशी साधर्म्य असणारे बघायला मिळतात. यातून कदाचित, कुणाचे वैयक्तिक आणि सामाजिकदेखील नुकसान होत असते. त्याचे दूरगामी वाईट परिणामदेखील होत असतात. तथापि, आजकाल महाभारत घडेपर्यंत प्रकरणे ताणण्याची जी चढाओढ सुरू झाली आहे, तिच मुळी विस्मयकारक आहे. केवळ योग्य संवादाचा, समन्वयाचा आणि समजूतदारपणाचा अभाव असल्याने असे घडत असते. यामुळे जे काही घडते, त्यामुळे त्या व्यक्तीचा, ती व्यक्ती ज्या यंत्रणेपर्यंत पोहचते त्या यंत्रणेचा आणि न्याय करणार्या स्तंभाचा मात्र विनाकारण वेळ वाया जात असतो.
आजकाल तर चक्क प्राचीन महाभारतातील मुख्य पात्र असलेल्या ‘पार्थ‘चे नाव असलेल्या व्यक्तीबाबत हे आधुनिक काळातील ‘महाभारत’ घडले आहे. त्यामुळे या पार्थच्या बाबतीत दररोज जे काही नवेनवे खुलासे बाहेर येत आहेत, तो ज्या अवस्थेत भरकटला अथवा फसला आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी होत असलेले प्रयत्न ‘योग्य‘ आहेत की, त्या ‘पार्थ‘ने केलेले कारनामे ‘अयोग्य‘ आहेत, यावरच मंथन होत आहे. समाजाने यातून काय ‘बोध‘ घ्यायचा तो घेतला असेलच. मात्र, या अशा महाभारताचे स्तोम अधिक पसरता कामा नये आणि त्यात नेमका कोणी ‘पार्थ‘च अडकता कामा नये, ही रास्त अपेक्षा सामान्यांनी ठेवली तर चुकले कुठे? कौरवांना मोकळे रान मिळता कामा नये, यासाठी ‘पार्थ’ला वाचवणे गरजेचे आहे, जेणेकरून त्याने कौरवांशी सामना करण्याचे धाडस अंगी आणावे, अन्यथा, ‘अरे बाबा पार्थ‘ म्हणायची पाळी ‘कोणावर‘ आली, तर ही शोकांतिकाच ठरेल!
- अतुल तांदळीकर