मुंबई : ( RSS chief Dr. Mohanji Bhagwat ) भारतासहित अनेक देशांवर आक्रमणे झाली यामध्ये अनेक राष्ट्रे नष्ट झाली. युनान, मिस्र आणि रोमच्या संस्कृती पृथ्वीवरून नष्ट झाल्या. परंतु हिंदू समाजाचे जाळे असे आहे की हिंदू समुदाय या विश्वात नेहमीच टिकून आहे. जोपर्यंत हिंदू समाज टिकून आहे तोपर्यंतच जगाचे अस्तित्व आहे, कारण जगाला धर्म देण्याचे कार्य फक्त हिंदूच करू शकतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. मनिपूरच्या इंफाळ येथे एका कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित होते.
ते म्हणाले की, हिंदू संस्कृतीचे जाळे अशारितीने विनलेले आहे की, हे विश्व आहे तोपर्यत हिंदू समुदाय नेहमीच टिकून राहणार आहे. भारताने वेगवेगळ्या राष्ट्रांचा उदय आणि पतन पाहिले आहे, परंतु भारत टिकून आहे. भारत ही एक अमर संस्कृती आहे.
ते पुढे म्हणाले की, महाभारत, रामायण आणि कालिदासच्या महान साहित्यात भारतवर्षाचा संपूर्ण उल्लेख आहे. भारतवर्ष' म्हणजे मणिपूरपासून अफगाणिस्तानपर्यंतचा भूभाग अशी व्याख्या करण्यात आली आहे. भारताने राज्ये बदलताना पाहिली आहेत,अनेक राजे पाहिले आहेत. अनेकदा देशात अनेक राजे होते तर काही वेळा एकच महान शासक होता. काही वेळा आपण स्वतंत्र होतो तर काही वेळा आपल्यावर हल्ले होत होते. पण भारत या सर्व परिस्थितीत मजबूत राहिला आणि एक अखंड ऐतिहासिक देश म्हणून उभा राहिला.
सरसंघचालक तीन दिवसांच्या मनिपूर प्रवासात असून त्यांनी यावेळी मणिपूरच्या इम्फाळमध्ये आदिवासी नेत्यांची भेट घेतली आणि त्यांना सामाजिक एकतेचे आवाहन केले. भारताच्या सामायिक जाणीवेवर भर देत त्यांनी सांगितले की, एकतेसाठी एकरूपतेची आवश्यकता नाही, विविधतेत देखील एकता आहे.