जागतिक स्तरावर जलवाहतुकीत हरितक्रांती वेग घेत आहे. जागतिक कार्बन उत्सर्जनात शिपिंग उद्योगाचा वाटा हा जवळपास तीन टक्के. त्यामुळे कित्येक देश आता एलएनजी, हायड्रोजन, अमोनिया, मिथेनॉल आणि बॅटरीचलित जहाजांसारख्या स्वच्छ पर्यायांकडे वळत आहेत. युरोपने ‘ग्रीन पोर्ट्स’ आणि शून्य उत्सर्जन जहाजांसाठी कठोर धोरणे लागू केली आहेत, तर जपान, चीन आणि नॉर्वे स्वयंचलित व इलेट्रिक जहाजांचे नेतृत्व करत आहेत. ‘इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन’ (आयएमओ)ने २०५०पर्यंत नेट-शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य घोषित केले आहे. हरित इंधन, स्मार्ट नेव्हिगेशन आणि ऊर्जा-कार्यक्षम डिझाईनमुळे जागतिक जलवाहतूक आता शाश्वत आणि तंत्रज्ञाननिष्ठ भविष्याकडे वेगाने वाटचाल करत आहे.
चीनमध्ये हरितऊर्जा आणि स्मार्ट जल परिवहनक्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. याच दिशेने ‘वुहू शिपयार्ड’ आणि ‘सँडियनशुई न्यू एनर्जी टेनॉलॉजी’ यांनी संयुक्तपणे विकसित केलेले ‘पफर फिश ब्ल्यू ०१’ हे बॅटरीवर चालणारे कार्गो जहाज सध्या विशेष चर्चेत आहे. अंतर्गत जलमार्गांसाठी बनवलेले हे आधुनिक जहाज अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरत असून, ‘स्वॅपेबल’ म्हणजेच बदली करता येणार्या बॅटरींची सोय ही त्याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
हे जहाज ८८.९ मीटर लांब, १३.२ मीटर रुंद आणि ३.४ मीटर रचनेसह सुमारे तीन हजार टन वहनक्षमता राखते. अंतर्गत जलवाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन ते अत्यंत संतुलित आणि बहुउद्देशीय स्वरूपात तयार केले आहे. जहाजामध्ये १३२ स्टँडर्ड, २० फूट कंटेनर्स किंवा तितयाच वजनाच्या मोठ्या प्रमाणातील बल्क मालाची वाहतूक करता येते. म्हणजेच हे जहाज कंटेनर आणि बल्क कार्गो या दोन्ही प्रकारच्या वाहतुकीसाठी योग्य आहे.
जहाजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे फॉरवर्ड ब्रिज डिझाईन. पूल जहाजाच्या अगदी पुढील भागात असल्यामुळे चालक दलाला पुढील दिशेचे अत्यंत स्पष्ट दृश्य मिळते, जे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. तसेच, जहाजाचा नाकाचा भाग वायुगतिकीय पद्धतीने डिझाईन केल्याने वार्याचा प्रतिकार कमी होतो आणि कमी उर्जेत जास्त वेग मिळतो. ऊर्जा कार्यक्षमतेचा हा गुणधर्म बॅटरीआधारित जहाजांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. पारंपरिक बॅटरीचलित जहाजांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे चार्जिंग वेळ असते. अनेक अंतर्गत बंदरांमध्ये आजही पुरेशा चार्जिंग सुविधा नसतात. या वास्तवामुळे बॅटरीचलित जहाजांना अनेकदा पाच ते आठ तास किनार्यावर थांबावे लागते, ज्यामुळे दिवसातील फेर्या कमी होतात आणि ऑपरेशनल कार्यक्षमता घटते.
‘पफर फिश ब्ल्यू ०१’मध्ये यावर अनोखा उपाय करण्यात आला आहे. जहाजात सहा ४३० किलोवॅट प्रतितास स्वॅपेबल बॅटर्या बसवण्यात आल्या आहेत. या बॅटर्या केवळ ३० मिनिटांत बदलता येतात. इतकेच नव्हे, तर यासाठी विशेष बंदर उपकरणांचीही गरज नसते. त्यामुळे जहाजाला केवळ अर्धा तास थांबावे लागते आणि लगेच ते पुढील प्रवासासाठी सज्ज होते. हे मॉडेल भविष्यातील व्यावसायिक जलवाहतुकीसाठी अत्यंत क्रांतिकारक मानले जात आहे. प्रत्येक बॅटरीचे वजन सुमारे चार टन असून, त्यांची रचना पूर्णपणे मानकीकृत आहे. या मानकीकरणामुळे त्यांचे उत्पादन, देखभाल व जीवनचक्र खर्च २० टक्क्यांपर्यंत कमी होतात. बॅटर्या खार्या पाण्याचा फवारा, कंप, तापमानातील बदल अशा विविध परिस्थितींमध्ये टिकून राहण्यास सक्षम आहेत. जहाज काही बॅटर्या कमी असूनही सुरक्षितपणे चालवता येते, त्यामुळे छोट्या मार्गांसाठी अधिक लवचीकता मिळते.
या जहाजामध्ये आधुनिक इंटेलिजन्ट ब्रिज, ३६० अंशांचे कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टम, स्वयंचलित बर्थिंग व अनबर्थिंग सिस्टम, तसेच सुधारित क्रू कॅबिन्स आहेत. विशिष्टपणे, या जहाजात वापरलेले ‘व्हेईकल-ग्रेड इंजिन्स’ हे व्यापारी जहाजावर वापरलेले पहिले इंजिन्स मानले जात आहेत. या सर्व स्वयंचलित प्रणालींमुळे जहाजावर काम करणार्या कर्मचार्यांची संख्या कमी ठेवता येते आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढते. ‘चायना लासिफिकेशन सोसायटी’च्या मानकांनुसार तयार केलेले हे जहाज आता ‘हेफेई-वूहू’ या यांगत्से नदीच्या मार्गावर सेवेसाठी तयार आहे. चीनमध्ये हरितऊर्जा, स्मार्ट नेव्हिगेशन आणि स्वयंचलित जहाज तंत्रज्ञानाला चालना देणार्या प्रकल्पांमध्ये ‘पफर फिश ब्ल्यू ०१’ हे एक मैलाचा दगड ठरत आहे.