द प्रोटोकॉल ऑफ एल्डर्स ऑफ झिऑन

22 Nov 2025 10:03:04

Conspiracy theory
 
नोव्हेंबर महिना आला की, अनेकांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांच्या रहस्यमय खुनाची आठवण होते. दि. २२ नोव्हेंबर, १९६३ या दिवशी जॉन केनेडी एका मारेकर्‍याच्या गोळीला बळी पडले होते. त्यांचा खुनी ली हार्वे ओस्वाल्ड हा पकडला गेला; पण दोनच दिवसांनी जॅक रुबी नावाच्या माणसाने, पोलिसांच्या देखतच त्याला गोळी घातली. न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना जॅक रुबी तुरुंगातच मरण पावला. या सगळ्या घटनाक्रमामुळे अमेरिकन जनतेला आजही असे ठामपणे वाटते की, केनेडींच्या खुनामागे मोठे कारस्थान असावे. जाणून घेऊया अशा ‘कॉन्स्पिरसी थिअरी’बद्दल...
 
प्रस्तावनेत दिलेल्या केनेडींच्या खुनाबद्दलच्या समजुतींप्रमाणेच, पाश्चिमात्य जगात अनेक ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’- कारस्थान सिद्धांत प्रसिद्ध आणि लोकप्रियसुद्धा आहेत. दुसर्‍या महायुद्धात अमेरिका प्रथमपासून सहभागी नव्हती; पण जपानने अमेरिकेच्या ‘पर्ल हार्बर’ या नाविक अड्ड्यावर आकस्मिक हल्ला चढवून, अमेरिकन नौदलाची जबर हानी केली. मग, अमेरिका सर्व शक्तीनिशी महायुद्धात उतरली. ‘कॉन्स्पिरसी थिअरी’वाल्या लोकांचे असे म्हणणे आहे की, जपान असा हल्ला करणार आहे याची पक्की खबर राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्टला मिळालेली होती. तो या हल्ल्याला प्रतिकारही अर्थातच करू शकला असता; पण त्याने मुद्दाम हल्ला होऊ दिला. त्यामुळे अमेरिकन सैन्यदले आणि जनता पेटून उठली. रुझवेल्टला युद्धासाठी वाटेल तितकी रक्कम खर्चायला अमेरिकन संसदेने एकमुखी संमती दिली. हेच त्याला हवे होते, इत्यादि.
 
पाश्चिमात्य जनतेला सर्वात आवडणारा आणि सर्वात जास्त भेडसावणारा कारस्थान सिद्धांत म्हणजे कोणीतरी एक फार मोठ्या शक्तीचा, माणसांचा गट जगात कुठेतरी एका अज्ञात ठिकाणी बसलेला आहे. हा गट छोटा आहे; पण त्यांची कारस्थानी शक्ती अफाट आहे. या शक्तीचा वापर करून या गटाला संपूर्ण जगावर राज्य करायचे आहे. या गटाचे माहीत असलेले नाव आहे ‘इल्युमिनाटी’. पाश्चिमात्यांच्या मते, हा गट गेली किमान दोन हजार वर्षे किंवा कदाचित त्याच्या आधीपासूनही अस्तित्वात आहे. म्हणजेच येशू ख्रिस्ताच्याही पूर्वीपासून या गटाच्या घातक कारवाया चालूच आहेत मात्र, अजून तरी त्यांचे कारस्थान सफल होऊ शकलेले नाही, इत्यादि.
 
‘इल्युमिनाटी’बद्दल कथा-कादंबर्‍यांमध्ये भरपूर लिहून झालेले आहे, आजही होत असते. अलीकडचे लोकप्रिय लेखक डॅन ब्राउन यांच्या कादंबर्‍यांमध्येही, याबाबत बरेच तपशील येत असतात. सन १७७६ मध्ये बव्हेरियामध्ये खरोखरच ‘इल्युमिनाटी’ नावाची संस्था स्थापन झाली; पण लौकरच बव्हेरियन सरकारने तिच्यावर बंदी घातली. आता या सगळ्याचा ज्यू लोकांशी काय संबंध? उघडपणे काहीच नाही; पण पाश्चिमात्य समाजाची अशी मनोमन समजूत आहे की, जगावर राज्य करण्याच्या या मनसुब्याच्या पाठीमागे ज्यू लोक आहेत. या समजुतीचा इतिहास येशू ख्रिस्तापर्यंत जातो.
 
पॅलेस्टाईन ही ज्यू लोकांची भूमी. जेरुसलेममधल्या ‘झिऑन’ या टेकडीवर, ज्यू सम्राट डेव्हिड याने ज्यूंचा देव ‘येहोवा’ याचे देऊळ बांधले. त्याचा मुलगा सम्राट सॉलोमन याने ते आणखी मोठे केले. पुढे पॅलेस्टाईन रोमनांनी जिंकले आणि ज्यू लोकांना गुलाम बनवले. या गुलाम ज्यू समाजातच येशू नावाचा माणूस जन्मला. त्याने ‘शबलित’ झालेली ज्यू धर्मतत्त्वे, जनतेला नव्याने सांगायला सुरुवात केली. ज्यू धर्ममार्तंडांना हा आपला अपमान वाटला. त्यांनी रोमन मालकांचे कान फुंकून, येशूला देहान्त शिक्षा देववली. भयभीत झालेले येशूगण दशदिशांना पळाले. तिथे त्यांना ख्राईस्टचे अनुयायी म्हणून ‘ख्रिश्चन’ असे नाव मिळाले.
 
इकडे आणखी काही काळाने, रोमन मालक ज्यू गुलामांवर भयंकर रागावले. त्यांनी संपूर्ण ज्यू जमातीला पॅलेस्टाईनमधून हद्दपार केले. हे हद्दपार ज्यू युरोपातल्या विविध देशांमध्ये जाऊन वसले. आफ्रिकेत, आशियात, अगदी भारतातसुद्धा आले. अशी तीनशे वर्षे उलटली. या काळात येशूच्या परागंदा शिष्यांनी ठिकठिकाणी मठ स्थापना करून, सर्वसामान्य जनतेत भलतीच लोकप्रियता मिळवली. त्याच सुमारास रोमन साम्राज्याचा डोलारा डळमळू लागला. त्याला आधार देण्यासाठी, खुद्द रोमन सम्राटाने सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय झालेला येशूचा धर्म स्वीकारला. झाले, राजाश्रय मिळाल्यामुळे येशूचा धर्म युरोपातले एकापाठोपाठ एक देश स्वीकारू लागले.
 
संपूर्ण युरोपखंड अशाप्रकारे ख्रिश्चन झाल्यावर त्यांचे लक्ष ज्यूंकडे वळले. या लोकांमुळे आपला देवपुत्र येशू याला क्रुसावर बळी जावे लागले मग, आता यांच्यावर सूड उगवा. तेव्हापासून म्हणजे सुमारे १०व्या शतकापासून १८व्या शतकापर्यंत, युरोपातल्या सर्व देशांनी ज्यूंचा कमालीचा छळ केला. त्यांना ‘गावकुसाबाहेरचे’ ठरवून टाकले. ख्रिश्चनांपैकी अनेक जाणत्या लोकांना हे आवडत नव्हते; पण जाहीरपणे तसे कोणी म्हणत नव्हते. अखेर सन १७९० साली अमेरिका या नवस्वतंत्र राष्ट्राचा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन याने जाहीर पत्र लिहून, ज्यू लोकांवरचा सामाजिक बहिष्कार उठवला. सन १७९१ साली फ्रेंच क्रांतिकारक राजवटीने आपले ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ हे सूत्र फ्रान्समधल्या सुमारे ४० हजार ज्यू लोकांनाही लागू आहे, असे जाहीर केले. नेपोलियन बोनापार्टनेही ज्यू लोकांना फ्रेंच नागरिकांइतयाच समानतेचा दर्जा दिला. मग, युुरोपातल्या अनेक सरकारांनी ज्यूंवरची ही बंदी उठवली. या कालखंडाला ‘ज्यू मुक्ती काळ’ असे म्हणतात.
 
परंतु, अनेकांना विशेषतः जर्मन आणि रशियन लोकांना हे आवडत नव्हते. त्यांच्यापैकीच एक जर्मन पत्रकार विल्हेल्म मार याने, सन १८७९ साली ’लीग ऑफ अँटिसेमेटिझम’ अशी संस्थाच स्थापन केली. हे ज्यू लोक ‘सेमाईट’ वंशाचे आहेत, म्हणजेच ते परके आहेत, बाहेरचे आहेत, ते कधीच पूर्णपणे युरोपीय होऊ शकणार नाहीत, असे या लीगवाल्यांचे म्हणणे होते. १९०३ साली रशियातून एक संशोधन बाहेर पडले आणि संपूर्ण ख्रिश्चन जगात पसरले. या दस्तऐवजाचे नाव होते, ‘द प्रोटोकॉल ऑफ द एल्डर्स ऑफ झिऑन’. प्रोटोकॉल म्हणजे बैठकीची मिनिट्स किंवा वृत्त. स्वतःला ज्यूंच्या पवित्र ‘झिऑन’ तीर्थक्षेत्राचेे ज्येष्ठ साधक म्हणवणारे काही ज्यू लोक कुठेतरी एकत्र जमले होते, त्यांच्या बैठकीचे हे वृत्त. संपूर्ण जगाची विविध क्षेत्रे क्रमश: ताब्यात घेत, एक दिवस संपूर्ण जगावर आपला अंमल बसवण्याचे हे एक जबरदस्त कारस्थान होते.
 
जगभरचे लोक थक्क झाले. अमेरिकेतला अग्रगण्य कारखानदार आणि मोटार संशोधक हेन्री फोर्ड याने, ज्यू लोकांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. तेवढ्यात युरोपात महायुद्ध पेटले. १९१७ साली रशियात क्रांती झाली. क्रांतिकारक साम्यवाद्यांनी सत्तेवर आल्यावर जर्मनीशी तह करून, युद्धातून अंग काढून घेतले. १९१८ साली जर्मनीच्या पराभवाने युद्ध संपले. साम्यवादी रशियन्स आणि जर्मन्स दोघांनाही, आपल्या हानीचे खापर फोडायला ‘ज्यू’ हा ‘बळीचा बकरा’ मिळाला. त्यामुळेच दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हिटलरने जशा ज्यूंच्या कत्तली केल्या, तशाच रशियनांनीही केल्या.
 
दुसर्‍या महायुद्धानंतर लगेचच इस्रायल देश निर्माण झाला. आता जगभरच्या ज्यू समुदायाचे दोन देश झाले, एक इस्रायल आणि अमेरिका. अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेला ज्यू समाज स्वत:ला फक्त एक धार्मिक समाज मानत होता, तर इस्रायलमधला ज्यू समाज स्वतःला राष्ट्रीय मानत होता. मध्यंतरी असे सिद्ध झाले की, ‘प्रोटोकॉल ऑफ झिऑन’ हे संशोधन पूर्णपणे खोटे होेते. रशियातील जनमत ज्यूविरुद्ध संतप्त व्हावे म्हणून, रशियन गुप्तहेर संघटना ‘उखराना’ हिने हा भयंकर बनाव घडवून आणला होता.
 
हा सगळा इतिहास पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, पाश्चिमात्य जगात सध्या पुन्हा ‘अँटिसेमेटिझम’ बळावले आहे. ऑक्टोबर, २०२३ मध्ये ‘हमास’ने गाझापट्टीत इस्रायली समारंभावर अतिरेकी हल्ला केला. तेव्हापासून आज दोन वर्षे उलटून गेल्यावरही, ‘हमास’ आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरूच आहे. इस्रायल त्यांच्या खास शैलीत ‘हमास’चा हुरडा भाजून काढतो आहे.
यावेळी प्रथमच असे घडते आहे की, युरोपात आणि अमेरिकेत ख्रिश्चन नागरिक मोर्चे काढून पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहेत, नि विशेषतः इस्रायलचा निषेध करत आहेत. ‘इंतिफदा’ म्हणजेच इस्रायली दडपशाहीविरुद्धचे बंड हे जगभर पसरवा. ‘ग्लोबलाईझ इंतिफदा’ अशी त्यांची घोषणा आहे. हे लोक उदारमतवादी आहेत, हे वेगळे सांगायला नकोच.
 
राहूनराहून आश्चर्य वाटते की, मुठभर ज्यू लोकांना जगावर राज्य करायचे आहे, या कारस्थान सिद्धांतावर तुम्ही विश्वास ठेवता आाणि घातकी ‘हमास’ला पाठिंबा देता. मग, आम्हाला जगावर राज्य करायचे आहे असे मुसलमान उघडउघड सांगताहेत आणि त्याचप्रमाणे वागतसुद्धा आहेत, तरी तुमच्या उदार मनाला तेच आवडतात? ’विनाशकाळ जवळी येता, मनुजा सुबुद्धि न सुचे!’
यातला वांशिक दृष्टीचा मुद्दा तर आणखीनच चमत्कारिक आहे. युरोपीय लोक मुख्यतः जर्मेनिक रोमेनिक, केल्टिक, ग्रीक, बाल्टिक, आल्बेनियम, फिनो-उर्गिक आणि स्लाव्हिक या वंशाचे आहेत. हे मुख्य वंश झाले. याखेरीज इतर कित्येक बारीकसारीक वंशांचेही लोक युरोपात आहेत. मग, त्यांच्यात काय समान आहे? तर ते रंगाने गोरे आहेत बस्स, एवढीच समानता आहे.
 
आता पॅलेस्टाईनमधले लोक आशियायी असल्यामुळे निमगोरे आहेत. ‘बायबल’चे ‘ओल्ड टेस्टामेंट’ म्हणते की, ज्या ‘नोहा’ नावाच्या प्रेषिताने महाप्रलयानंतर पुन्हा जीवनक्रम सुरू केला, त्याचा ‘शेम’ किंवा ‘सेम’ नावाचा पुत्र होता. त्याची संतती म्हणजे ‘सेमाईट’ लोक, म्हणजेच ज्यू लोक. मग, येशू ख्रिस्तपण मूलत: ज्यूच होता, म्हणजेच तोसुद्धा निमगोरा आशियायी, सेमाईट ज्यू होता. परंतु, युरोपीय गोर्‍या ख्रिश्चनांनी येशूला आपल्यातला ठरवून टाकलेले आहे. त्यामुळे ‘अँटिसेमेटिझम’ किंवा ज्यूंचा द्वेष म्हणजे, जे ज्यू धर्माचे पालन करतात त्यांचा द्वेष. आता यातही वांधा आहेच.
 
गेल्या अनेक शतकांमध्ये बहिष्कार, छळ यांना कंटाळून अनेक ज्यू लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. आज ते अनेक पिढ्या ख्रिश्चन आहेत; पण त्यांना आपल्या घराण्याचे पूर्ववृत्त माहिती आहे. अशी काही फारच मोठी ऐतिहासिक नावे सांगायची तर, देवाचे अस्तित्व अमान्य करणारा; पण ज्याला त्याचे अनुयायी देव मानतात तो कार्लमार्क्स मूळचा ज्यू होता. ‘रॉयटर्स’ या जगद्विख्यात वृत्तसंस्थेचा संस्थापक पॉल रॉयटर हा मूळ ज्यू होता. ‘नोबेल’ विजेता रशियन साहित्यिक बोरिस पास्तरनाक हा मूळचा ज्यू होता. एवढेच कशाला, ब्रिटनचा पंतप्रधान बेंजामिन डिझरेली हासुद्धा मूळ ज्यू होता. म्हणजेच, असंख्य ‘सेमाईट’ वंशाचे लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारून, पूर्णपणे युरोपीय आणि आता अमेरिकन बनलेले आहेत. अमेरिका हे युरोपचेच एक्स्टेन्शन आहे.
 
बरे, ‘सेमाईट’ वंशाचा, ज्यू लोकांचा देश जो इस्रायल, त्याची अधिकृत लोकसंख्या सुमारे ९५ लाख आहे आणि ज्यूंचा असा तो एकमेव देश आहे. आता हे इतक्या अल्पसंख्येतले लोक जगावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताहेत म्हणून तुम्ही ‘ग्लोबलाईझ अँटिसेमेटिझम’ म्हणून बोंबलता आणि जगभरात सुमारे ५० देशांचे मालक असणारे नि किमान २० कोटी (निदान सांगायला तरी) लोकसंख्या असलेले मुसलमान उघडउघड जगावर राज्य करण्याचे इरादे व्यक्त करतात, त्यांना तुम्ही झोंबाळता? खरोखरच, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’!
 
 
Powered By Sangraha 9.0