_202511211043289212_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
नायजेरियामध्ये ५१ टक्के मुस्लीम आणि ४९ टक्के ख्रिस्ती धर्मियांची लोकसंख्या. इथे दोन्ही समुदायांमध्ये नेहमी हिंस्र संघर्ष सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी नायजेरियात एका मशिदीवर हल्ला झाला. तिथे ३० लोक बंदुकीच्या गोळ्या लागून मृत्युमुखी पडले, तर २० जणांना जिवंत जाळले गेले. त्यामुळेच की काय, कालपरवा नायजेरियातील चर्चवर हल्ला करण्यात आला. एकमेकांची प्रार्थनास्थळे तोडणे-फोडणे, त्यांच्यापेक्षा वेगळ्या धार्मिक आस्था असणार्यांचा नरसंहार करणे, हे तर इथे नित्याचेच. जगाचा इतिहास पाहिला, तर या दोन समुहांनी त्यांच्यापेक्षा वेगळ्या विचारांच्या आणि श्रद्धेच्या लोकांवर कायम अत्याचारच केलेले आढळून येतात. (अपवाद असला तर क्षमस्व). भारतीयांनी मुघलांच्या आणि पुढे इंग्रजांच्या काळात हे भोगलेले आहेच म्हणा!
नायजेरियामध्ये सध्या अंतर्गत सशस्त्र कलहाने पेट घेतला आहे. ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिव्हिल लिबर्टीज अॅण्ड द रूल ऑफ लॉ’ या संस्थेच्या अहवालात नमूद केले आहे की, जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या काळात नायजेरियातील सात हजार ख्रिस्ती व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. नायजेरियात मुलींच्या शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालये तसेच वसतिगृह आहेत. देशाला अस्थिर करण्यासाठी, समाजाला नामोहरम करण्यासाठी ‘बोको हराम’ आणि ‘इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रोव्हिन्स’सारख्या संघटना शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृहातील मुलींचे अपहरण करतात. इतकेच नाही, तर गावाला सशस्त्र वेढा घालून गावकर्यांना बंधक करतात. त्यांना सोडण्याच्या बदल्यात खंडणी मागतात. गेल्याच महिन्यात नायजेरियातील बंगा गावातील लोकांचे अशाच प्रकारे सशस्त्र हल्लेखोरांनी अपहरण केले. त्यांना सोडण्याच्या बदल्यात प्रत्येक व्यक्तीसाठी लाख नाइरा (६५५ डॉलर) खंडणी मागितली. पण, खंडणी देऊनही लोक परत येतील असेही नाही. दहशत बसावी म्हणून त्यांची क्रूरपणे हत्याही करण्यात येते.
या सगळ्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियाला काही दिवसांपूर्वी इशारा दिला की, "नायजेरियामध्ये ख्रिस्ती धर्माचे अस्तित्व धोक्यात आहे. हजारो ख्रिस्ती मारले गेले आहेत. या सामूहिक नरसंहाराला कट्टरपंथी इस्लामवादी जबाबदार आहेत. मी नायजेरियाला विशेष चिंतेचा देश घोषित करत आहे. नायजेरिया आणि अन्य देशांमध्ये असे अत्याचार होताना अमेरिका गप्प बसणार नाही." यावर नायजेरियाचे राष्ट्रपती अहमद टिनुबू यांनी सैन्याला आणि प्रशासनाला आदेश दिले की, दहशतवादी संघटनांना समूळ नष्ट करा. तसेच अपहरण केलेल्या विद्यार्थिनी, गावकरी पुरुष-महिला यांना तत्काळ सुरक्षितपणे परत आणा. हे सगळे पाहून ती घटना आठवते. २०२२ साली नायजेरियाच्या प्रमुख ‘मुस्लीम न्यूज’ नावाच्या मीडिया संस्थेने भारतीय अय्यूब राणा (मनी लॉण्ड्रिंग संदर्भात आरोप झालेली महिला) हिला ’ग्लोबल मुस्लीम मीडिया पर्सन ऑफ द इअर २०२१‘ हा त्या देशाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला. या संस्थेचा प्रमुख अल्हाजी अबूबकर म्हणाला होता की, ”अय्यूब आज हिजाब परिधान करत नाही. पण, ती भविष्यात परिधान करेल. भारतात मोदींच्या उत्पीडनाचा सामना करता यावा, यासाठी ती लाखो मुलींना हिजाब परिधान करा, अशी प्रेरणा देते, म्हणून तिला हा पुरस्कार जाहीर झाला.”
तर असा हा नायजेरिया देश! भारतातील मुस्लीम महिलांनी हिजाब घातला म्हणजे मोठे आंतरराष्ट्रीय कार्य. मात्र, दुसरीकडे याच नायजेरियामध्ये हिजाब घालणार्या आणि न घालणार्या किड्यामुंग्यांसारख्या मुली-महिला मारल्या जात आहेत. क्रुसेड आणि जिहादवाले त्यांच्या संघर्षात मुलींवरच्या अत्याचाराला परस्पर विरोधी हत्यार बनवत आहेत. मुलींवरचा अत्याचार हत्यार म्हणून वापरणार्यांचा निषेध!