मुंबई : ( Malegaon ) नाशिक जिल्हातील मालेगावात तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय विजय खैरनार या संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करणार असल्याची खबर आंदोलकांना मिळताच आक्रमक आंदोलकांनी थेट गेट तोडून कोर्टात शिरण्याचा केला प्रयत्न केला.
सुरवातीला महिलांची व त्यामागून तरुणांची मोठी फौज तयार झाली होती. त्यामुळे बंदोबस्तासाठी पोलिसांनी गेट लावले आणि आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने थेट गेट तोडून आत धाव घेतली. ज्यामुळे पोलिसांनी सौम्य स्वरुपाचा लाठीचार्ज केला. त्यामुळे कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी नागरिकांचा वाढता जमाव लक्षात घेत आरोपीला कोर्टात आणण्याचे टाळले. पोलिसांनी सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर केला. ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मालेगावची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, असे म्हटले आहे.