मुंबई : ( Al-Falah University ) नवी दिल्लीत झालेल्या कार स्फोटप्रकणात नाव पुढे आलेल्या ‘अल-फलाह ट्रस्ट’ आणि ‘अल-फलाह’ विद्यापीठावर कोट्यवधी रुपयांचा गैरवापर आणि ‘मनी लॉण्ड्रिंग’चे आरोप करण्यात आले असून ‘ईडी’ आणि दिल्ली क्राईम ब्रान्चसारख्या यंत्रणांनी याविषयी कसून तपास सुरू केला आहे. विद्यापीठाचे संस्थापक जावेद अहमद सिद्दिकी यांनाही नुकतीच अटक झाली असून त्यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून फण्डिंगच्या नावाखाली ४१५ कोटी रुपये उभे केले आणि हे पैसे कुटुंबाशी संबंधित संस्थांना व कंपन्यांना वळवले.
विद्यापीठाला परकीय देणगी नियमांचे उल्लंघन करून अवैध फण्डिंग मिळाले, तसेच काळा पैसा पांढरा करण्यात आला. या आरोपांनंतर ‘ईडी’ने ट्रस्टशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी केली. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, दीर्घ चौकशी आणि सततच्या छापेमारीनंतर मंगळवारी ‘ईडी’ने जावेद यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना १३ दिवसांची कस्टडी दिली आहे.
‘ईडी’ने मंगळवारी उशिरा सांगितले, "अल-फलाह’ समूहाशी संबंधित परिसरांवरील छाप्यांदरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या सखोल तपासणीनंतर आणि विश्लेषणानंतर, तसेच गुन्ह्यात सिद्दिकींचा सहभाग सिद्ध झाल्यानंतरच ही अटक करण्यात आली आहे. छापेमारीदरम्यान यंत्रणेला ४८ लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम, अनेक डिजिटल उपकरणे आणि दस्तऐवजी पुरावे जप्त करण्यात आले. तपासकर्त्यांनी अनेक बनावट कंपन्या शोधून काढल्या असून ट्रस्टने केलेल्या फसवणुकीचाही उलगडा केला आहे.
‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’
फरिदाबादच्या ‘अल-फलाह’ विद्यापीठातील दहाहून अधिक विद्यार्थी आणि कर्मचारी अचानक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये तीन काश्मिरी व्यक्तींचा समावेश असून त्यांचे फोन स्विच-ऑफ आहेत आणि तपासयंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत. अशी शंका व्यक्त केली जात आहे की, हे लोक ‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’चा भाग असू शकतात. तपासात उघड झाले आहे की, ‘अल-फलाह’ विद्यापीठाशी संबंधित अनेक डॉटरांचे ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘अन्सार गजवात-उल-हिंद’सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध होते. जम्मू-कश्मीर आणि हरियाणा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यंत्रणांनी विद्यापीठातून बेपत्ता झालेल्या सर्वांची संपूर्ण यादी मिळवली आहे. दिल्ली स्फोटानंतर ते कोणत्याही प्रकारे संपर्कात आलेले नाहीत.