गवतांचा ‘डॉक्टर’

21 Nov 2025 10:14:18
 
Dr. Girish Potdar
 
‘ग...गवताचा‘ हे शाळेत घोकलेले, कित्येकदा गिरवलेले वाय आज आठवण्याचे कारण म्हणजे, डॉ. गिरीश पोतदार यांचे गवत संशोधनासंबंधीचे उल्लेखनीय कार्य. त्यांच्याविषयी...
 
डॉ. गिरीश गजानन पोतदार... सामान्यांच्या आकलनाबाहेरच्या विषयाचा अभ्यास करणारा एक अवलिया माणूस. डॉ. पोतदार यांनी गवत संशोधनक्षेत्रात एक वेगळी उंची गाठली आहे. डॉ. गिरीश हे गेली वीसपेक्षा अधिक वर्षे फुलझाडांचे वर्गीकरणशास्त्र, गवत कुलशास्त्र, जैवविविधता दस्तऐवजीकरण आणि उच्च शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. मानवी जीवनासाठी ही जैवविविधता किती उपयुक्त आहे आणि त्याचे संगोपन किती महत्त्वाचे आहे, हेच डॉ. पोतदार सातत्याने अधोरेखित करत असतात. सामान्य माणसाला गवताचे महत्त्व केवळ गवत म्हणूनच काय ते माहित. किंबहुना, दूर्वा आपण आद्यदेवता श्रीगणेशाला वाहतो म्हणून तशा त्या सुपरिचित. मात्र, या गवताच्या संगोपनाची मानवी जीवनासाठीही किती गरज आहे, हे डॉ. गिरीश पोतदार यांचे कार्य पाहता लक्षात येते. सध्या ते सातारा जिल्ह्यातील कराड येथील ‘यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स’ येथे वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख व प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
 
वडिलांच्या पोस्ट ऑफिसमधील बदलीमुळे गिरीश यांचे शालेय शिक्षण पन्हाळा, पडळ, गगनबावडा, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कुडित्रे फॅटरी या ठिकाणी झाले. पदवीचे शिक्षण राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथे पूर्ण करताना डॉ. नाडकर्णी, डॉ. कापसे मॅडम, डॉ. पाटील मॅडम, डॉ. तोरो मॅडम यांच्या प्रेरणेने ‘वनस्पतिशास्त्र’ विषयात त्यांना आवड निर्माण झाली. राजाराम महाविद्यालयात प्रख्यात वनस्पतिशास्त्र शास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव यांच्या एका व्याख्यानामुळे पुढे वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याचा डॉ. गिरीश यांनी निर्णय घेतला. पदवी पूर्ण केल्यानंतर १९९८ मध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ‘वनस्पतिशास्त्र’ या विषयात एमएस्सीसाठी प्रवेश घेतला. २००० मध्ये पदव्युत्तर शिक्षणानंतर प्रा. डॉ. एस. आर. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या ‘टॅसॉनॉमी कॅपॅसिटी बिल्डिंग’ या संशोधन प्रकल्पांतर्गत ‘ज्युनिअर रिसर्च फेलो’ आणि ‘सिनिअर रिसर्च फेलो’ म्हणून भारतातील गवतांवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. इथेच ‘महाराष्ट्रातील गवत वर्गीकरणशास्त्र’ या विषयावर ‘पीएचडी’ संशोधन करण्यास त्यांनी सुरुवात केली.
 
‘इंडियन असोसिएशन फॉर एंजिओस्पर्म टॅसोनॉमी’ने त्यांच्या वनस्पती वर्गीकरणातील उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल ‘एफ आयएएटी’ने ‘फेलोशिप’ बहाल केली. त्यांच्या ‘डॉटरेट’ संशोधनाने महाराष्ट्रातील गवतांच्या शास्त्रीय अभ्यासाला नवी दिशा मिळाली. त्यांनी आतापर्यंत सात नवीन वनस्पती प्रजातींचा शोध, दुर्मीळ वनस्पतींचे पुनर्विलोपन, तसेच अनेक महत्त्वपूर्ण ‘टायपिफिकेशन्स’ करून भारतीय गवत वनस्पतींच्या प्रणालीशास्त्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहेत. सात नवीन वनस्पती प्रजातींमध्ये सहा गवत प्रजातींचा शोध लावला आहे. या नवीन वनस्पती महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधून शोधल्या आहेत. यातील आंध्र प्रदेश येथून शोधलेल्या गवत प्रजातीला संस्थेचे संस्थापक व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांचे नाव देऊन त्यांना समर्पित केली आहे.
 
या नवीन वनस्पतीचे ’कॅपिलिपेडीयम यशवंतराव’ असे नामकरण करण्यात आले आहे. दोन गवतांना प्रख्यात वनस्पतितज्ज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव यांच्या वनस्पतिशास्त्रातील योगदानाबद्दल विशिष्ट नाव देऊन त्यांचा गौरव केला आहे. यातील एका गवताचा शोध हा प्रसिद्ध कास पठार येथून व दुसरे कर्नाटकातील सौदंती परिसरातून घेतला आहे. पाटण परिसरातून शोधलेल्या गवताला नेदरलॅण्डचे प्रख्यात वनस्पतीतज्ज्ञ डॉ जे. एफ. वेल्डकॅम्प यांचे ’मेनेस्थिया वेलकम्पी‘ असे नाव देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. पोतदार यांनी ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेनोलॉजी’, ‘सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड, नवी दिल्ली, भारत सरकार’ आणि ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ प्रायोजित महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. शिवाय, आगशिवा टेकड्यांचा सविस्तर पुष्पसंग्रह अभ्यास, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणीय मूल्यमापनासाठी अत्यंत मोलाचे ठरले आहे.
 
वैज्ञानिक साहित्यनिर्मितीतही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी २१ ग्रंथ प्रकाशित केले असून, त्यात प्रामुख्याने वर्गीकरणशास्त्रावरील संदर्भ ग्रंथ, अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके आणि प्रयोगपुस्तके यांचा समावेश आहे. त्यांनी ‘फ्लोरा ऑफ इंडिया’ (खंड ३१ आणि ३२)च्या निर्मितीत सहलेखक म्हणून विस्तृत योगदान दिले असून, हे त्यांचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व सिद्ध करते. त्यांचे ३३ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संशोधन लेख प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.
संशोधन मार्गदर्शनाच्या क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. ते शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ‘पीएचडी’ मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून, गवत कुळातील विशेष गटांवरील संशोधनात विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. त्यांनी अनेक विद्यापीठांच्या अभ्यास मंडळ, पदव्युत्तर अभ्यास मंडळ, तसेच अभ्यासक्रम तयार करणार्‍या समित्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
 
डॉ. पोतदार यांनी देशभरातील विविध राष्ट्रीय कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, परिसंवाद आणि शैक्षणिक उपक्रमांत मुख्य वक्ता म्हणून सहभाग घेतला आहे. गवत ओळख, वनस्पती वर्गीकरण, औषधी वनस्पती, जैवविविधता संवर्धन आणि डिजिटल हर्बेरियम यांसारख्या विषयांवर त्यांनी शेकडो विद्यार्थी, संशोधक आणि वनविभागातील अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी सादर केलेल्या संशोधन लेखांना सर्वोत्तम संशोधन प्रस्तुती पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी विविध रिफ्रेशर कोर्सेस, ओरिएंटेशन प्रोग्राम्स, ऑनलाईन शिक्षण तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि संशोधन पद्धती शास्त्रावरील राष्ट्रीय कार्यक्रम पूर्ण केले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग, सततचे शैक्षणिक अपडेट्स आणि संशोधनाची निष्ठा हे त्यांच्या शैक्षणिक नेतृत्वाचे द्योतक आहे.
 
वैज्ञानिक नियतकालिकांचे संपादक, समीक्षक आणि संपादकीय मंडळ सदस्य म्हणून त्यांनी संशोधनाच्या गुणवत्तावृद्धीतही मोठे योगदान दिले आहे. पर्यावरणसंवर्धनावरील त्यांच्या लेखनाद्वारे त्यांनी समाजात जागृती निर्माण केली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!
- शशांक तांबे 
 
 
Powered By Sangraha 9.0