Delhi Blast Case : दिल्ली ब्लास्ट प्रकरणी डिलीट केलेला डेटा तपास यंत्रणांच्या हाती, काय काय सापडलं?

21 Nov 2025 13:53:57

मुंबई : (Delhi Blast Case) देशाची राजधानी दिल्लीमध्ये १० नोव्हेंबरला झालेल्या बाँम्ब स्फोट प्रकरणी तपासात आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या मोबाईल फोनमधील डिलीट केलेला डेटा आता तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. या डेटावरून, उच्चशिक्षित डॉक्टरांचा या स्फोटात थेट सहभाग असल्याचे आणि त्यांच्यावर जैश-ए-मोहम्मद तसेच आयएसआयएस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा प्रभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुजम्मिलच्या फोनमध्ये काय काय?

या प्रकरणात मुजम्मिल याच्यासह आदिल, शाहीन आणि इरफान यांसारख्या अनेक जणांना अटक करण्यात आली आहे.माध्यमांमधून दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमधून डिलीट केलेला डेटाही रिकव्हर करण्यात आला आहे. एकट्या मुजम्मिलच्या मोबाईल फोनमध्ये तब्बल २०० व्हिडीओ सापडले आहेत. या व्हिडीओमध्ये जैशचा म्होरक्या मसूद अझहर, असगर आणि इतर जैश कमांडर तसेच आयएसआयएस संबंधित दहशतवाद्यांची जहाल भाषणे आणि धार्मिक भावना भडकवणारे व्हिडीओ आहेत.

यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या २०० व्हिडीओंपैकी जवळपास ८० व्हिडीओ हे थेट दहशतवादी ट्रेनिंग, बाँब बनवण्याचे प्रशिक्षण आणि रासायनिक प्रक्रिया यावर आधारित संशोधनाचे आहेत. तपासणीदरम्यान, मुजम्मिलच्या फोनमधून दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई तसेच अनेक राज्यांमधील धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या बाजारांचे व्हिडीओ देखील जप्त करण्यात आले आहेत. या माहितीमुळे दिल्ली स्फोटामागील कटाची व्याप्ती आणि त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध अधिक स्पष्ट होत आहेत.

तुर्कीमध्ये आयएसआयएसच्या कमांडरांशी भेटीगाठी

मुजम्मिलच्या परदेशातील भेटीगाठींवरही महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. वर्ष २०२२ मध्ये डॉ. मुजम्मिल आणि या स्फोटात मारला गेलेला डॉ. उमर हे दोघेही तुर्कीमध्ये एका सीरियन आयएसआयएस कमांडरला भेटले होते. ही भेट जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरच्या इशाऱ्यावरून आयोजित करण्यात आली होती. याच भेटीदरम्यान दोघांनी बाँब बनवण्याबद्दल चर्चा केली होती आणि त्या सीरियन कमांडरने त्यांना बॉम्ब बनवण्यास मदत केली होती, असेही उघड झाले आहे.




Powered By Sangraha 9.0