मुंबई : (India-Pakistan conflict) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मे महिन्यात भारताने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष झाला होता. या संघर्षात चीनने स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले. या लष्करी संघर्षानंतर चीनने फ्रेंच राफेल विमानांची बदनामी करण्यासाठी आणि स्वतःच्या जे-३५ लढाऊ विमानांची विक्री वाढावी म्हणून राफेल विमानांबाबत खोटी माहिती पसरवली होती, असे यूएस-चीन इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी रिव्यू कमिशनच्या अहवालात म्हटले आहे.
चीनच्या शस्त्रास्त्रांनी कथितपणे नष्ट झालेल्या राफेल विमानाचे एआय फोटो व्हायरल करण्यासाठी बनावट सोशल मीडिया अकाउंट्सचा वापर करण्यात आल्याचे यूएस-चीन इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी रिव्यू कमिशनच्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल बुधवारी अमेरिकन काँग्रेसला सादर करण्यात आला आहे. चिनी दूतावासांनी भारत-पाकिस्तान संघर्षातील त्यांच्या यंत्रणेच्या यशाचे कौतुक केले आणि शस्लास्त्र विक्रीला चालना देण्याचा प्रयत्न केला, असे अहवालात नमूद केले आहे.
या वार्षिक अहवालात अमेरिकन काँग्रेसला चीन धोरणाबाबत द्विपक्षीय दृष्टिकोन कसा असावा, याबाबत शिफारसी करण्यात आल्या आहेत. या वर्षीच्या अहवालात तंत्रज्ञान, आर्थिक क्षेत्र, व्यापार आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत २८ शिफारसी करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये भविष्यात तंत्रज्ञानामध्ये अव्वल स्थान मिळविण्यासाठी चीनने औद्योगिक धोरणाचा कसा वापर केला आहे हे सुद्धा नमूद केले आहे.