अविद्याना-मन्त-स्तिमिर-मिहिर द्वीपनगरी
जडानां चैतन्य-स्तबक मकरन्द श्रुतिझरी|
दरिद्राणां चिन्तामणि गुणनिका जन्मजलधौ
निमग्नानां दंष्ट्रा मुररिपु वराहस्य भवति॥३॥
शब्दार्थ -
सौंदर्यलहरींच्या तृतीय श्लोकात आचार्य भगवतीची उपासना सामान्य साधकाला कोणते फळ प्रदान करते, याचे वर्णन करतात. आचार्य म्हणतात, हे जगन्माते, तुझ्या कृपेला मी काय शब्दबद्ध करणार? तू परम करुणामयी आणि उदार आहेस. तुझे सामान्य साधक हे अनेक दोषांनी युक्त आहेत, परंतु तरीही तू त्यांच्यावर परम कृपावर्षावच करतेस.
अविद्याना-मन्त-स्तिमिर-मिहिर द्वीपनगरी : अर्थात जे साधक अविद्येच्या अंधारात अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी तू सूर्याच्या तेजासम प्रकाशित दीपगृह आहेस. किंवा एखाद्या अंधकारमय गुहेत अनेक दिवाभीत प्राणी निवास करत आहेत आणि तिथे अचानक सूर्याचा प्रकाश पोहोचला, तर संपूर्ण गुहा तेजाने उजळून निघेल आणि त्यात समस्त दिवाभीत प्राणी भस्मीभूत होतील. त्याचप्रमाणे तुझ्या कृपेने जो अज्ञानी उपासक ज्ञानाचा प्रकाशात पोहोचतो, त्याचे अंतःकरण पूर्ण विशुद्ध होते, त्याचे पूर्वसुकृत भस्मीभूत होते आणि तो ज्ञानाच्या, तेजाच्या प्रकाशात न्हाऊन निघतो.
अविद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे काय?
चार वेद, उपनिषदे, १८ पुराणे आणि सहा दर्शनशास्त्रे हे समस्त ज्ञान, लौकिक जगताचे ज्ञान आहे. अर्थात समस्त विश्वातील स्थूल स्वरूपाचे ज्ञान यात समाविष्ट आहे परंतु, हे ज्ञान परिपूर्ण नाही. हे ज्ञान केवळ तुम्हाला जीवन उत्तम पद्धतीने कसे जगावे, याचे मार्गदर्शन करते. निसर्गातील रहस्य उलगडून सांगते. त्याचप्रमाणे हे ज्ञान तुम्हाला मानवी जीवन अधिक सुखी आणि परिपूर्ण कसे करावे, याबद्दल माहिती प्रदान करते. म्हणून या लौकिक जगताच्या ज्ञानाला ‘अविद्या’ असे संबोधले जाते.
सनातन धर्म हा मानवाच्या किंवा प्रत्येक जीवात्म्याच्या आत्मउद्धाराचा विचार करतो. अर्थात, जन्माला येणारा प्रत्येक जीव हा आत्मउन्नत होत मानव जन्माला प्राप्त व्हावा आणि मानव म्हणून जन्माला येणारा प्रत्येक जीव हा आत्मज्ञान प्राप्त करतच, आत्मउन्नत होत अंतिमतः ईश्वरी तत्त्वात विलीन अर्थात शिवस्वरूप व्हावा. या ज्ञानालाच आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, श्रीविद्या असे संबोधले जाते.
शक्तिउपासनेच्या मार्गावर येणारा साधक हा, अविद्या अर्थात लौकिक जगताच्या ज्ञानाला जाणून घेऊन परिपूर्ण झालेला असतो. या परिपूर्ण साधकावर श्री ललिता देवीची कृपा झाल्यावर, तो विद्याप्राप्तीसाठी पात्र होतो. ज्यावेळी तो ही आत्मविद्या ग्रहण करू लागतो, त्यावेळी त्याला आपण आजवर प्राप्त केलेले वेदांचे, धर्माचे, शास्त्राचे ज्ञान हे अत्यंत तोकडे होते, अपरिपूर्ण होते हा साक्षात्कार होतो. त्याचवेळी त्याला हेसुद्धा उमगते की, श्रीविद्या अर्थात ब्रह्मविद्या ही अत्यंत विराट स्वरूपाची विद्या आहे. याला ग्रहण करण्यानेच त्याच्या या जन्माची परिपूर्ती होणार आहे. ब्रह्मविद्या ही या जन्मात ग्रहण केल्यावर, ती तुम्ही पुढील जन्मी विस्मृतीत हरवून बसत नाही. तर ते ज्ञान पुढील जन्मीसुद्धा आपण, मागील पानावरून पुढे चालू सुरू करू शकतो.
त्यामुळे अविद्येने ग्रासलेला अर्थात वेदशास्त्रसंपन्न, प्रकांडपंडित असणारी व्यक्ती शक्तिउपासनेच्या मार्गावर आल्यावर त्याला जाणीव होते की, आपले ज्ञान व्यर्थ आहे आणि भगवतीच्या कृपेने आपण या अविद्येकडून आता विद्येचा प्रवास सुरू करणार आहोत.
जडानां चैतन्य-स्तबक मकरन्द श्रुतिझरी : जडत्वाने भरलेल्या जीवांसाठी तू चैतन्याचे पुष्प असून, त्याचा मध म्हणजे तुझे उपदेशरूपी अमृत आहे. जड ही साधकांमध्ये विद्यमान असणारी एक प्रवृत्ती आहे. गुरूंनी पूर्वसुरींनी जे ज्ञान प्रदान केले त्यालाच प्रमाण मानून वर्तन करणे, साधना करणे किंवा त्याच विचारांचा, सिद्धांतांचा आणि परंपरांचा मार्ग चालत राहणे या प्रवृत्तीच्या साधकाला ‘जड’ असे संबोधले जाते. असा जड असणारा साधक ज्यावेळी शक्तिउपासनेच्या मार्गावर येतो, त्यावेळी श्री ललिता देवी त्याच्या मनातील आणि मेंदूतील त्या सगळ्या साठलेल्या विचारांना दूर सारून त्याला ज्ञानाचे निखळ, खळाळते आणि जिवंत स्वरूप दाखवते. हे बघितल्यावर त्या साधकाचे डोळे उघडतात आणि तो या चैतन्याचा रसास्वाद घेऊन धन्य होतो आणि स्वतःच्या आत्मउन्नतीची वाट स्वयंप्रेरणेने चालण्यास आरंभ करतो.
दरिद्राणां चिन्तामणि गुणनिका जन्मजलधौ : दरिद्रांसाठी तू सर्व इच्छापूर्ती करणारी चिंतामणी आहेस, गुणांची खाण आहेस. दरिद्री हा उल्लेख आपल्याकडे स्वतःला हीन, दीन लेखणार्या साधकांसाठी वापरला जातो. सनातन धर्माचे अनुयायी हे स्वतःला ईश्वराचे अंशात्मक स्वरूप समजतात, त्यामुळे आपल्याकडे कोणीही स्वतःला हीन लेखत नाही. ईश्वर विराट आहे आणि आम्ही त्याचे अंश आहोत, हाच आपला शास्त्रविचार आहे.
परंतु, अब्राहमिक धर्माच्या प्रभावाने आपल्याकडेसुद्धा स्वतःला हीन लेखणारे साधक निर्माण झाले आहेत. असे साधक देवीच्या उपासनामार्गावर आले की त्यांना जाणीव होते की, ते हीन, दीन नाहीत. साक्षात् ईश्वरच अंशात्मक रूपाने त्यांच्यामध्येच विद्यमान आहे. ईश्वराच्या अस्तित्वाच्या या चिंतामणीची स्वदेहात अनुभूती आल्यावर, त्यांच्यातील दारिद्—याचा भाव पूर्ण लोप पावतो आणि ते स्वतःला अत्यंत अभिमानाने भगवतीचे लाडके पुत्र म्हणून संबोधू लागतात.
निमग्नानां दंष्ट्रा मुररिपु वराहस्य भवति : जन्ममरणाच्या सागरात बुडालेल्यांसाठी तू वराहरूपातील विष्णूच्या दंष्ट्रेसारखी तारक आहेस. कर्मकांडरूपी साधना करणारे साधक हे देवीच्या मूळ स्वरूपाला, चैतन्यमय असण्याला समजूच शकत नाहीत. त्यांच्यामते विशिष्ट मंत्रांची विशिष्ट आवर्तने, विशिष्ट पूजा करणे, यज्ञ करणे हेच ईश्वराच्या साक्षात्काराचे साधन आहे. परंतु, हे सगळे कर्म करत असताना साधकाचे मन शतप्रतिशत त्या उपासनेत गुंतलेले नसतेच. त्याचा देह कर्म म्हणून ती कृती करत असतो आणि त्यामुळे त्याचे मनोवाञ्छित फळ प्राप्त होत नाही. अशा साधकांना देवीची कृपा या सगळ्या कर्मकांडरूपी साधनच्या वर उचलून, त्याला आत्मज्ञानाचा साक्षात्कार करून देते आणि त्यामुळे तो आत्मउन्नतीच्या मार्गावर अग्रेसर होतो आणि कर्मकांडरूपी उपासनेचा त्याचा मोह संपुष्टात येतो.
या श्लोकाचा लौकिक जगताच्या दृष्टीने, एक सुलभ अर्थसुद्धा आहे. श्री ललिता देवीची साधकावर कृपा झाली, तर त्याच्या मनातील आजवर अर्जित सर्व अविद्या नष्ट होऊन देवीच्या उपासनेच्या सतविद्येचा, श्री विद्येचा प्रवेश होतो. त्याची जडबुद्धी नष्ट होऊन तो ज्ञानी, मेधावी आणि प्रकांडपंडित होतो. त्याच्या दारिद्—याचा समूळ नाश होऊन, त्याच्या घरी गजान्त लक्ष्मी नांदू लागते आणि त्याला सर्व स्वरूपाचे ऐश्वर्य प्राप्त होते.
भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण करून क्षीरसागरातील पाण्यात बुडणार्या पृथ्वीला वाचवले आणि आपल्या सुळ्यांवर तोलून धरले. त्याचप्रमाणे देवीची साधना केल्यास, ती तुमच्या सर्व प्रापंचिक संकटांपासून तुमचे संरक्षण करते आणि तुमचा मार्ग निष्कंटक करते. या श्लोकाचा अजून एक प्रभाव म्हणजे, या श्लोकाचे पठण आरोग्यवृद्धी करते आणि साधकाला निरामय देह प्राप्त होतो.
- सुजीत भोगले