डहाणूमध्ये समुद्री कासवाचे 'सॅटेलाईट टॅगिंग'; उत्तर कोकणातील कासावांचे गुपित उलगडणार

20 Nov 2025 09:40:59
sea turtle satellite tagging



मुंबई (अक्षय मांडवकर) -
डहाणू येथील समुद्री कासव उपचार केंद्रामधील एका कासवावर 'सॅटेलाईट टॅग' बसवून त्याला समुद्रात सोडण्याचा निर्णय 'कांदळवन कक्षा'कडून घेण्यात आला आहे (sea turtle satellite tagging). गुरुवार दि. २० नोव्हेंबर रोजी सागरी कासवावर 'सॅटेलाईट टॅग' बसवून त्याला समुद्रात सोडले जाईल. 'कांदळवन कक्षा'ने 'भारतीय वन्यजीव संस्थान'च्या (डब्लूआयआय) मदतीने हाती घेतलेल्या या प्रकल्पामुळे उत्तर कोकणातील कासवे अंडी घालण्यासाठी कुठे जातात, याचा मागोवा घेता येणार आहे. (sea turtle satellite tagging)
 
 
दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या काळात कोकणातील समुद्रकिनार्‍यांवर ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या सागरी कासवाच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. तर काही किनार्‍यांवर ग्रीन सी कासवाच्या माद्यादेखील अंडी घालतात. वनविभागाच्या नोंदीनुसार रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनार्‍यांवर कासवांची घरटी सापडतात. मात्र, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये म्हणजेच मुंबई, पालघर जिल्ह्यातील किनाऱ्यांच्या बकाल अवस्थेमुळे याठिकाणी समुद्री कासवे अंडी घालत नाही. अशा परिस्थितीत आता डहाणूमधील समुद्री कासव उपचार केंद्रातील एका कासवाला 'सॅटेलाईट टॅग' लावून त्याला समुद्रात सोडण्याचा निर्णय 'कांदळवन कक्षा'ने घेतल्याची माहिती डहाणूचे उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. २० नोव्हेंबर रोजी 'डब्लूआयआय'चे शास्त्रज्ञ आणि 'कांदळवन प्रतिष्ठान'च्या तज्ज्ञांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार आहे.
 
 
सागरी कासवांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या 'कांदळवन कक्षा'ने ‘डब्लूआयआय’च्या मदतीने २०२१-२२ साली एकूण सात कासवांवर ‘सॅटलाईट टॅग’ बसविले होते. मात्र, काही महिन्यांमध्येच ते अकार्यान्वित झाले होते. यामधीलच एक 'सॅटेलाईट टॅग' हे कस्टम विभागाच्या प्रक्रियेत अडकल्याने शिल्लक राहिले होते. तो शिल्लक राहिलेला 'सॅटेलाईट टॅग' डहाणू उपचार केंद्रातील कासवावर बसविण्यात येणार आहे. डहाणू येथे महाराष्ट्रातील पहिले सागरी कासव उपचार केंद्र आहे. या केंद्रामध्ये समुद्री कासवावर उपचार केले जातात. उपचाराअंती निरोगी झालेल्या कासवांना पुन्हा समुद्रात सोडण्यात येते. यामधील एका ऑलिव्ह रिडले कासवावर 'सॅटेलाईट टॅग' बसवून गुरुवारी त्याला समुद्रात सोडण्यात येईल. गेल्यावर्षी देखील डहाणूमधील कासवावर 'सॅटेलाईट टॅग' बसविण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तांत्रिक बाबींमुळे त्याला यश मिळाले नव्हते.
 
 
'सॅटेलाईट ट्रान्समीटर' का लावतात ?
सागरी कासवांच्या नेहमीच्या खाद्याच्या जागा (फीडिंग ग्राऊंड) आणि विणीसाठीच्या जागा यामधील अंतर काही हजार किलोमीटर इतके दूर असू शकते. तसेच सागरी कासवे स्थलांतरही करु शकतात. सागरी कासवांचे स्थलांतर किंवा त्यांच्या कायमस्वरुपी अधिवासाचा मागोवा घेण्यासाठी दोन प्रकारे त्यांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. त्याच्या परांवर खुणचिठ्ठी (टॅग) लावून किंवा कवचावर ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावून. ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’द्वारे आपल्याला दररोज त्यांची इत्यंभूत माहिती अवगत होते.
Powered By Sangraha 9.0