बदकांच्या दुर्मीळ प्रजातींचे कोकण किनाऱ्यांवर दर्शन; दुर्मीळ टिबुकली श्रीकृष्ण तलावात

20 Nov 2025 14:35:10
rare duck species
(छायाचित्र - पल्लवी राऊत)


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बदक आणि टिबुकली कुळातील काही दुर्मीळ प्रजातींनी यंदा कोकण किनारपट्टीवर स्थलांतर केले आहे (rare duck species). महाराष्ट्रात दुर्मीळतेने स्थलांतर करुण येणारी काळ्या मानेची टिबुकली ही बोईसरमध्ये, तर चतुरंग बदकांचा थवा संगमेश्वर तालुक्यात आढळून आला आहे (rare duck species). हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थलांतर करुन आलेल्या या दुर्मीळ पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षीनिरीक्षकांनी गर्दी केली आहे. (rare duck species)
 
 
 
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक स्थलांतरी पक्ष्यांनी राज्यात प्रवेश केला आहे. यामध्ये काही दुर्मीळ पक्ष्यांचा देखील समावेश आहे. उत्तर आशियातील अनेक प्रदेशांमधून दरवर्षी हिवाळ्याच्या तोडांवर अनेक पक्षी खास करुन बदकांच्या प्रजाती या महाराष्ट्रात दाखल होतात. उत्तर आशियातील बर्फाळ हवामान टाळण्यासाठी प्रामुख्याने हे स्थलांतर केले जाते. यामध्ये टिबुकली आणि बदकांचा समावेश असतो. बदक आणि टिबुकली हे दोन्ही पाणपक्षी असले तरी, दोघांमध्ये फरक असतो. बदकाच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचा पडदा असतो, तर टिबुकलीच्या पायांच्या बोटावर त्वचेचा थर असतो.
 
 
 
टिबुकलीमधील काळ्या मानेची टिबुकली ही क्वचितच महाराष्ट्रात स्थलांतर करते. अशा या टिबुकलीचे दुर्मीळ दर्शन बोईसरमध्ये तारापूर रस्त्यावरील श्रीकृष्ण तलावात झाले आहे. रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी पक्षीनिरीक्षक आशिष बाबरे हे श्रीकृष्ण तलावानजीक पक्षीनिरीक्षणाकरिता गेले असता, त्यांना या पक्ष्याचे दर्शन घडले. तेव्हापासून हा पक्षी या तलावात वावरत आहे. महाराष्ट्रातील या पक्ष्याची ही दुसरीच नोंद आहे. तिबेटच्या पठारावर प्रजनन करणारे हे पक्षी प्रामुख्याने दक्षिण चीनच्या भागात स्थलांतर करतात, काही वेळा ते उत्तर भारतात येतात. मात्र, मध्य भारतापर्यंत स्थलांतर करुन ते क्वचितच येतात. याशिवाय चतुरंग या बदकाचे दर्शन देवरुखमध्ये पक्षीनिरीक्षक डाॅ. शार्दुल केळकर यांना रविवारीच घडले.
Powered By Sangraha 9.0