
मुंबई : बॉलिवूड आणि ड्रग्स हे समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीसह काही जणांची पुन्हा एकदा ड्रग्स प्रकरणात नावं समोर आली होती. त्यातच आता बॉलिवूड कलाकारांचा अगदी जवळचा मित्र आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर ओरहान अवतरमाणी उर्फ ऑरी याला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. तब्बल कोटी २५२ रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात अँटी नार्कोटिक्स सेलने ऑरीला समन्स बजावले आहेत. यानिमित्ताने सिनेइंडस्ट्रीतील ड्रग्स रॅकेटची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. ऑरीला आज (२० नोव्हेंबर २०२५ रोजी) चौकशीसाठी अँटी नार्कोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ऑरी हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तर अनेक बॉलिवूड कलाकारांसह तो निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. दरम्यान, २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेखला अटक केली होती. चौकशीदरम्यान या आरोपीने कबुली दिली की तो देशात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्यांचं आयोजन करतो आणि त्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा पुरवठाही करतो. त्यानंतर अनेकांची नावं समोर आली होती. त्यात आता ऑरीचंही नाव समोर आलं आहे.
ऑरी हा नेहमीच बॉलिवूडच्या नामांकित सेलिब्रिटींपासून अंबानींपर्यंत अनेक मोठ्या पार्ट्यांमध्ये सामील असलेला पाहायला मिळतो. तर ऑरीची खरी ओळख सोशल मीडियाला ही फोटोंमुळे झाली होती. ऑरीसोबत फोटो काढले नाहीत अशी व्यक्ती सापडणं अवघड आहे. अनेक मोठे सेलिब्रीटी, कलाकार यांच्यासह तो दिसत असतो. सुरुवातीला फक्त जान्हवी कपूर, न्यासा देवगण, सारा अली खान यांसारख्या स्टारकिड्ससोबत दिसणारा ऑरी आता अंबानी ते अनेक मोठे उद्योगपती यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये दिसतो. ऑरी हा बॉलिवूडमधल्या अनेक स्टारकिड्सचा खास मित्र आहे. आणि त्यामुळेच अगदी कमी काळात तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच्या अनोख्या शैलीसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.
पोलीसांच्या ताब्यात असलेल्या सलीम शेखने केलेल्या दाव्यानुसार ऑरी हा दाऊद इब्राहिमचा भाचा आलीशाह पारकरचा जवळचा मित्र आहे. ऑरी ड्रग्जचं सेवन करायचा तसंच ड्रग्ज पार्ट्यांमध्येही सहभागी व्हायचा, असा खुलासा सलीमने चौकशीत केलेला आहे. ड्रग्स प्रकरणातील आरोपी हे ट्रिमा, ज्यांगा, इंस्टाग्राम, फेसटाइम, सिग्नल अशा अॅप्लिकेशनचा वापर करत होते असाही खुलासा त्याने केला आहे. लवकरच अन्य सेलिब्रिटींनाही मुंबई पोलीस चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आणखी मोठ्या सेलिब्रिटींचंही नाव समोर येण्याची शक्यता आहे.