मुंबई (विशेष प्रतिनिधी) - ताडोबामधून 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त दाखल झालेल्या 'चंदा' म्हणजेच 'तारा' या वाघिणीला गुरुवार दि. २० नोव्हेंबर रोजी नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. यापुढे तिच्या गळ्यात लावलेल्या 'रेडिओ काॅलर'च्या आधारे तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'मध्ये व्याघ्र संख्या वाढविण्यासाठी दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा साध्य झाला आहे (Opersation Tara).
बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री ताडोबातील वाघिणीला घेऊन वन विभागाचा चमू 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'च्या दिशेने रवाना झाला होता. गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्री हा ताफा 'सह्याद्री व्याघ्र प्रक्लपा'त पोहोचला. व्याघ्र स्थानांतरणाच्या या प्रक्रियेला 'आॅपरेशन तारा' असे नाव देण्यात आले आहे. सह्याद्रीत आल्यानंतर या वाघिणीला चांदोली राष्ट्रीय उद्यानात तयार केलेल्या विलग्नवासाच्या पिंजऱ्यांमध्ये ठेवण्यात आले होते. तिला 'एसटीआर-०४' असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला होता. वाघिणीवर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन आणि निरीक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्रचिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले. वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी (डब्लूआयआय) यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले.
त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी तिला मुक्त करण्यासाठी विलग्नवासाच्या पिंजऱ्याचे दरवाजे उघडे करण्यात आले होते. गेली दोन दिवस सदर वाघीण त्याच पिंजऱ्याच्या आत फिरत होती. वन विभागाने पिंजऱ्यामध्ये सोडलेल्या भक्षाची तिने शिकार केली होती. ती खाऊन आत दोन दिवस राहीली. दोन दिवस दरवाजा उघडा ठेवला होता तरी ती बाहेर गेली नाही. मात्र, २० नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता अत्यंत डौलदारपणे पिंजऱ्यामधून बाहेर पडून ती जंगलात निघून गेली. 'डब्लूआयआ'यचे शास्त्रज्ञ रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील,मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, रमण कुलकर्णी, वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील (चांदोली), अर्शद मुलानी (हेळवाक),अक्षय साळुंखे(कोयना),तुषार जानकर (पाटण),किरण माने(ढेबेवाडी), प्रदीप कोकीटकर (आंबा), डब्लूआयआयचे शास्त्रज्ञ आकाश पाटील, वनपाल व वनरक्षक यांनी ही कामगिरी केली. तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन, स्वर्गीय पापा पाटील यांनी गेली आठ ते दहा वर्ष या व्याघ्र पुनर्वसनासाठी अथक प्रयत्न केले.
वैज्ञानिक निरीक्षण योजना
वाघिणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविण्यात आली असून तिचे सॅटेलाईट टेलिमेट्री आणि वीएचएफ अॅंटीनाव्दारे २४ तास पर्यवेक्षण केले जाणार आहे. फील्ड पथकाद्वारे क्षेत्रनिहाय पडताळणी, हालचाल, निवासस्थाने व शिकार पद्धतीचे नोंदवही लेखन आणि तत्पर पशुवैद्यकीय पथक व्यवस्था यामार्फत वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल. - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प