छातीठोकपणे सांगतो की, मी संघाचा कार्यकर्ता आहे. कशाला टाईमपास करतो? एकाच ठिकाणी कुठेतरी राहा! च्या*ला मी म्हणालो आणि तू ‘कमळ’ हातात घेतले? पिट्याभाई, तू तिकडे गेलास? अरे जुन्या भावाशी नवी भाऊबंदकी करताना त्याला साजेसे वागावे लागते. ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो,’ हे असले शब्द गाळावे लागतात बाबा! हिंदुत्व आणि संघाचे नाव घेतले, तर आमचे आणि आमच्या भावाचे मतदार नाराज होतील. त्या सगळ्यांसाठी मला रा. स्व. संघाचा विरोध करावा लागतो. ‘मनसे पॅटर्न’च्या ऐवजी तू तर ‘मुळशी पॅटर्न’ करून एका फटक्यात आम्हाला सोडचिठ्ठी दिलीस!
काय म्हणता, पिट्याभाई तिकडे गेला, मग कशावरून आम्ही पण उद्या तिकडे जाणार नाही? हं! आता याबाबत माझे मी काहीच सांगू शकत नाही. तो डायलॉग आहे ना? काय म्हणता, तो डायलॉग ‘एकही मारा मगर सॉलीड मारा’ हा आहे? नाही नाही, कधीकाळी विधानसभा निवडणुकीमध्ये उबाठापेक्षा जास्त आमदार मनसेचे निवडून आले, तेव्हा मी उबाठा दादाला म्हणालो होतो, ‘साला एकही मारा मगर सॉलीड मारा.’ हं! आता तो डायलॉग आठवायचा नाही.
मी जो डायलॉग म्हणतोय, तो आहे ‘मैं जो बोलता हूं वो करता हूं|’ पण, पुढे जसजसे सत्तेत कोण येणार हे उघड व्हायला लागले की तेव्हा मग ‘जो मैं नही बोलता हूं, वो मैं डेफिनेटली करता हूं’ हे समजून जा. त्यामुळे पिट्याभाई तिकडे गेला, तर आम्हालाही मग कोण अडवणार? काय म्हणता, खळ्ळखट्याक करत कार्यकर्ते तुरुंगात जातात आणि आम्ही दररोज नव्या नव्या भूमिका घेऊन दररोज नव्यानव्या पक्षाची बाजू तरी घेतो किंवा विरोध तरी करतो? पण आम्हाला नवा डाव मांडताना नव्याने तयारी करावी लागते. काल जे बोललो, ते आज नाही आणि आज जे बोललो, ते उद्या नाही. पूर्वी मी जे बोललो, त्याच्या विरोधात काही दिवसांनी बोलायचे. हे काय सोपे आहे? ‘मुळशी पॅटर्न’चे कौतुक झाले. पण, आमच्या ‘लावा रे तो व्हिडिओ’ नाटकाचं काय? काय म्हणता, आता निवडणुकीत उबाठा दादाला ज्या जागा नको असतील त्या आम्हाला मिळणार? काय म्हणता, त्यासाठी तुम्ही आधीच आमच्यासाठी ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमातलं गाण म्हणता?
आभाळा आभाळा, आता कुठं ठावं रं,
उष्ट्यासाठी धावं रं, आभाळा, आभाळा.
‘लव्ह जिहाद’ नसतो?
केरळची घटना. पथानामथिट्टाची महिला युकेला राहायची. तिला एक किशोरवयीन मुलगा होता. पण, तिने वेम्बयन येथे राहणार्या व्यक्तीशी दुसरा विवाह केला. हे दाम्पत्य युकेलाच राहायचे. तिचा मुलगा युकेमध्ये काही दिवसांसाठी राहायला आला आणि सुटी संपल्यावर पुन्हा केरळमध्ये आला. पण, त्या मुलाचे वागणे, बोलणे आणि विचार करण्याची पद्धत पाहून त्याच्या शाळेच्या शिक्षकांना संशय आला. मुलाची आई आणि सावत्र पिता युकेला राहायचे म्हणून त्यांनी मुलगा ज्यांच्यासोबत राहायचा त्या नातेवाईकांना मुलाच्या बदललेल्या विचार आणि वर्तनाबद्दल सांगितले.
हा मुलगा अत्यंत कट्टरपंथी जिहाद्यांसारखे बोलत होता, तसे विचार करत होता. या मुलामध्ये हा बदल कसा झाला? त्याच्या आईला आणि सावत्र पित्याला भेटायला तो युकेला गेला, त्यादरम्यानच हा बदल त्याच्यात कसा झाला? तसेच मुलाचा सावत्र पिता मुलाचा ताबा मागत होता. याचे कारण काय? अशा सगळ्या बाबीवर मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार केली. तेव्हा सत्य समोर आले की, मुलगा युकेला गेला होता, तेव्हा त्याच्या आईने त्याला ‘इस्लामिक स्टेट’ विचारधारेबाबत माहिती दिली.
मुलाने ‘इसिस’मध्ये भरती व्हावे, ‘इसिस’बद्दल मुलाला आकर्षण वाटावे, यासाठी प्रयत्न केले. मुलाने ‘इसिस’मध्ये भरती व्हावे, ‘जिहाद’ करावा, हिंसा करावी वगैरे वगैरेसाठी प्रत्यक्ष त्या मुलाची आई मुलाला उकसवत होती. भयंकर आहे. हे सगळे कसे घडले असेल? तर याचं कारण आहे ‘लव्ह जिहाद!’ पहिल्या पतीला म्हणजे, मुलाच्या पित्याला सोडल्यानंतर या महिलेने दुसरा विवाह म्हणजे निकाह केला. पहिल्या पतीला सोडणे आणि दुसरा विवाह मुस्लीम व्यक्तीशी करणे आणि त्यानंतर स्वतःचा जन्मजात धर्म सोडून इस्लाम स्वीकारणे, हे सहज झाले असेल का? बरं इस्लाम स्वीकारल्या स्वीकारल्या या महिलेने स्वतःच्या पोटच्या मुलाला कट्टर धर्मांध दहशतवादी बनण्यासाठी प्रयत्न केले. आता केरळ ग्रामीण पेालीस आणि दहशतवादविरोधी पथक यामागचे कारण शोधत आहे. ‘लव्ह जिहाद’ करून एका मातेला धर्मांतरित करून तिच्या मुलाला दहशतवादाकडे वळवले जात आहे. मात्र, केरळचे कम्युनिस्ट सरकार आणि देशातले तथाकथित पुरोगामी ‘हिंदूद्वेष्टे’ म्हणत राहतील, ‘लव्ह जिहाद’ वगैरे काही नसतेच!