शेतकर्‍यांना ‘आत्मनिर्भर’ करणारा आचार्य

20 Nov 2025 10:15:53

Kiran Acharya
 
दोन म्हशींपासून व्यवसाय सुरु करुन, आज हजारो लीटर दूधविक्री करणार्‍या आणि तीन हजारांहून अधिक शेतकर्‍यांना आत्मनिर्भरतेच्या वाटेवर नेणार्‍या ‘आचार्य डेअरी फार्म’च्या किरण आचार्य यांच्याविषयी...
 
घरी येणारे दूध किती पातळ आहे किंवा लगेच खराब होते, अशी बोलणी घरी येऊन दूध देणार्‍या गवळ्याला नेहमीच ऐकावी लागतात. पुणे जिल्ह्यातल्या वडगाव मावळ येथील किरण आचार्य यांच्या घरी दूध घालणार्‍या गवळ्यालादेखील अशाच प्रकारची बोलणी ऐकावी लागत होती. परंतु, घरच्यांकडून मिळणार्‍या या बोलण्यांतून आचार्य कुटुंबातच एक उद्योजक तयार झाला. आज वडगाव येथे ४५ म्हशींचा, हरियाणा येथे १७५ म्हशींचा आणि वडगाव येथे ४०० म्हशींचा दुसरा प्लांट उभारण्याचे काम या महिन्यात पूर्ण होत आहे. दोन म्हशींपासून सुरू केलेला व्यवसाय हजारो लीटर दुधाची विक्री आणि तीन हजारांपेक्षा जास्त शेतकर्‍यांना व्यवसाय सुरू करून देणारा किरण आचार्य आणि उदय आचार्य यांचा ‘आचार्य डेअरी फार्म’ पुणे परिसरात नावारूपाला आला आहे.
 
शेती हा पारंपरिक व्यवसाय करत सर्वसामान्य शेतकर्‍यांप्रमाणे जीवन जगणारे आचार्य कुटुंब शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत आज वार्षिक कोटींची उलाढाल करत आहे. वडगाव मावळच्या आचार्य कुटुंबानेदेखील त्यांच्या मुलांसाठी एका शेतकर्‍याकडून घरी दूध लावले. परंतु, ते दूध कधी पाण्यासारखे पातळ असायचे किंवा सकाळी घेतलेले दूध रात्री खराब व्हायचे. घरच्यांचे नेहमीचे ओरडणे ऐकून एक दिवस किरण आचार्य यांनीच त्या शेतकर्‍याला विचारले की, वारंवार असे दूध येण्याचे कारण काय? त्यावर त्या शेतकर्‍याने पैशाअभावी कोणत्या परिस्थितीत जनावरांचे पालनपोषण करतो, हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष गोठा पाहायला येण्याची विनंती केली. त्यानुसार किरण यांनी तो गोठा पाहिला असता, गायी-म्हशींची अवस्था फारच वाईट पाहायला मिळाली.
 
मुबलक चार्‍याची वानवा होतीच, पण ती जनावरे कित्येक दिवस धुतलेलीदेखील दिसत नव्हती, स्वच्छतेचा पूर्णच अभाव होता. शेण सगळीकडे विखुरलेले होते. जनावरांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात नव्हती. त्यातूनच किरण यांना जाणवले की, या ठिकाणाहून येणारे दूध घरात वापरण्यापेक्षा आपणच म्हशी विकत घेऊन आपल्याबरोबरच अन्य चार घरांमध्ये दूध पुरवावे. परंतु, म्हशी घेण्याआधी त्यांनी या सर्व विषयावर अभ्यास करायचे ठरवले. त्यासाठी हिंजवडी, रावेत, वाघोली या परिसरातील म्हशींचे मोठे प्लांट पाहिले. त्याचबरोबर गुजरात, हरियाणा, पंजाब या राज्यांत मुक्कामी दौरे केले. त्यादरम्यान त्यांना समजले की, महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी पंढरपुरी म्हशींवर अवलंबून राहतात.
 
परंतु, हरियाणा आणि पंजाब येथील ‘मुरा’ जातीची म्हैस ज्याप्रमाणात दूध देऊ शकते किंवा तिची प्रजनन क्षमता पाहता तीच व्यवसायाला पूरक ठरू शकते. केंद्र सरकारदेखील या म्हशींच्या व्यवसायासाठी सरकारी योजना राबविते. आज हरियाणा राज्य दुग्धउत्पादनात देशात प्रथम याच कारणांमुळे आहे. ‘मुरा’ म्हशीला तिथे ‘ब्लॅक गोल्ड’ म्हटले जाते. त्यामुळेच याच म्हशींचा व्यवसाय करायचा त्यांनी ठरवले. त्यानुसार २०१६ साली हरियाणाच्या कर्नाल येथे दोन म्हशी विकत घेऊन व्यवसायाला प्रारंभ केला. त्या दोन म्हशींपासून तयार झालेल्या पुढच्या म्हशी वडगाव येथे आणल्या गेल्या. परंतु, त्या म्हशींना महाराष्ट्राच्या हवामानात ठेवण्यापासून त्यांचे आधीचे खाणे म्हणजे गव्हाचं काडं, मेथी घास बदलून इथल्या ज्वारीच्या कडबा त्यांनी खावा, यासाठी खूपच कष्ट सोसावे लागले. त्यानंतर त्यांनी त्या म्हशी आजूबाजूच्या परिसरातील शेतकर्‍यांना व्यवसायासाठी द्यायला सुरुवात केली.
 
यादरम्यान त्यांनी एक काळजी घेतली ती म्हणजे, खेळाडूंनी खेळात चांगले प्रदर्शन करावे, यासाठी जसे त्यांचे आहार नियोजन असते. त्याचप्रमाणे जनावरांनी चांगले दूध द्यावे, असे वाटत असेल, तर त्यांचेही आहार नियोजन शेतकर्‍यांना पाळावे लागेल. त्यासाठी व्यवसाय सुरू करणार्‍या शेतकर्‍यांची तीन दिवसांची मोफत निवासी कार्यशाळा घ्यायला त्यांनी सुरुवात केली. या कार्यशाळेत पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत विविध सत्रांचे आयोजन करून प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरच शेतकर्‍यांना म्हशी दिल्या जातात. ज्या शेतकर्‍यांना म्हैस विकत घेण्याचीदेखील आर्थिक अडचण आहे, त्यांना ‘आचार्य डेअरी फार्म’तर्फे कर्ज मिळवून दिले जाते.
 
आजमितीला तीन हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी या कार्यशाळेत भाग घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. अनेक शेतकर्‍यांनी दोन ते चार जनावरे घेऊन डेअरी व्यवसाय सुरू केला. या सर्व शेतकर्‍यांकडील जनावरांपासून दररोज १ लाख, २० हजार किलो शेण तयार होते. यांपैकी निम्म्या म्हणजेच ६० हजार किलो शेणाचे वर्मी-कंपोस्टमध्ये रूपांतर करण्याचे काम ‘आचार्य फार्म’ करते. गेल्या दोन वर्षांत एकूण ४.३८ कोटी किलो गांडूळखत तयार झाले असून, त्यातून १४ हजार, ६०० एकर शेतजमिनीला सेंद्रीय शेती बनवले आहे. या प्रयोगामुळे ग्रामीण शेतीत सेंद्रीय खताचा वापर वाढून रासायनिक खतांचा वापर कमी झाला. याआधी म्हशींचे हरियाणात प्रजनन करून वडगाव येथे आणले जात होते. इथून पुढे वडगाव येथेच ४०० म्हशींचे प्रजनन केंद्र उभारले जात आहे. त्याचेही काम शेवटच्या टप्प्यात आहे.
 
हजारो शेतकर्‍यांना आत्मनिर्भर करणार्‍या ‘आचार्य डेअरी फार्म’ला ‘NDTV न्यूज मीडिया’ने ‘आयकॉन्स ऑफ भारत’ हा पुरस्कार देऊन गौरवले आहे. त्याचबरोबर शेतीविषयक अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0