‘इंटरनेट’च्या पहारेकर्‍याला पर्याय काय?

20 Nov 2025 10:00:07
 
cloudflare
 
मंगळवारी तब्बल तीन तास विविध सोशल मीडिया आणि अन्य साईट्सची सेवा एकाएकी खंडित झाली आणि कालांतराने पूर्ववतही झाली. पण, वरकरणी वाटतो तितका हा सोपा घोळ नाही. ज्या ‘लाऊडफ्लेअर’ कंपनीमुळे ही सेवा ठप्प झाली, त्याला सक्षम पर्याय उभा केला नाही, तर जगावर अशाच डिजिटल संकटांची वारंवार वेळ येऊ शकते.
 
मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार, सायंकाळी ४.३० वाजता इंटरनेटच्या दुनियेत अजबच तक्रारी समोर येऊ लागल्या. ‘सोशल मीडिया साईट्स’पैकी ‘एस’ बंद, ‘चॅट-जीपीटी’वरही एकाएकी कोणतेही उत्तर अगदी मिळेनासे झाले. अचानक आणि एकत्रित बंद पडलेल्या या सर्व संकेतस्थळांनी ‘जग एक खेडे’ या मार्शल मॅकलुहान यांच्या थिअरीची आठवण पुन्हा करुन दिली. सीमेपलीकडे आपण स्वतःला सुरक्षित भासवून घेऊ शकत असलो, तरीही डिजिटल जगातील समान दुवा इंटरनेट आणि त्याद्वारे पुरवल्या जाणार्‍या सेवांना कुठलीही सीमा नाही, त्यावर नियंत्रण मिळवणे मानवाला अशय बनले आहे की काय? अशा स्थितीकडे आपण पोहोचू लागलो आहोत.
 
बातम्यांनुसार, जगभरात ‘लाऊडफ्लेअर’ या कंपनीची सेवा ठप्प झाली आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. तर आता हे ‘लाऊडफ्लेअर’ म्हणजे नेमके काय? तर या इंटरनेटच्या दुनियेतला हा ‘पहारेकरी.’ वेबसाईट्सवर अपलोड होणारा सर्व ‘डेटा’ याच ‘लाऊडफ्लेअर’द्वारे पाठवला जातो. त्यामुळे संकेतस्थळांची पायाभूत सुविधा आणि सुरक्षितता या दोन गोष्टींची हमी घेणारी ही कंपनी अतिशय नावाजलेली. वेबसाईट्स आणि सर्व अ‍ॅप्सना ती सुरक्षा प्रदान करते. अनेक माध्यम संस्थांच्या संकेतस्थळांचाही यात सामावेश आहे.
 
वेबसाईट्सला सतत ऑनलाईन ठेवण्याची जबाबदारीही या पहारेकर्‍यावर असते. मात्र, एका छोट्याशा बदलाने संपूर्ण जगाला वेठीस धरण्यात आले. मग हे सगळे का आणि कसे झाले? याबद्दल ‘लाऊडफ्लेअर’ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली आहे. हा कुठलाही सायबर हल्ला नव्हता, असे कंपनीचे म्हणणे. पण, या यंत्रणेत गेल्या कित्येक वर्षांपासूनचा एक ‘बग’ (त्रुटी) आढळून आला होता. दैनंदिन बदलामुळे तो सक्रिय झाला आणि परिणामी संपूर्ण जगाकडे आ वासून पाहण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
 
कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) ‘डेन नीट’ यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी डेटाबेसमध्ये दैनंदिन बदल करत असताना ‘बॉट प्रोटेशन’ प्रणालीच्या ‘कॉन्फिगरेशन फाईल’मध्ये चुकीच्या एण्ट्रीज येऊ लागल्या होत्या. त्यामुळे फाईल्सची मर्यादा दुप्पट होत गेली. हीच फाईल जागतिक स्तरावरील नेटवर्कमध्ये पसरत गेली. फाईलच्या वजनाने हजारो ‘सर्व्हर्स क्रॅश’ झाले. प्रत्येक फाईल काही मिनिटांत नव्याने तयार होत गेली. सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा घोळ सुरूच होता. त्यामुळे वारंवार या गोष्टीची पुनरावृत्ती होत गेली. यामुळे जगभरातील एकूण एक कोटी ४० लाख इतया वेबसाईट्स ठप्प झाल्या होत्या.
 
यात वर सांगितलेल्या वेबसाईट्स प्रामुख्याने प्रभावित झाल्या. जगातील पाच पैकी एक वेबसाईट ‘लाऊडफ्लेअर’ची सेवा घेते. या संपूर्ण प्रकारामुळे ‘लाऊडफ्लेअर’च्या या प्रकरणानंतर कंपनीचे भांडवली बाजारातील समभागही दोन-तीन टक्क्यांनी घसरले.
‘लाऊडफ्लेअर’ या कंपनीची सेवा बंद पडण्याची ही काही पहिली वेळ नाही. २०१९ आणि २०२२मध्ये असाच प्रकार घडला होता, ज्यात १९ ‘डेटा सेंटर’ बंद पडले होती. तेव्हा सर्व सेवा दीड तास ठप्प होत्या. ‘एआय’वर वाढलेले अवलंबित्व, वाढत चाललेली ‘स्ट्रीमिंग’ची मागणी, ‘इंटरनेट’चा वाढता वापर, त्यामुळे ‘डेटा सेंटर’वर येणारा भार याला सर्वस्वी कारणीभूत ठरत आहे. भविष्यातही अशा शटडाऊनची पुनरावृत्ती नाकारता येत नाही. त्यामुळे महत्त्वाच्या कामांसाठी एकाच टूलवर किंवा वेबसाईटवर अवलंबून न राहता, नेटिझन्सने पर्यायी विचार करून ठेवणेही तितकेच गरजेचे.
 
म्हणा, या घोळानंतर कंपनीनेही लगेचच सतर्कतेचे पाऊल उचलण्यास सुरुवात केली. ‘कॉन्फिंग फाईल’च्या आकारावर मर्यादा आणण्यात आली. तसेच यावर एक स्वयंचलित चाप लावण्यात येणार आहे. अशा जुनाट छुप्या त्रुटींच्या शोधासाठी एक नवीन टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे, ज्याद्वारे असे ‘बग’ शोधून त्यावर उपाय शोधले जातील. भविष्यात अशा कुठल्याही ‘प्रॉसी सर्व्हर’ची चाचणी केल्याशिवाय ते वापरात आणले जाणार नाही.
 
सायबर हल्लेखोरांचा भारतासह जगभरातच सुकाळ असताना, अशाप्रकारच्या त्रुटी नक्कीच परवडणार्‍या नाहीत. कंपनी डेटा केंद्र, ईमेल सुरक्षा, डेटाचोरी या सगळ्यांचा बचाव करते, शिवाय सायबर सुरक्षाही प्रदान करते. ही कंपनी स्वतःला एक रक्षक मानते, ज्यामुळे जगभरात होणार्‍या सायबर हल्ल्यांना परतवून लावण्यात कंपनीचा मोठा वाटा आहे. जागतिक डिजिटल पायाभूत सुविधांमुळे कंपनीने इंटरनेटला गतिमान केले आहे. या सेवा देणार्‍या कंपनीची तिमाही कमाई ४.४२ हजार कोटी रुपये इतकी आहे. कंपनीचे एकूण तीन लाख ग्राहक असून १२५ देशांसोबत कंपनीचा कारभार चालतो. परंतु, अशा प्रकारे सुमारे चार तास ग्राहक वेठीस धरले जाणार असतील, तर पर्यायांची गरजही भासते. विशेषतः जिथे लाखो व्यवहार हे डिजिटल व्यवस्थेवर अवलंबून आहेत. विचार करा, जर हा सायबर हल्ला असता तर जगाला याचा किती मोठा फटका बसला असता.
 
भारतात अशा प्रकारच्या घटनांची ही काही पहिलीच वेळ नाही. सोशल मीडिया कंपन्यांवर कधी ना कधी अशी वेळ येते. पण, मग आपण यातून काय धडा घ्यायला हवा? तर आपण बर्‍याच डिजिटल टूल्सवर अवलंबून आहोत. हल्ली फारशी चलनी नोटा बाळगण्याचीही सवय मोडीत निघालेली दिसते. वाहतूक, रेल्वे, सिग्नल यंत्रणा, आरोग्य, यूपीआय आणि बँका या महत्त्वाच्या सेवा इंटरनेट आणि संकेतस्थळांवरच अवलंबून आहेत. त्यामुळे अशा शटडाऊनचा ‘ओटीटी’, शैक्षणिक मंच आणि सोशल मीडियावर परिणाम जाणवू शकतो. तसेच जगभरात संरक्षणासाठी एकमेव पहारेकर्‍यावर अवलंबून राहणेही काही परवडण्यासारखे नाही. केवळ तीन-चार तास बघ्याची भूमिका घेतल्याशिवाय काहीच करता आले नाही, ही गोष्ट पुन्हा अधोरेखित करते की, मानव इंटरनेट चालवत नसून, इंटरनेट मानवाला चालवत असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
 
इंटरनेटची दुनिया कितीही विकेंद्रीकृत दिसत असली, तरीही सगळे एकाच बेटावर आहेत. ‘लाऊडफ्लेअर’, ‘एडब्लुएस’, ‘गुगल लाऊड’, ‘अकामै’, ‘मायक्रोसॉफ्ट’ आदींच्याच हाती इंटरनेटच्या चाव्या आहेत. काही तांत्रिक बिघाड झाला, तर संपूर्ण जग वेठीस धरले जाऊ शकते, याला एक केंद्रीकृत अपयश म्हटले जाऊ शकते. अशा घटनांमुळे सायबर हल्लेखोरही सोकावतात. अशा बिघाडांचा फायदा घेऊन डेटाची, पैशांची चोरीही संभवते. म्हणूनच अशा एकखांबी व्यवस्थेला पूरक आणि अधिक परिणामकारक पर्याय, ही काळाची गरज म्हणावी लागेल.
 
 
Powered By Sangraha 9.0