बांधकाम क्षेत्रातील एक यशस्वी उद्योजक, श्री शिर्डी साई संस्थानचे माजी अध्यक्ष म्हणून डॉ. सुरेश हावरे सुपरिचित असले, तरी त्यांच्या बहुपेडी जीवनाचे केवळ हेच पैलू नव्हेत. मुळात ते एक अणुशास्त्रज्ञ. प्रतिष्ठित भाभा अणुसंशोधन संस्थेत (बीएआरसी) उणीपुरी तीन दशके ते कार्यरत होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी केलेले संशोधन आता अनेक ठिकाणी प्रत्यक्ष उपयोगात येत आहे. तेव्हा एका अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेत त्यांचे योगदान. तथापि, आता हे यश दिसत असले तरी त्यामागे मेहनत, जिद्द, चिकाटी यांचा वाटा मोठा. मुख्यतः बीएआरसीमधील आपल्या कारकिर्दीचे सिंहावलोकन करणारे ’माझे ’बीएआरसी’चे दिवस’ हे त्यांचे आत्मकथन विदर्भातील एका छोट्या गावातून आलेला; पण ध्येयाने झपाटलेला मुलगा कुठवर मजल मारू शकतो याचा प्रत्यय देणारे आहे. त्यामुळेच ते वाचनीयच नव्हे तर प्रेरकही आहे.
पथ्रोट या गावापासूनची आपली ‘बीएआरसी’पर्यंतची वाटचाल डॉ. हावरे यांनी रेखाटली आहे. त्यातून डॉ. हावरे यांचे लहानपण जसे समजते तशीच त्यांच्या ज्ञानलालसेची कल्पना येते. शाळेत नेहमी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे डॉ. हावरे यांनी दहावीची परीक्षा विशेष प्रावीण्याह उत्तीर्ण केली. त्यानंतर विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी आरएलटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याच सुमारास कसोटी पाहणारे प्रसंग कसे आले, याची माहिती ते देतात. डॉ. हावरे यांचे वडील दादासाहेब हावरे जनसंघाचे कार्यकर्ते. विदर्भात १९७४ मध्ये पुकारण्यात आलेल्या कापूस भाववाढ आंदोलनात ते सामील होते. ते आंदोलन हिंसक झाले आणि पोलिसांनी गोळीबार केला. त्यात दादासाहेबांचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली; पण प्रत्यक्षात ते सुखरूप होते इत्यादी माहिती खिळवून ठेवणारी. बीएस्सी झाल्यानंतर आपल्या गावाला परतले तरी डॉ. हावरे यांना उच्च शिक्षण खुणावत होते. त्याच सुमारास देशात आणीबाणी लागू झाली आणि दादासाहेबांना अटक झाली. त्यामुळे चरितार्थासाठी डॉ. हावरे यांनी एका शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून नोकरी पत्करली.
त्या काळात आपल्या आईने जिद्दीने घर कसे चालविले, याच्या आठवणी डॉ. हावरे मांडतात. पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आलेले दादासाहेब आपल्या पुत्राच्या शिक्षणासाठी आग्रही असणे; एमएस्सी करायचे की अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घ्यायचा याची द्विधा असणे; अखेरीस प्रख्यात लक्ष्मीनारायण अभियांत्रिकी संस्थेत घेतलेला प्रवेश; तेथील प्राध्यापकांच्या; आणि त्यातही विशेषतः प्रा. काळमेघ यांच्या आठवणी; वसतिगृह विद्यार्थी प्रमुख म्हणून झालेली नेमणूक; मिळालेली शिष्यवृत्ती हा सगळा आठवणींचा पट डॉ. हावरे यांनी उलगडून दाखविला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेले असता आपल्या वडिलांनी आणीबाणीचा काळ असूनही डोयावर भगवी टोपी कायम ठेवली होती किंवा महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी दिली असता, समारंभ संपविताना आपण ‘विकीर’ ही संघशाखेवरील दिलेली आज्ञा; त्यातून काही संघ स्वयंसेवक असलेले विद्यार्थी भेटणे आणि ते पुढे मित्र होणे इत्यादी तपशील पुस्तकाची खुमारी वाढविणारा. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना झालेल्या औद्योगिक प्रशिक्षणाचे अनुभव; सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून नागपूर विद्यापीठाकडून मिळालेले सुवर्ण पदक इत्यादी आठवणी रंजक.
तथापि, प्रस्तुत पुस्तकाचे मर्म हे ‘बीएआरसी’मधील दिवसांच्या वर्णनात. याचे कारण त्यात केवळ स्मरणरंजन नाही तर तो सर्व काळ; तेव्हा आलेली संकटे व आव्हाने; केलेली मेहनत; अपयशातून मिळालेले धडे यांचे प्रतिबिंब पडले आहे. भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून रुजू होण्यासाठी चाचण्या आपण दिल्या; पण शेवटच्या मुलाखतीच्या फेरीत आपण बाद झालो, ही आठवण नमूद करून या अपयशाने आपल्याला स्वतःच्या क्षमता, त्यांच्या मर्यादा यांची जाणीव झाली आणि पर्यायाने त्यात सुधारणा करण्याची प्रेरणा मिळाली, असे डॉ. हावरे सांगतात.
‘आयआयटी मुंबई’, पुण्यातील ‘हिंदुस्थान अँटिबायोटिस’, बंगळुरुस्थित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ आणि ‘बीएआरसी’ अशा चार संधी आपल्याला होत्या; त्यांतील ‘बीएआरसी’ची निवड आपण केली, कारण तेथे नोकरी व शिक्षण दोन्ही करता येणार होते, असे डॉ. हावरे नमूद करतात. त्याच ओघात ‘बीएआरसी’चे आगळेपण अगदी मुलाखतीपासून कसे आहे, याचा ओघात उल्लेख करतात. उमेदवाराच्या मुलाखतीत इतर ठिकाणचा पवित्रा हा उमेदवार नाकारण्याचा असतो; पण ‘बीएआरसी’मध्ये मात्र उमेदवाराला प्रश्न विचारून योग्य उत्तराच्या जवळ नेण्याची पद्धत होती, असे डॉ. हावरे यांनी नमूद केले आहे; ते रोचक! ‘बीएआरसी’मध्ये प्रशिक्षणार्थी मिळालेला प्रवेश; नंतर अणुशास्त्रज्ञ म्हणून मिळालेली नोकरी, याचे वर्णन करून डॉ. हावरे यांनी आपण यशस्वी करून दाखविलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली आहे.
आण्विक पाणबुड्यांशी संबंधित त्यांनी केलेले संशोधन आणि त्यातून विकसित केलेली ‘ओपन हायपरलुप थर्मो सिम्फन’ प्रणाली; त्या प्रणालीचा पुढे २०१६ मध्ये भारताच्या ‘आयएनएस अरिहंत’ या आण्विक पाणबुडीत झालेला अंतर्भाव किंवा भारताच्या अणुशक्ती कार्यक्रमासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे १९७५ मध्ये आलेले धोरण; अणुभट्यांतील संभाव्य अपघातांच्या सर्व शयता हाताळणार्या ‘काँट्रान’ या ‘कम्प्युटर कोड’चा केलेला विकास, या आपल्या योगदानाचे वर्णन करताना डॉ. हावरे अनेक तांत्रिक तपशील देतात. त्यामुळे वाचकाला या सर्व आव्हानांचे आकलन होण्यास मदत होते आणि डॉ. हावरे यांनी केलेले संशोधन किती महत्त्वाचे होते, याचीही जाणीव होते.
‘मद्रास अॅटोमिक पॉवर स्टेशन’ आणि ‘बीएआरसी’च्या सामायिक प्रकल्पावर केलेले काम; श्रीनगर येथे त्यावेळच्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजात झालेल्या परिषदेतील सहभाग; कर्नाटकातील कैगा अणुशक्ती केंद्रातील डिझाईनच्या परीक्षणासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य म्हणून आलेले अनुभव; १९९६ मध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या व्हिएन्ना येथे झालेल्या परिषदेत भारतीय अणुशास्त्रज्ञ पथकाचे प्रमुख म्हणून घेतलेला सहभाग; इत्यादी अनुभव व आठवणी डॉ. हावरे यांनी समरसून लिहिल्या आहेत. आपल्या भावाच्या संशयास्पद अपघाती मृत्यूमुळे त्याचा बांधकाम व्यवसाय सावरण्यासाठी ‘बीएआरसी’मधून २००६ मध्ये घेतलेली निवृत्ती; त्या व्यवसायाची सांभाळली धुरा; तेथे सिद्ध केलेले कर्तृत्व हा पटदेखील डॉ. हावरे कथन करतात.
स्वेच्छानिवृत्ती घेऊन दोन दशके उलटूनही ‘बीएआरसी’च्या आठवणी अद्याप डॉ. हावरे यांना हुरहूर लावतात, हे पानोपानी जाणवते. ‘बीएआरसी’ म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेचे प्रतीक असल्याची भावना ते व्यक्त करतात; तो सर्व काळ आनंदाचा व समाधानाचा होता असे ते म्हणतात आणि ते जग वेगळेच होते व कितीही प्रयत्न केला तरी त्याचे वर्णन शब्दांत करता येत नाही, असे लिहिताना भावुक होतात. पुस्तकाच्या शेवटी कवितेतून ’आयुष्य नेईल तिकडे तुम्हाला जावेच लागते’ ही एक प्रकारची अपरिहार्यता ते अधोरेखित करतात. ‘बीएआरसी’मधील दिवस हा पुस्तकाचा कॅनव्हास असला तरी या सर्व निवेदनातून एका बुद्धिमान; मेहनती व ध्येयवादी व्यक्तिमत्वाचा परिचय वाचकाला होतो ही या पुस्तकाची जमेची बाजू. पुस्तकाला अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कमलेश एन. व्यास यांची प्रस्तावना लाभली आहे.
पुस्तकाचे नाव : माझे ’बीएआरसी’चे दिवस
लेखक : डॉ. सुरेश हावरे
अनुवाद : भगवान दातार
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या : (जन आवृत्ती) १८७
मूल्य : रुपये २००
- राहूल गोखले