सिंधुदुर्गच्या किनारी पुन्हा एकदा दुर्मीळ समुद्री पक्ष्यांची स्वारी

    02-Nov-2025
Total Views |
sindhudurg pelagic bird



मुंबई (विशेष प्रतिनिधी)-
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या वादळजन्य परिस्थितीमुळे दुर्मीळ समुद्री पक्षी सिंधुदुर्गच्या किनारी भागात ढकलले गेले आहेत (sindhudurg pelagic bird). वाऱ्याच्या जोरदार प्रवाहामुळे खोल समुद्रात अधिवास करणारे समुद्र पक्षी हंगाम नसताना देखील देवगड-कुणकेश्वर किनारपट्टी भागात दिसत आहेत (sindhudurg pelagic bird).
 
 
समुद्री पक्षी हे खोल समुद्रामध्ये अधिवास करण्यासाठी ओळखले जातात. ते सहसा मुख्य भूमीवर येत नाहीत. ते खोल समुद्रामध्ये अधिवास करतात. तिथल्या बेटांवरच या पक्ष्यांची वीणवसाहत असते. मात्र, पावसाळी हंगामात जोरदार वाऱ्यामुळे हे समुद्री पक्षी मुख्य भूमीवर फेकले जातात. मात्र, सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर अवेळी पावसाचे आगमन झाले आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे खोल समुद्रात अधिवास करणारे समुद्री पक्षी किनारी भागात ढकलले गेले आहेत. सिंधुदुर्गातील पक्षीनिरीक्षक श्रीकृष्ण मगदूम यांनी देवगड आणि कुणकेश्वर किनारपट्टीभागातून अशाच काही दुर्मीळ समुद्री पक्ष्यांची नोंद केली आहे.
 
फ्रिगेटबर्ड, विल्सन स्ट्रोम पेट्रेल, आर्टिक स्कुआ सारखे पक्ष्यांची नोंद मगदूम यांनी देवगड किनाऱ्यावरुन केली आहे. यामधील फ्रिगेटबर्ड पक्ष्याच्या नेमक्या प्रजातीची ओळख पटलेली नाही. यामधील लेसर फ्रिगेटबर्ड हा पक्षी ७५ सेमीचा म्हणजेच जवळपास २ फूट लांबीचा असला तरी, तो फ्रिगेटबर्ड प्रजातीमधील आकाराने सर्वात लहान पक्षी आहे. हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागरात हा पक्षी आढळतो. यामध्ये ख्रिसमस आयलँड फ्रिगेटबर्ड ही प्रजात केवळ ख्रिसमस बेटांवर विण करते. प्रजनन हंगामाच्या व्यतिरिक्त हा पक्षी सुमारे १० हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करत असल्याच्या नोंदी आहेत. जगातील सर्व पक्षी प्रजातींपैकी 3.5 टक्के प्रजाती समुद्री पक्षी गटातील आहेत. भारतात सागरी परिक्षेत्रात समुद्री पक्ष्यांच्या साधारण ५० प्रजाती सापडतात, तर महाराष्ट्रात १५ ते १६ प्रजाती आढळतात.