काही व्यक्तींचा जन्म हा केवळ योगायोगाने नसतो, तर तो एका ठरावीक उद्देशासाठीच असतो. कै. राजपाल पुरी हे अशाच एका महान ध्येयासाठी जन्मलेले व्यक्तिमत्त्व होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातून त्यांनी हिंदू समाजाच्या एकतेसाठी, राष्ट्रभक्तीच्या जागृतीसाठी आणि संघटनशक्तीच्या उभारणीसाठी आयुष्य समर्पित केले. सियालकोटपासून सिंधपर्यंत आणि मुंबईपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांचे कार्य झळकत राहिले. त्याग, निष्ठा आणि मातृभूमीप्रती भक्ती यांचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या अशा या संघतपस्वी कै. राजपाल पुरी यांच्या संघकार्यातील योगदानाचा आढावा घेणारा हा लेख...
काही व्यक्तींचा जन्म हा केवळ योगायोगाने नसतो, तर तो एका ठरावीक उद्देशासाठीच होतो. कै. राजपाल पुरी यांचा जन्मही अशाच एका महान उद्देशासाठी झाला होता. ते या राष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि हिंदू समाजाच्या एकतेसाठी कार्य करण्यासाठीच जन्माला आले होते. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्य निष्ठेने पार पाडले.
राजपाल पुरी यांचा जन्म दि. १८ ऑगस्ट १९१८ रोजी सियालकोट येथे झाला, जे आता पश्चिम पाकिस्तानमध्ये आहे. त्यांचे घर वीर हकीकत राय यांच्या समाधीसमोर होते. राजपाल हे बिशम्बरनाथ आणि बिंद्रादेवी यांचे थोरले चिरंजीव. त्यांना एक धाकटा भाऊ संतोषपाल आणि दोन बहिणी - दमयंती व विद्यादेवी. त्यांचे आजोबा करमचंद पुरी हे देखील प्रसिद्ध वकील होते. बिशम्बरनाथ स्वतः एक नामांकित वकील होते आणि त्यांची मोठी कायदेशीर प्रॅटिस होती.
राजपाल पुरी फक्त ११ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर राजपालजींनी आपले माध्यमिक शिक्षण स्कॉट ख्रिश्चन मिशन हायस्कूल (उर्दू माध्यमातून) येथे पूर्ण केले. त्यांनी १९३९ साली म्युरे कॉलेजमधून इंग्रजी, संस्कृत, राज्यशास्त्र आणि हिंदी या विषयांसह सन्मानाने पदवी प्राप्त केली. ते अतिशय गुणी विद्यार्थी होते आणि त्यांनी संपूर्ण शिक्षण शिष्यवृत्तीवर पूर्ण केले. महाविद्यालयीन काळात ते दोन वर्षे विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते, तसेच कॉलेज हॉकी लबचे सदस्य होते. सियालकोटमध्येच १९३६ साली त्यांची ओळख के. डी. जोशी यांच्याशी झाली. के. डी. जोशी हे त्यावेळी उत्तर पंजाब प्रांत प्रचारक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नेमले गेले होते. त्यांनी राजपालजींना संघाचे महान आदर्श आणि उद्दिष्टे समजावून सांगितली. या भेटीने राजपालजींना आयुष्याचा मार्गच सापडला. ते संघाचे समर्पित कार्यकर्ते झाले आणि आयुष्यभर संघकार्याशी जोडलेले राहिले.
महाविद्यालयीन काळातच राजपालजींच्या मनात एक गहन प्रश्न उभा राहिला होता. इतका वैभवशाली इतिहास आणि समृद्ध संस्कृती असूनही हिंदूंना हजारो वर्षे परकीयांच्या गुलामगिरीत का जगावे लागले? या दैनावस्थेतून हिंदू समाजाला मुक्त कसे करता येईल आणि त्याचे हरवलेले वैभव पुन्हा कसे प्राप्त करता येईल, याचे उत्तर ते शोधत होते. त्यांनी प्रथम या प्रश्नाचे उत्तर आर्य समाजात शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना लक्षात आले की, आर्य समाजाचा कल मुख्यतः धार्मिक सुधारणेकडे होता, आणि त्यांना असे कार्य हवे होते, जे संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र करून एक सशक्त, संघटित आणि आत्मनिर्भर शक्ती म्हणून उभे करणे, जे काळाच्या सर्व आव्हानांना तोंड देऊ शकेल.
१९३७ साली त्यांनी संघदृष्ट्या पहिल्या वर्षाचे अधिकारी प्रशिक्षण वर्ग नागपूर येथे पूर्ण केले, १९३८ साली द्वितीयचे प्रशिक्षणही घेतले. १९३९ मध्ये त्यांनी तृतीयचे संपूर्ण प्रशिक्षण नागपूर येथे पूर्ण केले. १९३९ मध्ये नागपूरमधील तिसर्या वर्षाचे प्रशिक्षण संपवून परतताना, राजपालजींच्या मनात एक ठाम श्रद्धा निर्माण झाली. हिंदू समाजाच्या पुनरुत्थानाचे आणि बळकटीकरणाचे कार्य फक्त आणि फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघच करू शकतो, अन्य कोणी नाही. त्यांनी आपल्या अंतःकरणात एक पवित्र संकल्प केला की, आयुष्यभर ते हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी आणि भारताच्या पुनर्रचनेसाठी स्वतःला समर्पित करतील. ते राष्ट्राला पुन्हा त्याच्या प्राचीन वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीच्या मनात शिस्त, एकता आणि राष्ट्रीय चारित्र्याची जाणीव निर्माण करण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहतील, असा त्यांनी त्याक्षणी निर्धार केला.
राजपाल पुरी यांची दिल्लीतील संरक्षण विभागात निवड झाली होती. त्यांना जे पद मिळाले होते, ते गॅझेटेड अधिकार्याच्या थोडे खालील दर्जाचे होते. त्यांनी दि. १ नोव्हेंबर १९३९ रोजी आपली नोकरी सुरू केली. जर त्यांनी ती नोकरी सुरू ठेवली असती, तर निश्चितच ते अत्यंत वरिष्ठ पदावर आणि मानाच्या स्थानावर पोहोचले असते. परंतु, त्यांच्या देह-मनाचे समर्पण हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी झाले होते. त्यांनी आपला पहिला पगार दि. १ डिसेंबर १९३९ रोजी स्वीकारला आणि त्याच दिवशी नोकरीचा राजीनामा देऊन आपले संपूर्ण आयुष्य मातृभूमीच्या सेवेसाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला.
दि. १ डिसेंबर १९३९ रोजी संघाचे समर्पित प्रचारक नारायणराव पुराणिक त्यांच्या राहत्या घरी सायकलने गेले. त्या रात्री राजपालजींनी दिल्लीतील आपले तात्पुरते निवासस्थान शांतपणे सोडले. नारायणरावांनी त्यांना सायकलीवर बसवून दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचवले. तिथून राजपालजींनी रेल्वे पकडली आणि दि. ३ डिसेंबर १९३९ रोजी ते कराची येथे पोहोचले. केवळ २० वर्षांचा हा तरुण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आणि हिंदुत्वाचा नवा संदेश घेऊन, त्या काळात सिंध प्रदेशात आला, जेव्हा त्या विचारांची आणि प्रेरणेची सर्वाधिक आवश्यकता होती. सिंधच्या भूमीवर पाऊल ठेवताच, त्यांच्या निःस्वार्थ समर्पणाने आणि अथक प्रयत्नांनी, तेथे संघकार्याच्या गौरवशाली युगाची सुरुवात झाली. हे कार्य त्यांनी अखंडपणे दि. १५ ऑगस्ट १९४७, म्हणजे भारताच्या फाळणीपर्यंत चालू ठेवले. अशा रीतीने, राजपालजींनी आपले घर आणि नोकरी सोडून राष्ट्रसेवेचा मार्ग स्वीकारला, ज्याची सुरुवात दि. ३ डिसेंबर १९३९ रोजी सिंधमध्ये झाली. ते पुढील १४ वर्षांहून अधिक काळ (१९३९ ते एप्रिल १९५४) संघाचे पूर्णकालिक प्रचारक म्हणून कार्यरत राहिले.
यानंतर त्यांनी मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि या क्षेत्रातही त्यांनी उत्कृष्ट यश आणि कीर्ती मिळवली. न्यायमूर्ती (इशपलह) आणि वकिलांमध्ये (इरी) त्यांना उच्च सन्मानाचे स्थान प्राप्त झाले होते. कामगार कल्याण, औद्योगिकीकरणाचा विकास आणि सामाजिक प्रगतीसाठी त्यांच्या योगदानाची नेहमी आठवण राहील. वकिलीच्या व्यवसायासोबतच त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, त्यांनी आपला व्यवसाय आणि संघाचे कार्य व विचारसरणी यांचा परस्पर संबंध जोडला होता. त्यांचे संपूर्ण जीवन मातृभूमीच्या सेवेसाठी आणि हिंदू समाजाच्या ऐयासाठी समर्पित होते. त्यांच्या प्रत्येक कृतीचा हेतू समाजाच्या कल्याण आणि उन्नतीकडे होता.
राजपाल पुरी यापूर्वी कधीही सिंधमध्ये गेले नव्हते. त्यांना तेथील संस्कृती, परंपरा, रूढी-प्रथा, तसेच भौगोलिक स्थिती आणि सिंधी समाजाच्या अडचणी यांविषयी काहीच माहिती नव्हती. अशा परिस्थितीत केवळ २० वर्षांचा हा तरुण, आपल्या पूर्ण मनोभावे समर्पणाने, काळाच्या ओघात दुर्बल झालेल्या महान हिंदू समाजाला पुन्हा जागवण्यासाठी आणि भारताला एक बलवान, सशक्त राष्ट्र बनवण्यासाठी सिंधमध्ये आला. सन १८४३ पासून सिंधमधील हिंदू लोकसंख्येच्या केवळ २५ टक्के होती, म्हणजेच ते संपूर्ण अल्पसंख्याक होते. त्यांच्या नावावर एक एकर जमिनीदेखील नव्हती. परंतु, १९४७ पर्यंत त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि जागृतीमुळे, हिंदूंनी सिंधमधील सुमारे ४० टक्के जमीन आपल्या मालकीत घेतली होती. ही एक विलक्षण परिवर्तनाची कहाणी होती.
राजपालजींनी हैदराबाद (सिंध) येथे जाण्याचा निर्णय घेतला. तेथे पोहोचल्यावर, त्यांनी विचार केला की, शिक्षक होणे हेच मुलांशी संपर्क साधण्याचे सर्वोत्तम माध्यम ठरेल.
ते स्वतः एक विद्वान विद्यार्थी आणि प्रथम श्रेणीतील पदवीधर असल्याने, त्यांनी एन. एच. अकादमी (छ.क. अलरवशू) मध्ये शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. थोड्याच काळात त्यांनी शाळेच्या प्रशस्त मैदानावर संघाची शाखा सुरू केली. त्या काळात संघाकडे प्रचारकांच्या खर्चासाठी आर्थिक साधनसंपत्ती नव्हती. म्हणून प्रचारकांना स्वतः काम करून आपला खर्च भागवावा लागे आणि त्याचवेळी संघकार्यही चालू ठेवावे लागे. राजपाल यांनी जवळपास ३० महिन्यांपर्यंत ‘एन. एच. अकादमी’मध्ये शिक्षक म्हणून कार्य केले. ते आपल्या पगाराचा मोठा हिस्सा सियालकोटमधील आपल्या आईला पाठवत आणि स्वतः मात्र अत्यंत साध्या, संयमी आणि मितव्ययी जीवनशैलीत राहत. नंतर, त्यांच्या धाकट्या भावाला संतोष पाल यांना नोकरी मिळाल्यानंतर, राजपालजींनी शिक्षकी व्यवसाय सोडला आणि आपला सर्व वेळ व शक्ती संघकार्याला समर्पित केली.
राजपाल पुरी यांनी डिसेंबर १९३९ मध्ये संघकार्य सुरू केले आणि फक्त सहा महिन्यांच्या कालावधीतच, त्यांनी सहा स्वयंसेवकांना १९४०च्या नागपूर प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. सन १९४७ पर्यंत सिंधमध्ये संघकार्याला अवघे नऊ वर्षेच झाली होती. परंतु, हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल की, स्वातंत्र्योत्तर भारतातील कोणत्याही प्रांतात संघकार्य एवढ्या व्यापक प्रमाणात झाले नव्हते, जितके सिंधमध्ये झाले. त्या काळात सिंधची लोकसंख्या सुमारे ४० लाख होती, त्यापैकी हिंदू केवळ १३ लाख होते. या अल्पसंख्य हिंदू समाजातूनच दररोज २० हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक शाखांमध्ये उपस्थित राहात असत.
संघ संस्थापक प.पू.डॉ. हेडगेवार यांनी एकदा म्हटले होते की, "शहरी भागात किमान तीन टक्के व ग्रामीण भागात किमान एक टक्के संघाचे कृतिशील स्वयंसेवक असतील, तर आवश्यक ते सामाजिक परिवर्तन आपण घडवून आणू शकू आणि आपले ध्येय साध्य होईल.”
संघाला आज १०० वर्षांचा इतिहास झाला असला तरी, देशातील एकही शहर, गाव किंवा परिसर हा डॉ. हेडगेवार यांच्या या उद्दिष्टाची पूर्तता करण्यास अजून तितकासा सक्षम ठरलेला नाही. परंतु, सिंध हा एकमेव प्रदेश होता, ज्याने डॉ. हेडगेवार यांच्या या स्वप्नाला वास्तवात आणले. हैदराबाद (सिंध) शहरात हिंदू लोकसंख्येच्या तीन टक्के लोक दररोज शाखेत उपस्थित राहात असत.
यामुळेच असे ठामपणे म्हणता येईल की, राजपालजी हे पहिले आणि आजपर्यंत एकमेव असे स्वयंसेवक होते, ज्यांनी इतया विलक्षण प्रमाणात हे ध्येय साध्य केले; एक असे कार्य, ज्याचा आजवर पुरेसा सन्मान आणि मूल्यमापनही झालेले नाही. सिंधमधील एकही गाव असे नव्हते, जिथे संघप्रार्थना गायली जात नव्हती. त्यांच्या निष्ठा आणि समर्पणाने युवकांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला. केवळ नऊ वर्षांच्या कालावधीत, ६२ हून अधिक पूर्णवेळ प्रचारक संघकार्याला वाहून घेतले, मातृभूमीच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केले. हे सर्व शय झाले, कारण राजपाल पुरी यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावशाली, प्रेरणादायी आणि आदर्शवत होते.
त्यांनी तरुणांमध्ये नैतिकता, कर्तव्यभावना आणि राष्ट्रीय अभिमानाची ठिणगी पेटवली. अगदी सिंधमधील वरिष्ठ काँग्रेस नेतेदेखील आपल्या मुलांना शाखेत पाठवू लागले. कारण, त्यांना खात्री पटली की, संघच त्यांच्या मुलांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त आणि सुसंस्कार निर्माण करू शकतो. हीच त्या तरुण राजपालजींच्या कार्याची चमत्कारिक देणगी होती. संघाने सिंधमध्ये राष्ट्रीयत्व आणि देशभक्तीची भावना रुजवली आणि संपूर्ण समाजव्यवस्थेचे चित्र पालटले.
प्रारंभीच्या काळात संघाचे कोणतेही कार्यालय नव्हते. म्हणून राजपालजींना स्वयंसेवकांच्या घरात राहावे लागायचे. त्यांचे अतिशय प्रेमाने आणि आदराने स्वागत केले जाई. अनेक स्वयंसेवकांच्या पालकांनी तर आग्रहाने त्यांना आपल्या कुटुंबात राहण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या निर्दोष चारित्र्यामुळे, विनम्र स्वभावामुळे आणि स्नेहपूर्ण वर्तनामुळे, ते सर्वांच्या मनात आपुलकी आणि आदराचे स्थान मिळवू शकले.
राजपालजींनी ठरवले की, समाजातील प्रत्येक घटक संघाशी जोडला गेला पाहिजे. त्यांनी समाजातील प्रमुख आणि प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क साधला आणि त्यांना संघाच्या कार्यात सामील केले. त्यांच्या विनंतीवरून खानचंद गोपालदास - एक प्रतिष्ठित वकील - कराचीचे संघचालक झाले. तसेच होटचंद गोपालदास अडवाणी, आणखी एक नामांकित वकील, राजपालजींच्या आदरामुळे आणि त्यांच्या विनंतीवरून हैदराबाद (सिंध)चे संघचालक होण्यास तयार झाले. राजपालजींकडे प्रत्येक स्वयंसेवकाची क्षमता, गुण आणि स्वभाव ओळखण्याचे अद्वितीय कौशल्य होते. ते फक्त स्वयंसेवकांची गुणवत्ता ओळखत नसत, तर त्या गुणवत्तेनुसार त्यांना जबाबदार्या सोपविण्याची बुद्धिमत्ताही त्यांच्यात होती. त्यांचा उद्देश एकच होता - संघकार्याचा विस्तार करणे आणि प्रत्येक स्वयंसेवकाला त्याच्या सामर्थ्याप्रमाणे कार्यक्षम बनवणे.
१९४२ साली सिंधमध्ये (कराची वगळता) ‘मार्शल लॉ’ लागू करण्यात आला. चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र फिरण्यास बंदी होती. ब्रिटिश अधिकार्यांनी हैदराबाद (सिंध) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची तपासणी केली, पण काहीही संशयास्पद सापडले नाही. तरीही डिसेंबर १९४२ मध्ये राजपाल पुरी, लोकनाथ जेटली आणि दिवान मोटवानी यांना अटक करण्यात आली आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. दिवाणी न्यायालयांनाही त्यांच्यावर काही अधिकार नव्हता. त्यावेळी होटचंद गोपलदास अडवाणी, एक नामवंत वकील आणि प्रभावशाली व्यक्ती, त्यांनी ‘मार्शल लॉ’ प्रशासक रिचर्डसन यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे तिघांनाही कोणतीही अट न घालता सोडण्यात आले.
एकदा राजपालजींनी हैदराबाद (सिंध) येथे एक मोठे स्वयंसेवकांचे संचलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. स्वयंसेवक दोन-दोन जणांच्या जोडीत, नवा विद्यालय हायस्कूलपासून ते दास गार्डनपर्यंत, अंदाजे तीन किलोमीटरचे अंतर चालत गेले. या संचलनाने शहरात प्रचंड उत्सुकता आणि चर्चा निर्माण झाली. मार्शल लॉ प्रशासक रिचर्डसन स्वतःही संचलन पाहून चकित झाले, पण कोणतीही कारवाई करण्यास ते असमर्थ होते. त्या काळात संघाच्या शाखा सिंध आणि बलुचिस्तानच्या प्रत्येक कोपर्यात चालू होत्या. कार्याच्या विस्तारासोबतच बळकटीकरणाचे नियोजनही राजपालजींनी काटेकोरपणे केले होते. निःस्वार्थी देशभक्त स्वयंसेवकांची फौज अविश्वसनीय प्रमाणात वाढत गेली आणि त्यामागे होती राजपालजींची दूरदृष्टी, संघटनशक्ती आणि मातृभूमीवरील अपार प्रेम!
१९४३ साली संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. श्रीगुरुजी यांचा सिंध दौरा झाला होता. त्यांचा हा दौरा स्वयंसेवक आणि नागरिकांसाठी आश्चर्यकारक आणि आनंददायी धक्का होता. कारण, त्यांच्या आगमनाची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. त्या काळात ‘मार्शल लॉ’ लागू असल्याने, हा दौरा पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला होता. श्रीगुरुजींच्या उपस्थितीने वातावरणात एक प्रकारची विद्युतलहरी निर्माण झाली. शहरभर उत्साह, आनंद आणि अभिमानाची लाट उसळली - ज्याला प्रत्यक्ष पाहणार्यांनाच त्याचे खरे महत्त्व जाणवले.
१९४७च्या अधिकारी प्रशिक्षण वर्गात राजपालजींनी प. पू. श्रीगुरुजींशी एक महत्त्वाचा सिंधमधील हिंदूंच्या संरक्षणासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्याचा विषय मांडला होता. गुरुजींनी त्याला तत्काळ परवानगी दिली. यानंतर राजपालजींनी एक सुसूत्र संरक्षण योजना तयार केली. दि. ५ ऑगस्ट १९४७ रोजी श्रीगुरुजी कराचीला आले. एक भव्य सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली. या सभेला एक लाखांहून अधिक लोक उपस्थित होते आणि साधू टी. एल. वासवानी यांनी अध्यक्षस्थान भूषवले. दहा हजारांहून अधिक स्वयंसेवक गणवेशात उपस्थित होते. सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अभूतपूर्व होता. साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या कराची शहराने इतकी अनुशासित, राष्ट्रभक्तीने ओतप्रोत सभा कधीच पाहिली नव्हती.
राजपालजी भारतभूमीची सेवा आणि निद्रिस्त हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी जन्मलेले होते. त्यांनी हे कार्य आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत अखंडपणे केले. सिंधमध्ये ‘आरएसएस म्हणजेच राजपालजी’ अशी एकच ओळख निर्माण झाली होती. शून्यातून त्यांनी अवघ्या आठ वर्षांत प्रचंड शक्तिशाली संघटन उभे केले. त्यांनी सामान्य माणसांमधूनही असे असामान्य कार्यकर्ते घडवले की, जे मातृभूमीच्या कार्यासाठी सर्वस्व अर्पण करण्यास तयार होते.
भारताच्या फाळणीनंतर सिंधींना आपली भूमीच गमवावी लागली. या परिस्थितीत सिंधी बांधवांचे योग्य पुनर्वसन व्हावे, ही जबाबदारी राजपालजींनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. मुंबईत त्यांनी उल्हासनगर, मालाड आणि चेंबूर अशा विविध ठिकाणी राहून पुनर्वसनाचे कार्य चालवले. तेथे त्यांनी सिंधी शरणार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवक व कार्यकर्त्यांना विविध शहरांत पाठवले, जेणेकरून नव्याने आलेल्या सिंधी निर्वासितांचे स्वागत करून त्यांना स्थायिक होण्यास मदत करता येईल.
१९४८ मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली, तेव्हा राजपालजी जनाधिकार समिती या संस्थेचे सचिव झाले. ही संस्था दिल्ली येथे होती. भारत सरकारने सांगितले की, संघावरून बंदी उठवायची असल्यास त्याचा लिखित संविधान तयार करणे आवश्यक आहे. प. पू. श्रीगुरुजींनी या संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी राजपालजी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, दादासाहेब आपटे आणि एकनाथ रानडे यांच्यावर सोपवली. बंदी उठवल्यानंतर राजपालजींना गुजरात प्रांत प्रचारक म्हणून नियुक्त करण्यात आले.
एप्रिल १९५४ मध्ये प्रचारक पद सोडल्यानंतर, राजपालजींनी आपला वकिली व्यवसाय पुन्हा सुरू केला. राजपालजींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलची परीक्षा दिली आणि प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना ‘सर चिमणलाल सेटलवाड जुबिली मेमोरियल’ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यांचा धाकटा भाऊ १९५२ मध्ये निधन पावल्यावर, घरात राजपालजी हेच आई-बाबांचे एकमेव अपत्य राहिले. त्यांच्या आई बिंद्रादेवींनी त्यांना विवाह करण्याची विनंती केली. आईच्या इच्छेला न जुमानता राहणे त्यांना शय नव्हते. त्यामुळे त्यांनी १९५४ साली कमला मंगल यांच्याशी विवाह केला. दुर्दैवाने, नेमके दोन महिन्यांनी त्यांच्या आईंचे मुंबईत निधन झाले.
ऑगस्ट १९७५ मध्ये, राजपालजी अमेरिकेला गेले. त्या काळात लंडनमध्ये त्यांनी भारतातील आणीबाणीच्या काळात झालेल्या अत्याचारांविरुद्ध तीव्र मोहीम उभारली. त्यांच्या पुढाकारानेच ‘फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनल’ या संस्थेची स्थापना झाली, ज्याने परदेशात भारतीय लोकशाही आणि मानवाधिकारांचे समर्थन केले. भारतामध्ये परतल्यानंतर, राजपालजी भूमिगत झाले. कारण, त्यांच्याविरुद्ध ‘मिसा’ अंतर्गत अटक वॉरंट जारी झाले होते. आणीबाणीचा काळ सुरू असताना, ते निसर्गशांती मान्य करणार्यांपैकी नव्हते - ते सतत सक्रिय राहिले.
१९७७ साली निवडणुका जाहीर झाल्या. राजपालजींनी त्यात सक्रिय सहभाग घेतला. मात्र, निवडणुकीच्या काही दिवस आधीच त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला. दि. २४ मार्च १९७७ रोजी पहाटे २ वाजता झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या मनात एकच विचार होता ’निवडणुकीचा निकाल काय लागला?’ दि. २७ मार्च १९७७ रोजी निकाल जाहीर झाला. तेव्हा त्यांनी डॉटरांना तपासणीस नकार देत सर्वप्रथम वर्तमानपत्र वाचण्याचा आग्रह धरला. जेव्हा त्यांना समजले की, त्यांचे सहकारी केंद्रीय मंत्रिमंडळात निवडून आले आहेत, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
मात्र, त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ७:४५ वाजता त्यांना दुसरा तीव्र झटका आला, जो प्राणघातक ठरला. ते मागे पत्नी कमला आणि दोन पुत्र - रोहित आणि ललित - यांना सोडून गेले. त्यांचे संपूर्ण जीवन हे त्याग, समर्पण, निष्ठा आणि मातृभूमीप्रती अखंड भक्ती यांचे एक प्रेरणादायी अमृतगाथा होते.