महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथका’ने नुकतेच पुण्यातील कोंढव्यातून उच्चशिक्षित संगणक अभियंता झुबेर हंगरगेकरला ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक केली. या बातमीमुळे केवळ पुणे जिल्हाच नाही, तर सबंध महाराष्ट्रसुद्धा हादरला आहे. बंदी असणारी दहशतवादी संघटना ‘अल कायदा’चे आणि पुण्याचे नाव यानिमित्ताने पुनश्च चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर पुणे नेमके दहशतवाद्यांचे आश्रयस्थान का ठरते आहे, याचा ऊहापोह करणारा हा लेख...
पुणेच का? पुणे शहर सध्या दहशतवाद्यांचा अड्डा बनले आहे का? पुणे म्हणजे दहशतवाद्यांसाठी ‘सुरक्षित स्वर्ग’ ठरतोय का? पूर्वी निवृत्तीधारकांचे आवडते, निवांत, शहर आता किती बदलले? ‘ऑसफोर्ड ऑफ द ईस्ट’, ‘विद्येचे माहेर’, ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक-शैक्षणिक राजधानी’ वगैरे बिरुदावली मिरवणारे पुणे... मात्र, दुर्दैवाने आज हेच शहर हल्ली दहशतवाद्यांची अटक, ‘इसिस’चे ‘पुणे मोड्युल’, ‘अल कायदा’शी आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) अशा कट्टर इस्लामिक दहशतवादी संघटनांशी संबंधित दहशतवाद्यांच्या, ‘स्लीपर सेल’ उद्ध्वस्त केल्याच्या बातम्यांमुळेच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे!
अशा दहशतवादी कनेक्शनशी निगडित अनेक चर्चा सध्या पुण्याच्या कानाकोपर्यात रंगल्या आहेत आणि अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे तसे होणे, हे स्वाभाविकच. पुणेकरसुद्धा यामुळे काहीसे अस्वस्थ झाल्याचे चित्र दिसते. कालौघात शहराचा विकास होणे, आकार बदलणे हे आलेच. बदलत्या काळाप्रमाणे लहानसहान गावांचा सुद्धा कायापालट होतो, तर मग पुण्याचे सुद्धा रुपडे पालटणार, हे अभिप्रेतच. पण, या बदलाच्या पुणेरी नारायणपेठीच्या मागे, जी राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणणारी दहशतवादाची काळी झालर आहे, ती कशी आणि कुणी जोडली? हाच खरा प्रश्न!
एकेकाळी अगदी शांत, सणवार, संस्कृती जपणारे, सुरक्षित असणारे पुणे शहर, हल्ली आपली ही ओळख काहीसे गमावत चालले आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये. गेल्या दोन दशकांत वेगाने वाढलेल्या विशेषत: आयटी-सॉफ्टवेअर क्षेत्रातील आणि शैक्षणिक संधींमुळे शहरात बाहेरून येणार्यांचा रेटा फार मोठ्या प्रमाणात वाढला. महाराष्ट्राच्या अन्य शहर आणि ग्रामीण भागांतूनच नव्हे, तर देशाच्या कानाकोपर्यांतून पुण्यात शिक्षणासाठी, नोकरीसाठी येणार्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. शिक्षण, मग नोकरी या जीवनचक्रात पुण्याची भुरळ पडते आणि मग बरेच जण याच शहरात स्थायिक होण्याचा, आपले अवघे आयुष्य घडविण्याचा निर्णय घेतात. त्यात चुकीचे असे काही नाही. मात्र, या स्थलांतराच्या पडद्याआड काही असामाजिक घटक, दहशतवादी तत्वांनीही शहरात केलेली घुसखोरी हीच सध्या पुण्याच्या जीवावर उठलेली दिसते.
दहशतवादी कारवायांसाठी पुणेच का?
आताच नाही, तर गेल्या काही वर्षांत पुण्यातून अनेक दहशतवाद्यांना अटक केल्याच्या बातम्या साततत्याने माध्यमांत झळकत असतात. त्यामागे अनेक कारणेही आहेत. ती पाहूया.
पुण्यात शिक्षणाच्या निमित्ताने अनेक परदेशी विद्यार्थी दाखल होतात. हे प्रमाणही तुलनेने मोठे आहे. अनेक देशांतून येणार्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असून, इराण, इराक, अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांचाही भरणा आहे. साहजिकच हे विद्यार्थी आपल्यासह आपले धर्म, संस्कार, भाषा, चालीरीती सर्वच भारतात आणतात. त्यातच वैचारिक देवाणघेवाणीसाठी स्वैर वातावरणही पुण्यात या विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होते. आपल्या शहरापासून, पालकांपासून दूर येऊन पुण्याच्या वसतिगृहात, भाड्यावर राहणार्या विद्यार्थ्यांची संख्याही तितकीच मोठी आहे. उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी येणारे विद्यार्थी या शहरी मोकळ्या वातावरणात अनेक विचारधारा अनुभवतात. त्यातच कट्टर इस्लामिक मूलततत्ववादी विचारांचे बौद्धिक पातळीवर पटणारे समर्थन मिळाले की, ती कट्टरता मनात भिनते. उदाहरणार्थ, अगदी अमेरिकेवर ज्यांनी ९/११चा विमानाने आत्मघातकी हल्ला चढवला, तेसुद्धा असेच कट्टर इस्लामिक विचारधारेच्या प्रभावाखाली होते. त्यांच्या गप्पा-चर्चा यांतून भेटीगाठी वाढत गेल्या आणि प्रत्यक्ष जिहादी कृतीसाठी ते तयार झाले.
अमेरिका इस्लामचा शत्रू असून, ख्रिश्चॅनिटी, पाश्चिमात्त्य संस्कृती इस्लामच्या विरोधात असल्याचेही या दहशतवाद्यांना पटले होते. एवढेच काय तर ओसामा बिन लादेनला भारताचे काश्मीरविषयक धोरण मान्य नव्हते. त्यामुळे पुण्यातही जे दहशतवादी सापडतात, ते याच जिहादी, कट्टरतावादी विचारांनी भारताविरोधी कारवाया करण्यासाठी आसुसलेले दिसतात. भारताचे काश्मीर विषयीचे बदललेले धोरण, तिहेरी तलाक कायद्याने रद्द करणे, भव्य श्रीराम मंदिराची उभारणी, हे सर्व काही कट्टर इस्लामी गटांना अजूनही पचनी पडलेले नाही. राष्ट्रहितार्थ घेण्यात आलेल्या अशा प्रत्येक निर्णयांना दहशतवाद्यांनी मजहबी रंग चढवले. तरुणाईला सहज पटतील, असे ‘फेक नॅरेटिव्ह’ रचले गेले, जेणेकरुन दहशतवादी कारवायांमध्ये याच ब्रेनवॉश केलेल्या तरुणांचा प्याद्यासारखा वापर करता येईल.
गेल्या काही वर्षांत पुण्यात आयटी क्षेत्र वेगाने विस्तारले. देशाच्या सर्व भागांतून उच्चशिक्षित तरुण पुण्यात स्थिरावण्यासाठी येतात. ते आपल्या कुटुंबीयांपासून लांब असतात. नेमकी हीच बाब लक्षात घेता, काही दहशतवादी संघटना ऑनलाईन आपले सावज टिपतात. यासाठी पद्धतशीरपणे ‘ऑनलाईन रॅडिकलायझेशन’ केले जाते. म्हणजे, दहशतवादी संघटना आपले जिहादी साहित्य, व्हिडिओ समाजमाध्यमांद्वारे अनेकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून, दहशतवादी कारवायांसाठी सहानुभूती मिळविणे, निधी संकलन करणे आणि सदस्य मिळवणे ही प्रक्रिया अतिशय गुप्तरित्या चालू असते. पुण्यात अनेक सार्वजनिक ठिकाणी ‘फ्री-इंटरनेट’ही सहज उपलब्ध होते. अनेक जण त्या इंटरनेटचा वापर करून दहशतवादी कारवायांना पाठिंबा देतात आणि त्यामुळे अशा जिहाद्यांचे धागेदोरे शोधणे हे यंत्रणांसाठी काहीसे कठीण होऊन बसते.
पुण्यात कोंढवासारखा भाग हा बहुसंख्य मुस्लीम वस्तीचा. अनेक ठिकाणी दाट लोकवस्ती असल्याने बाहेरून येणार्याला धर्मबांधवांना अगदी सहज आश्रय दिला जातो. अनेक स्लीपर सेल असे सक्रिय असतात. एकमेकांचे नातेवाईक असल्याचे भासवून अनेक जण वस्तीत शिताफीने वास्तव्य करतात. या भागात इस्लामविषयी सहानुभूती बाळगणारेही नागरिक आहेत आणि यांचा गैरफायदा दहशतवादी संघटनांकडून घेतला जातो. शिक्षण-नोकरी अशी कारणे दाखवत, मोठ्या प्रमाणात साखळी तयार करून, दहशतवादी कटांची आखणी केली जाते. एकूणच काय तर, दहशतवादी संघटनांना सदस्य जोडण्यासाठी पुण्यातील काही भाग पोषक आणि तितकेच कुप्रसिद्ध आहेत.
पुण्यात जसे बाहेरुन लोक शिक्षणासाठी, नोकरीसाठी दाखल होतात, तसेच पुण्यातूनही काही जण बाहेरगावी जातात. त्यातच विमानांच्या कनेक्टिव्हिटीमुळे आणि मुंबईसारखे राजधानीचे शहरही जवळ असल्याने, इस्लामी देशांमध्ये जाणे-येणे पुण्यातून अगदी सोयीचे. बाहेरच्या देशातून धार्मिक-मजहबी शिक्षण घेऊन मग हे तरुण पुन्हा पुणे गाठतात. पुण्यातून आंतरराष्ट्रीय प्रवास, विविध साधनांची उपलब्धता, एखादे ‘कव्हर’ घेऊन, खोटी ओळख तयार करून वावरणे हे सहज साधता येऊ शकते. बरेचदा देशाबाहेरून दहशतवादी कारवायांसाठी निधी मिळण्याचे प्रयत्नदेखील केले जातात. पुण्यात गेल्या काही वर्षांत ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘सिमी’, ‘इंडियन मुजाहिद्दीन’, ‘पीएफआय’ तसेच ‘अल कायदा’ यांसारख्या विविध दहशतवादी संघटनांच्या सदस्यांना अटक करण्यात आली आहे. यावरुन हे धागेदोरे लक्षात यावे.
त्यातच अनेक दहशतवादी हे उच्चशिक्षित असल्याचे आढळून येते. उच्चशिक्षित असले तरीही त्यांच्यावर कट्टर मजहबी विचारांचा पगडा कायम असतो. त्यामुळे शिक्षणाचा उपयोग राष्ट्रहितासाठी न करता, उलट देशाला अस्थिर करण्यासाठी केला जातो. कारण, औपचारिक शिक्षणापेक्षा लहानपणापासून दिले जाणारे, प्रसंगी मदरशातून मिळणारे शिक्षणच वरचढ ठरते. आपल्या जीवापेक्षा आपल्या मजहबसाठी तथाकथित ‘शहीद’ होणे, हे कसे गरजेचे आहे, हे बुद्धीच्या जोरावर पटवून दिले जाते.
मूलतत्ववाद अंगात असा भिनवला जातो की, व्यक्ती आत्मघातकी दहशतवादी म्हणून स्वत:चा जीवही संपवायला तयार होते आणि पुण्यात तर अशा जिहादी कारवायांसाठी पोषक वातावरण, परिसर, सदस्य उपलब्ध होऊ शकतात. या कारवायांसाठी लागणारी आर्थिक गरजसुद्धा इथे भागवली जाणे शय आहे. ‘अमलीपदार्थांचा पुण्यात सुळसुळाट’ यासंदर्भातही बातम्या अधूनमधून समोर येत असतात. ‘नार्को टेररिझम’ म्हणजेच अमलीपदार्थ, त्यातून निर्माण होणारा पैसा, दहशत आणि अवैध मानवी वाहतूक अशा अनेक घटकांचा यात समावेश आहे.
‘पीएफआय’ सारख्या संघटनांना तर मोठ्या प्रमाणात देशाबाहेरून पैसा उपलब्ध होतो, हे तपासाअंती सिद्ध झाले आहे. सध्या या संघटनेवर बंदी असली तरी त्यांचे ‘स्लीपर सेल’ कार्यरत असण्याची शयता नाकारता येत नाही. पुणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले गेलेले शहर आहे. त्यामुळेच कट्टरतावादी विचारधारा देशांच्या सीमा सहज पार करतात. म्हणूनच इराक आणि सीरियाच्या सीमेवर तयार झालेली ‘इसिस’ पुण्यात आपले ‘स्लीपर सेल’ तयार करते. ‘पुण्याचे इसिस मोड्युल तयार होते. अनेक जण ‘इसिस’मध्ये जाऊन आपले आयुष्य ‘जिहाद’च्या नावाखाली समर्पित करतात. यावरुनच लक्षात येते की, पुण्यात ‘दहशतवादाचे आंतरराष्ट्रीयीकरण’ झाले आहे. पुण्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलासुद्धा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहेत, याकडेही कदापि दुर्लक्ष करून चालणार नाही.
पुणे आणि दहशतवाद
दि. ११ मार्च २००१ - ‘सिमी’चा पुणे युनिट प्रमुख साजिद सुंडके याला त्याच्या चार साथीदारांसह अटक करण्यात आली. ‘सिमी’वर बंदी आहे.
दि. २५ जुलै २००६ - सोहेल शेख याला मुंबईच्या ७/११ बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झाली होती. तो पुण्याचा रहिवासी होता. त्याने २००३ मध्ये पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण दिले गेले होते.
‘लष्कर-ए-तोयबा’ ही दहशतवादी संघटना पुण्यात पसरली. कारण, पुण्यातील कोंढवा आणि कॅम्प भागातील तीन जण त्याच्याशी संबंधित होते.
दि. १३ फेब्रुवारी २०१० - पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण - ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘इंडियन मुजाहिद्दीन’चा सहभाग
दि. १ ऑगस्ट २०१२ - जे. एम. रोड बॉम्बस्फोट - ‘इंडियन मुजाहिद्दीन’चा कट
दि. १९ डिसेंबर २०१५ - इस्लामिक स्टेट-इसिस - २०२० मध्ये पुणे येथे हल्ल्याचा कट आणि त्यात सहभाग घेऊ पाहणार्या १६ वर्षांच्या मुलीला पुण्यातून ताब्यात घेतले. ती २०० जणांच्या संपर्कात होती.
‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने पुण्यातील ब्ल्यू बेल स्कूलच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला सील केले. कारण, तेथे मुलांना दहशतवादी बनण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे दहशतवादी यातून आपले जाळे तयार करत होते. (१७-१८ एप्रिल २०२३) ही शाळा पुण्यात कोंढवा येथे आहे. मात्र, या शाळेचा ‘पीएफआय’शी संबंध नाही.
दि. २७-२८ जुलै २०२३ - डॉ. अदनान अली सरकार याला ‘इसिस’शी (इस्लामिक स्टेट)असणार्या संबंधावरुन कोंढवा येथील त्याच्या घरावर धाड टाकून ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने अटक केली.
‘इसिस’च्या ‘पुणे मोड्युल’शी संबंधित शामील साकीब नाचण. दि. १३ मार्च २०२४ ला पुण्यातील ‘इसिस’चे मोड्युल उद्ध्वस्त केले गेले. मोहम्मद शाहनवाज आलम शफीऊजमा खान, मोहम्मद युनूस, मोहम्मद याकुब साकी आणि झुल्फीकार आली बरोडवाला यांनी सातार्याला साडीचे दुकान लुटले. बॉम्ब तयार करण्याचे सामान खरेदी केले. आधी दि. १८ जुलै २०२३ रोजी युनूस आणि त्याच्या मित्राला कोथरूडमध्ये दुचाकी चोरी करताना अटक केली गेली होती. युनूस आणि शाहनवाज हे कोंढवा येथे राहत होते.
दि. १७ मे २०२५ ‘इसिस’चे स्लीपर सेल अब्दुल्ला फैयाज शेख आणि ताल्हा खान यांना इंडोनेशियामधून अटक केली गेली. ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’च्या ताब्यात घेतले गेले. या दोघांनी २०२२-२३ मध्ये कोंढवा येथे घर भाड्याने घेतले होते आणि बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले होते.
दि. २९ ऑटोबर २०२५ - झुुबेर हंगरगेकर या संगणक अभियंत्याला ‘अल कायदा’शी संबंध असल्याने अटक केली गेली. त्याच्यावर आधी पाळत ठेवली गेली होती. तो कोंढवा भागात वास्तव्यास होता.
हर शहर कुछ कहता हैं...
प्रत्येक गावाची-शहराची एक संस्कृती, जीवनशैली आणि जगण्याची रीत असते. काही आठवणी पिढ्यान् पिढ्या जतन केल्या जातात, काही संकटे सामूहिकपणे परतवली जातात. शहरातील लोकांसह, शहरातील बाजार, पारंपारिक दुकाने, रस्ते, हॉटेल, नाट्यगृहे ही सगळी जणू एका विस्तारीत कुटुंबाचाच भाग असतात. पुणेसुद्धा त्याला अपवाद नाहीच.
पानशेतची धरणफुटी, तेथील लोकांनी स्थलांतर करून वसवलेल्या आणि आता पुण्याच्या मध्यवर्ती असणार्या या वस्त्या.. त्यांच्या आठवणी.. पुण्यातील लकडी पूल, झेड ब्रिज असो की सारसबाग उद्यान असो, ही सर्व फक्त काही जागांचीच नावे नाहीत, तर ती तरुणाईची धडकणारी स्पंदने आणि ज्येष्ठांच्या आठवणीच्या सुगंधी कुपी आहेत. पुण्याच्या खाद्यसंस्कृतीवर तर स्वतंत्र लेख होईल, इतकी ती वैशिष्ट्यपूर्ण. मंदिरे आणि किल्ले हा तर पुणेकरांचा जीव की प्राण! महाविद्यालये, ग्रंथालये, विद्यापीठे असो की, पुरूषोत्तम करंडक असो वा बालेवाडी स्टेडियमवरचा जल्लोष असो की, गणेशोत्सव असो, हे सर्व सुखनैव चालू असते. विनासायास शहराने ते स्वीकारलेले असते.
मात्र, हे सर्व चालू असताना, पुण्यातील संस्कृती मोठ्या प्रमाणात बदलत गेली, हे सुद्धा मान्य करावे लागेल. ‘वाडा संस्कृती’ नष्ट झाली. ती असताना एका घरचा पाहुणा हा पूर्ण वाड्यात पाहुणचार घेत असे. एकमेकांचे नातेवाईक, येणारा-जाणारा माहीत असे. आता याउलट परिस्थिती दिसते आणि हेच समाजातील तुटलेपण दहशतवाद्यांना पोषक ठरताना दिसते. वास्तविक, दहशतवाद्यांना आश्रय मिळतो, त्याठिकाणी वास्तव्यास असणार्या नागरिकांनी अधिक सजग, सतर्क राहणे गरजेचे आहे. वस्तीत नव्याने कुणीही राहायले आले तर त्याची माहिती करून घेणे, तशा नोंदी ठेवणे हे सजग नागरिकांचे कर्तव्यच.
पण, आता वस्तुस्थिती अशी की, पुण्यात शयतो कुणी कोणाच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करत नाहीत. मोठ्या शहरात असणारी ही एक प्रकारची ‘अलिप्त संस्कृती’ सुद्धा आहेच. गर्दी अफाट असली तरी प्रत्येकाची तथाकथित ‘स्पेस’ अबाधित असते! हाच शिष्टाचार समजला जातो. पाश्चात्य संस्कृतीतून आलेले ‘माय स्पेस, माय लाईफ, माय रूल’ समाजाला स्वतंत्र एककात विभागतात. सोसायटीत, शेजारच्या घरी कोण येते-जाते यांच्याशी फारसा संबंध नसणारी नवी पिढी असून, ती आपल्या कोशातच जगताना दिसते. हे पुण्यासोबतच देशातील कित्येक शहरांचे वास्तव आहे. त्यामुळे सजग नागरिक हाच सुरक्षेवरचा उपाय आहे.
पण, मीठाचा खडा लागावा तशा दहशतवाद्यांना अटकेच्या बातम्या संपूर्ण शहराला ढवळून टाकतात.
पुणेकर हादरले, संतापले आणि आता सावरलेसुद्धा आहेत. पण, आपण किती असुरक्षित आहोत? आपण कुणाला आश्रय दिला आहे? कुणावर विश्वास टाकला? कुणाबरोबर बिनधास्त वावरलो? या प्रश्नांनी भीती आणि संतापाची लकेर शहरात उमटून जाते आणि एक हतबलता व्यापून उरते. ज्या शहराने असंख्य संधी देत आपलेसे केले, त्याच शहराला उद्ध्वस्त करण्यासाठी हे दहशतवादी सरसावले आहेत. हे शहरावर केवळ ओरखडे नाहीत, तर या जखमा आहेत आणि हल्ली वारंवार त्या भळभळून वाहत आहेत...
शेवटी, मिर्झा गालिबची शायरी आठवल्या शिवाय राहत नाही-
हमको उन से वफा की हैं उम्मीद
जो नही जानते वफा या हैं...
- रुपाली कुलकर्णी-भुसारी
(लेखिका ‘एकता’ मासिकाच्या संपादिका आहेत.)