शेवटचं पत्र...

    02-Nov-2025
Total Views |
 
Gangaram Gavankar
 
ज्येष्ठ नाट्यकर्मी, ‘वस्त्रहरणकार’ गंगाराम गवाणकर यांची दि. २७ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६व्या वर्षी प्राणज्योत मालवली. गवाणकर यांच्या लेखणीतून आकार घेतलेल्या कित्येक नाटकांनी, कथांनी मालवणी बोलीभाषेचा गोडवा वृद्धिंगत केला. ज्येष्ठ नाट्यकर्मी, दिग्दर्शक प्रदीप कबरे यांचे गंगाराम गवाणकर यांच्याशी नाट्यक्षेत्रापलीकडेही वैयक्तिक ऋणानुबंध होते. कबरे यांच्या ‘खिडकी’च्या प्रयोगासाठी गवाणकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नसले, तरी त्यांनी त्यांच्या भावनांना पत्रातून वाट मोकळी करुन दिली होती. गवाणकर यांनी लिहिलेले ते शेवटचे पत्र ठरले...
 
दि. १७ जुलै २०२५! साधारण सकाळची अकरा- साडेअकराची वेळ. मी नाटककार गंगाराम गवाणकर यांना त्यांची थोडीशी तब्येत बरी नाही आणि एक छोटसं ऑपरेशन होणार आहे, असं कळलं म्हणून भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. ते त्यांचा मोठा मुलगा तुषार गवाणकर यांच्याकडे दहिसरला आनंद नगरमध्ये राहत होते.
 
मी त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांच्या सुनेने दरवाजा उघडला. गवाणकर छान प्रसन्न चेहर्‍याने शर्ट-पॅन्ट घालून खिडकीजवळच्या टेबलालगतच्या खुर्चीवर बसले होते आणि लिखाण करत होते. मला दारात पाहिल्याबरोबर मागे वळून हसत हसत, "अरे ये प्रदीप ये. बस. खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी.” मी समोरच्या सोफ्यावर बसलो. त्यांनी खुर्ची माझ्यासमोर फिरवली आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.
 
मध्येच त्यांना काहीतरी आठवलं आणि ते म्हणाले, "प्रदीप, २ ऑगस्टला तुझ्या ‘खिडकी’चा पन्नासावा प्रयोग आहे आणि त्या प्रयोगाला मी येणार म्हणजे येणार! कारण, तुझ्या ‘खिडयां’ना माझी प्रस्तावना आहे.”
मी म्हटलं, "साहेब, तुम्ही आलात तर तो दुग्धशर्करा योग असेल. पण, मी तुम्हाला स्वतःहून सांगितलं नाही. कारण, तुमची तब्येत जरा बरी नाही.”
 
"अरे तब्येतीचा कसलं घेऊन बसलास? पुढच्या आठवड्यात माझं ऑपरेशन आहे. पित्ताशयात खडे झाले आहेत. साधं ऑपरेशन आहे. पित्ताशयाची पिशवी काढणार, आठ दिवसांत मी ठणठणीत बरा होणार आणि २ तारखेला तुझ्या प्रयोगाला हजर राहणार,” गवाणकर उत्तरले.
 
खरं सांगतो, यापेक्षा माझ्यासाठी आनंदाची गोष्ट कुठलीच नव्हती. परंतु, त्यांच्या तब्येतीची काळजी होती. ’स्टील यंग ट हार्ट’ असले तरी आता गवाणकरांचं वय ८६ होतं. गप्पांच्या ओघात मला म्हणाले, "एक लिखाण करतोय ते पूर्ण व्हावं.” त्यांनी मला वही दाखवली. गवाणकरांचे तेच मोत्यासारखं सुंदर अक्षर. छान गप्पा मारल्या. सुनेच्या हातचा माझ्यासाठी खास बनवलेला बिन साखरेचा चहा घेतला. चहा घेता घेता माडबनच्या गप्पा झाल्या. "आजारपणामुळे गावी जायला उशीर होतोय, पण लवकर जाणार. कारण, माझा, गावच्या घरी मन रमता, छान गरवलेले मासे खाऊ मिळतत.” त्यांचं मध्ये मध्ये माझ्याबरोबर बोलताना टिपिकल मालवणी असायचंच. छान गप्पा मारून त्या दिवशी दुपारी मी घरी परतलो.
 
काही दिवस गेले आणि गवाणकरांचा फोन आला की, काही वैद्यकीय चाचण्यांमुळे आणि थोड्याशा त्रासामुळे ऑपरेशन पुढे ढकलल्याचं त्यांनी मला सांगितलं. पित्ताशयाच्या पिशवी बरोबरच त्यांना त्रास होता त्या पाइल्सच देखील ऑपरेशन होणार होतं. मीही फोनवरून त्यांना धीर दिला. काही दिवसांतच ठणठणीत बरे होऊन तुम्ही माझ्या ‘खिडकी’च्या पन्नासाव्या प्रयोगाला २ ऑगस्टला हजर राहणार, याची मला खात्री आहे. कारण, गवाणकरसाहेब म्हणजे शब्दाचा पक्का माणूस! दिलेली वेळ दिलेली तारीख कधीच चुकवणार नाहीत!
 
परंतु, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. दि. ३१ जुलै २०२५ ला मला गवाणकर साहेबांचा फोन आला. "प्रदीप ऑपरेशन थोडं पुढे ढकललं आहे. ६ ऑगस्टला होणार आहे. पण, तरीही मी प्रयोगाला येऊ शकणार नाही. मला त्रास होतोय, तुझ्या प्रयोगाला मी दोन तास बसू शकणार नाही.”
 
मी लगेच म्हणालो, "गवाणकर साहेब, काही हरकत नाही तुमचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी सर्व काही आहे.” पण, तेवढ्यावर गप्प बसतील तर ते गवाणकर कसले! त्यांनी तासाभराच्या आत मला एक सुंदर पत्र पाठवलं. सोबत आणखीन एक संदेश, "हे पत्र तुझ्या कार्यक्रमात वाचून दाखव.” ती प्रेमळ आज्ञाच होती.
 
त्या पत्राची सुरुवात, "प्रिय प्रदीप...” त्यानंतर माझ्या प्रयोगाला उपस्थित राहू शकत नाही, याचं हसत मांडलेलं दुःख, माझ्या लिखाणाचं तोंड भरून केलेलं कौतुक, प्रेक्षकांना अभिवादन आणि शेवटी सही, तुझा मित्र... गंगाराम गव्हाणकर!
 
तेच मोत्यासारखं अक्षर, सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेले लिखाण आणि हृदयापासून व्यक्त केलेल्या भावना. २ ऑगस्टचा जयवंत दळवी नाट्यगृहात बोरिवलीला हाऊसफुल गर्दीत ‘खिडकी’चा प्रयोग संपन्न झाला. त्या प्रयोगात मी गवाणकर साहेबांविषयी माझ्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांनी मला पाठवलेल्या पत्राचं वाचन केले. प्रेक्षकातून उमटलेली प्रतिक्रिया त्या दिवशी खूप वेगळी होती. टाळ्या तर होत्याच, पण एका उच्च कोटीच्या लेखकाने एका नवोदित लेखकाला दिलेली दाद, केलेलं कौतुक, याचा आनंद आणि जाण त्या टाळ्यांच्या गजरात होती.
 
६ ऑगस्टला गवाणकर साहेबांची दोन ऑपरेशन्स झाली. पण, दुर्दैवाने काही कॉम्प्लिकेशन्स वाढत गेली. ते त्यांचा धाकटा मुलगा स्वप्निल गवाणकरच्या घरी होते. स्वप्निल आणि तुषारचे कुटुंबीय, कौटुंबिक मित्र संदेश चव्हाण आणि डॉटर शर्थीचे प्रयत्न करत होते. डॉटरांनी निदान केलं की, यकृताचे कार्य कमी झाले होते, मूत्रपिंड काम करत नव्हते. पण, गवाणकर साहेबांची जगण्याची इच्छाशक्ती प्रचंड होती. जवळजवळ दोन महिने त्यांनी अत्यंत वेदना सहन केल्या. आपल्यामुळे इतरांना कुठलाही त्रास होऊ नये, ही भावना त्यांनी शेवटपर्यंत जोपासली. इस्पितळातून ते माझ्यासारख्या मित्रांना फोन करत होते. आम्ही वेळात वेळ काढून त्यांना भेटायला जात होतो. शेवटचे चार दिवस मात्र ते कोणाशीच, काहीच बोलू शकले नाहीत आणि सोमवार दि. २७ ऑटोबर रात्री १० वाजून ५० मिनिटांच्या दरम्यान ते इहलोक सोडून गेले.
 
मला त्यांनी ३१ जुलैला पाठवलेलं पत्र.. खरंतर मला लाभलेला आशीर्वाद...हे पत्ररूपी लिखाण कदाचित त्यांच्या हाताच शेवटचं पत्ररुपी लिखाण असेल, याची मला कल्पनाही नव्हती. गवाणकर साहेब, तुमचं हे प्रेम, तुमचे हे उपकार, तुमचा हा मित्र प्रदीप कबरे आजन्म विसरू शकणार नाही. माऊलीक एकच प्रार्थना करतय, असतील थय गवाणकर साहेबांका, माणसांच्या गोतावळ्यात सदा आनंदी ठेय गो माऊले!!!
 
- प्रदीप कबरे