संघ कार्यपद्धतीचा विकास : चिंतनाला कृतीची जोड

    02-Nov-2025
Total Views |

Rashtriya Swayamsevak Sangh
 
 
गेल्या शंभर वर्षांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समाजाने स्वीकारले आहे. परंतु, तरीही संघाचे कार्य नेमके कसे चालते, याबद्दल बहुतांश लोक आजही अनभिज्ञ असतात. अनेकदा संघात येण्यासाठी इच्छुक व्यक्ती स्वयंसेवक होण्यासाठी नोंदणी कुठे करावी लागेल? असा भाबडा प्रश्न विचारतात. वस्तुतः स्वयंसेवक होण्यासाठी केवळ शाखेवर येऊन परमपवित्र भगव्या ध्वजास प्रणाम करणे एवढीच काय ती कृती आवश्यक असते. ‘आहे तसा घेऊन पाहिजे तसा घडवणे’ या उद्देशाला पूरक कार्यपद्धती संघाने स्वीकारली आहे. या कार्यपद्धतीमागे डॉटर हेडगेवार यांचे प्रदीर्घ चिंतन आहे. त्यांनी स्वीकारलेली कार्यपद्धती आणि कालानुक्रमे तिचा होत गेलेला विकास, याचा संक्षिप्त मागोवा बा. ना. उपाख्य बापूराव वर्‍हाडपांडे यांनी आपल्या ’संघ कार्यपद्धतीचा विकास’ या पुस्तकात घेतलेला आहे. त्याचा परिचय करुन देणारा हा लेख...

संघस्थापनेपूर्वीची पार्श्वभूमी
 
’संघ कार्यपद्धतीचा विकास’ या पुस्तकातील पहिल्या सात प्रकरणांमध्ये संघ स्थापनेपूर्वीची पार्श्वभूमी बापूरावांनी मांडली आहे. कलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना ’अनुशीलन समिती’त सक्रिय सहभाग घेऊन डॉटरजींनी कशा पद्धतीने क्रांतिकार्य केले, हे लेखकांनी यामध्ये वर्णिले आहे. तसेच तत्कालीन क्रांतिकारकांशी डॉटरजींच्या समन्वयावरही लेखकाने अलगद प्रकाश टाकला आहे.
 
’क्रांतिकारी आंदोलनाचा विचार व कार्यपद्धती’ या प्रकरणात लेखकाने क्रांतिकार्याचा मूळ विचार, त्यामध्ये स्वातंत्र्यास्तव हौतात्म्य पत्करण्यास असलेले प्राधान्य अधोरेखित केले आहे. परंतु, क्रांतिकार्यासाठी लागणारा पैसा, बैठकांसाठी गुप्तता, विचारविनिमयासाठी एकांत अशा अत्यावश्यक गोष्टी जमवून आणण्यास मर्यादा होत्या. तसेच क्रांतिकार्याचा मार्ग कष्टाचा, धोयांचा असल्याने सर्वसामान्य जनतेच्या सहभागाचा त्यात अभाव होता. म्हणूनच ’आत्म विस्मृत’ व ’व्यक्तीकेंद्रित’ हिंदू समाजात देशभक्ती हा स्थायीभाव असावा आणि त्यासाठी सामान्यांनाही वाटचाल करण्यास शय असावा, अशा मार्गासंबंधी डॉटरजींनी केलेल्या चिंतनाचे प्रतिपादन लेखकाने केले या प्रकरणात केले आहे.
 
राष्ट्रीय सभेचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
 
राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेसच्या वाटचालीवर ’१९२० पूर्वी’, ’१९२० नंतर’ आणि ’विधायक कार्य’ अशी तीन प्रकरणे लिहून, त्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील बदल आणि हिंदू समाजावर होणारा अनिष्ट परिणाम या विषयाला बापूरावांनी हात घातला आहे. टिळकांकडून गांधीजींकडे गेलेले काँग्रेसचे सूत्र, त्यामुळे परिवर्तित झालेले स्वातंत्र्य चळवळीचे स्वरूप, याचे विवेचन यामध्ये केले आहे. काँग्रेसच्या कमकुवत झालेल्या स्वातंत्र्य चळवळीमुळे हिंदुत्वासमोर असणारा धोका गांधीजींनी आपणहून दुर्लक्षित केला की, मुस्लीमधार्जिणे होऊन मृगजळाची ऐय भावना रुजवू पाहिली, या विचाराने डॉटरजींना अस्वस्थ वाटू लागले. त्यातूनच हिंदू समाजाच्या भवितव्याबद्दल पू. डॉटरजींना वाटणारी चिंता याचा परामर्श लेखकाने घेतला आहे.
 
कर्तरी नव्हे, तर कर्मणी संघटना
 
’कागद-पैसा-पेन्सिल’ यांच्याविना म्हणजेच तोवर रूढ असलेल्या औपचारिक पद्धतीशिवाय स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वटवृक्षासारखा जगभर पसरला, हा वरवर वाटणारा विरोधाभास बापूरावांनी सैद्धांतिक स्वरूपात मांडला आहे. १९२५ सालच्या विजयादशमीला झालेल्या संघस्थापनेच्या बैठकीत झालेल्या चिंतनाविषयी आपल्याला वाचायला मिळते. नव्या संघटनेसाठी ’शिवाजी संघ’, ’जरीपटका मंडळ’, ’हिंदू स्वयंसेवक संघ’ आणि ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ अशी नावे २६ स्वयंसेवकांच्या बैठकीत सुचवण्यात आली; त्यापैकी ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे नाव एकमताने कसे ठरले, याची रंजक कथा लेखकाने पुस्तकात मांडली आहे. संघकार्य हे व्यक्तिनिष्ठ नसून, ते कर्मनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ आहे आणि हीच संघाच्या कार्यपद्धतीची मुख्य ओळख यामध्ये अधोरेखित होते.
 
 ’ध्वज-प्रार्थना’ यांचा स्वीकारसुद्धा शाखेत किती अनौपचारिक पद्धतीने झाला; तसेच, प्रार्थना निश्चिती करतानाच शाखेतले वर्णन, पू. डॉटरजींचे समुपदेशन बापूरावांनी पुस्तकात नोंदवले आहे. शीघ्र सारे दुर्गुणो से मुक्त हमको कीजिए| या ऐवजी, शीघ्र सारे सद्गुणोसे पूर्ण हिंदू कीजिए| या प्रार्थनेच्या ओळीचा स्वीकार हा डॉटरांच्या सकारात्मक वृत्तीचे दर्शन घडवणारी ही घटना बापूरावांनी ’ध्वज आणि प्रार्थना’ या प्रकरणात नोंदवली आहे.
 
संघकार्याचा मूळ गाभा - शाखा, प्रचारक आणि उत्सव
 
संघाच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणारे आर्थिक संकलन करण्यासाठी स्वयंसेवकांचा समर्पण भाव जागृत करून ‘गुरुदक्षिणा’ या कार्यपद्धतीचा स्वीकार संघाने कसा केला, याचे संक्षिप्त वर्णन लेखकाने ‘गुरुदक्षिणा’ या प्रकरणात केले आहे. ’संघाचे आदर्श - छत्रपती शिवराय’ व ’संघाचा आधार - शाखा’ आहे, याबद्दल स्पष्टीकरण देणारे दोन लहान प्रकरणे पुस्तकाचे सौंदर्य वाढवतात.
 
’दैनंदिन शाखा’ या प्रकरणात शाखेतील दैनंदिन कार्यक्रम, शारीरिक व बौद्धिक कार्यक्रम, वेळेचे निर्बंध याबद्दल उदाहरणासहित वर्णन केलेले आहे. व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य नियोजन व नियंत्रण हे संघाच्या कार्यपद्धतीत कसे स्वीकारले गेले; समन्वय, संघटन, सुसूत्रता, सांघिक कार्य, अडचणी ओळखणे, त्या कमी करणे, यांसारख्या निर्दोष व प्रभावी व्यवस्थापकीय कार्यपद्धतीची अंमलबजावणी संघाने कशा तर्‍हेने केली, याचे संक्षिप्त वर्णन ’प्रत्येक कार्यामागची पूर्व योजना’ या प्रकरणात लेखकाने केलेले आहे.
 
’प्रचारक’ या प्रकरणात संघाचा अनमोल, अतुल्य आणि अविभाज्य अंग असलेली प्रचारक व्यवस्था याबद्दलचे कोडे सोडवण्याचे सफल कार्य लेखकाने केलेले आहे. ’विस्तारक’ ते ’प्रचारक’ असे शब्दप्रयोग संघात रुजण्यामागचे सोदाहरण पुरावे या प्रकरणात वाचता येतात.
 
’उत्सव प्रसंगी अध्यक्षांची योजना’ व ’संघाचे उत्सव’ या दोन प्रकरणात अध्यक्षांची नियुक्ती करण्यामागचे विवेचन, उदाहरण आणि हिंदू समाजातील प्रमुख सणांना संघाचे उत्सव म्हणून स्वीकारण्यामागची विचारधारा लेखकांनी शब्दांकित केली आहे.
 
संघ शिक्षण
 
’संघ शिक्षा वर्ग’ या प्रकरणात शिक्षा वर्गाची निकड, स्वरूप, दिनचर्या, नाव, आकारमान, स्थान, शिक्षक आणि संघ शिक्षा वर्गाचा कालानुक्रमे होत गेलेला विकास, याचा आलेख थोडयात बापूरावांनी कथन केलेला आहे.
’भाषण’ आणि ’व्याख्यान’ याला समरूप शब्द संघाने समाजाला दिला तो म्हणजे ’बौद्धिक’. बौद्धिक कार्यक्रम, त्याची रूपरेषा ठरवणे, बौद्धिकातील हलकेफुलके किस्से, मनाच्या एकाग्रतेसाठी व्यक्तिगत गीत (पद्य) म्हणण्याची परंपरा कशी रुजली, यावर बापूरावांनी प्रकाश टाकला आहे. टाळ्या न वाजवण्याची शिस्त हा बौद्धिकाचा अविभाज्य भाग आहे. ही संघाची अनोखी ओळख करून देत ’बौद्धिक कार्यक्रम’ या प्रकरणाला विराम बापूरावांनी दिला आहे.
 
सांस्कृतिक राष्ट्रवाद
 
’संघाची संस्कृत प्रार्थना’, ’स्वदेशीचे व्रत’ यामध्ये संघाच्या राष्ट्रवादी विचारांचा ठसा आपल्याला दिसतो. संघाच्या कार्यपद्धतीतील, शाखेतील, घोषातील व संचलनातील इंग्रजी शब्दांचे संस्कृत भाषांतर व दाखले लेखकाने या प्रकरणात दिले आहेत.
प्रसिद्धीपासून व श्रेयवादापासून अलिप्त राहण्याचा संघाचा स्थायीभाव शेवटच्या प्रकरणात बापूरावांनी नोंदवला आहे.
संघाची शिस्त आणि सहजता, अनौपचारिकता यांचा संगम असलेली कार्यपद्धती, हेच संघाच्या यशाचे गमक आहे. ‘वेल बिगन इज हाफ डन’ या उक्तीप्रमाणे सुरुवातीपासूनच या वेगळ्या कार्यपद्धतीने मोठा परिणाम साधलाच. परंतु, काळानुसार योग्य ते बदल स्वीकारण्याची लवचिकताही ठेवत संघाची कार्यपद्धती विकसित होत गेल्याने शंभर वर्षांनंतरही संघ कालसुसंगत राहिला आहे.
संघाचे कार्य नक्की कसे, याबाबत अनभिज्ञ असणार्‍यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहेच, परंतु आपल्या कार्यपद्धतीतील अनेक गोष्टींच्या मुळाशी असणारे सूक्ष्मचिंतन जाणून घेण्याच्या दृष्टीने संघ स्वयंसेवकांसाठीही हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
 
पुस्तकाचे नाव : संघ कार्यपद्धतीचा विकास
लेखक : बा. ना. उपाख्य बापूराव वर्‍हाडपांडे
प्रकाशक : श्री भारती प्रकाशन
पृष्ठसंख्या : ९६
मूल्य : ५० रुपये
 
 - कार्तिक बागुल