२०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली - द बिगिनिंग’ या चित्रपटाने अक्षरशः इतिहास घडवला. एस. एस. राजामौली यांच्या या चित्रपटावर जगभरातून कौतुकवर्षाव झाला. पहिल्या भागानंतर ‘बाहुबली २ - द कन्लुझन’ हा चित्रपटाचा दुसरा भागही तितकाच गाजला. पहिल्या भागात कटप्पाने बाहुबलीला का मारलं, हा प्रश्न अनुत्तरीत ठेवून चित्रपटाच्या पुढील भागाची उत्कंठा वाढवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला होता. तब्बल दोन वर्षांनंतर प्रेक्षकांना ‘बाहुबली’च्या दुसर्या भागातून त्याचं उत्तर मिळालंही. पण, आता या चित्रपटाच्या दोन्ही भागांची संपूर्ण कथा प्रेक्षकांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे, ती ‘बाहुबली - द एपिक’ मधून. हा चित्रपटाचा तिसरा भाग नक्कीच नाही. पण, निर्मात्यांनी नव्या ट्रेलरसह हा चित्रपट नव्याने प्रेक्षकांसमोर आणला आहे. ३१ ऑटोबरला हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्ताने या नव्या प्रयोगाविषयी...
बाहुबली-द एपिक’ मध्ये चित्रपटाच्या दोन्ही भागांतील कथानकाला ‘रिएडीट’ करुन नवा स्पर्श दिग्दर्शकाने दिला आहे. पहिला आणि दुसरा भाग प्रत्येकी पावणे तीन ते तीन तासांचा. पण, ‘बाहुबली-द एपिक’ हा तब्बल पावणे चार तासांचा चित्रपट आहे. पहिल्या दोन्ही भागांना एकत्र एडीट करुन नव्याने ही कथा दिग्दर्शकाने सादर केली आहे. चित्रपट जलद गतीने पुढे नेण्यासाठी, निर्मात्यांनी प्रारंभीच अनेक दृश्ये कापली आहेत. पण, तरीही एडिटिंग अतिशय उत्तम झाले आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहताना असं जाणवतं की, कथा खूप जलदगतीने पुढे सरकते. विशेषतः पहिल्या भागात, शिवा (प्रभास) आणि अवंतिका (तमन्ना भाटिया) यांच्यातील प्रेमकहाणी, जी पूर्वी एक महत्त्वाचा भाग होती, ती या भागात अगदी थोडयात आटोपली आहे. त्यामुळे तमन्नाचे चाहते काहीसे निराश होऊ शकतात. कारण, यावेळी प्रेमकहाणी व्हॉईस-ओव्हरद्वारेच उलगडण्यात आली असून, पुढे थेट माहिष्मतीच्या भव्यदिव्य राज्यात कथानक प्रवेश करते.
माहिष्मतीचं श्रीमंत, अफाट असं साम्राज्य पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहताना प्रेक्षकही त्या भव्यतेत रममाण होऊन जातात. दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलाच चित्रपट आपण पुन्हा पाहात आहेत, असं अजिबात जाणवत नाही. दिग्दर्शक राजामौलींची कल्पक दृष्टी, त्यांच्या सेटचा आकार आणि कल्पनाशक्तीला वास्तवात केलेलं रूपांतरण, हा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक आदर्शच. अशा या दोन्ही ’बाहुबली’च्या भागांची संपूर्ण कथा कोणत्याही ब्रेकशिवाय त्याच लयीत पुढे सरकते आणि यामुळे या चित्रपटाला एखाद्या महाकाव्याचे रुप प्राप्त झाल्यासारखे वाटते आणि प्रेक्षकही त्याचा पुन्हा मनमुराद आनंद लुटताना दिसतात.
उदा, प्रभास (अमरेंद्र बाहुबली) जेव्हा गर्जना करतो तेव्हाचे दृश्य (अमरेंद्र बाहुबली), ‘अमरेंद्र बाहुबली, म्हणजे मी!’ दहा वर्षांनंतरही चित्रपटगृहात टाळ्या खेचून आणते. जेव्हा राजमाता शिवगामी (राम्या कृष्णन) मुलाला आपल्या हातात घेऊन म्हणते, "महेंद्र बाहुबली!!!” किंवा जेव्हा ती तिच्या पतीला म्हणते, "माझा शब्दच माझं वचन आहे आणि वचन हेच शासन आहे,” ते दृश्य आणि संवाद ऐकून अजूनही प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येताना पाहायला मिळतात. राम्या कृष्णनने या पात्रात जो उत्साह आणि शक्ती निर्माण केली आहे, ते नक्कीच चिरःकाळ लक्षात राहणारं आहे.
‘व्हीएफएस’बद्दल बोलायचं झाले तर, २०१५ आणि २०१७ साली ‘बाहुबली’तील काम अजूनही अनेक मोठ्या चित्रपटांना टक्कर देतं. हत्ती, धबधबे, किल्ले आणि युद्धभूमी आणि महत्त्वाचं म्हणजे माहिष्मतीचं अफाट साम्राज्य, हे सर्व इतकं आकर्षक दिसतं की, जुना चित्रपट नव्याने नाही, तर आपण एखादा नवाच चित्रपट पाहिल्याचा भास प्रेक्षकांना होईल. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा या चित्रपटाचा मोठ्या पडद्यावर अनुभव घेण्यासाठी चित्रपटगृहांकडे वळताना दिसतात. २डी, ४डीएस अशा दोन्ही रुपात हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येईल.
पण, ‘बाहुबली’ या चित्रपटाला दिलेलं हे नवं रुप असलं, तरी यापूर्वीसुद्धा अनेक चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात जसेच्या तसे प्रदर्शित करण्यात आलेले आहेत, ज्यात प्रामुख्याने बॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. ‘सनम तेरी कसम’ हा (२०१६) चा चित्रपट २०२५ मध्ये पुन्हा प्रदर्शित झाला आणि त्याच्या मूळ बॉस ऑफिस कमाईला मागे टाकत यावेळी त्याने जास्त गल्ला जमवला. त्यानंतर ‘ये जवानी हैैं दिवानी’ (२०१३), ‘अवतार’ (२००९) हे चित्रपटही २०२५ मध्ये पुन्हा प्रदर्शित झाले, तर ‘जब वी मेट’ (२००७), ‘रेहना है तेरे दिल में’ (२००१), ‘लैला मजनू’ (२०१८), ‘तुंबाड’ (२०१८) हे चित्रपट २०२४ मध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आले होते.
‘शोले’ (१९७५) चा नुकताच प्रदर्शनाची ५० वर्षं पूर्ण झालेला ऐतिहासिक चित्रपटदेखील पुन्हा प्रदर्शित झाला आहे. तसेच त्याला अगदी ३डी मध्येही रुपांतरित करण्यात आले होते. ‘ओम’ (१९९५) हा कन्नड चित्रपट १९९५ ते २०१७ दरम्यान तब्बल ५५० हून अधिक वेळा पुन्हा प्रदर्शित झाला, ज्यामुळे तो भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक वेळा प्रदर्शित झालेला चित्रपट ठरला आहे. ‘टायटॅनिक’ (१९९७) जेम्स कॅमेरॉनचा भव्यदिव्य सिनेमा वारंवार चित्रपटगृहांत पाहायला मिळतो. याशिवाय ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘देवदास’ आणि ‘दिल तो पागल हैं’ यांसारखे चित्रपट विशेष महोत्सव, तसेच काही चित्रपटगृहांत पाहायला मिळतात, तर प्रेक्षकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे जुन्याच गोष्टीचे नव्याने केलेले हे पॅकेजिंगही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेले दिसते. कारण, शेवटी जुने ते सोने!
- अपर्णा कड