संस्कृतीचा सेवेकरी

19 Nov 2025 10:23:44
 
Santosh Godbole
 
एका ध्येयासक्तीने महाराष्ट्राबाहेर मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा जोपासणार्‍या व वाढवणार्‍या संतोष गोडबोले यांच्याविषयी...
 
भाषा आणि राजकारण हे समीकरण काही नवीन नाही. हल्लीच्या काळात भाषा, संस्कृती आदी गोष्टींचा वापर करत समाजामध्ये दुफळी माजवण्याचे काम, काही लोकांकडून सुरू आहे. जे घटक समाजाच्या उत्कर्षासाठी खर्च झाले पाहिजे, तेच समाजाच्या विरोधात वापरण्याचे कारस्थानही काही लोकांकडून सुरूच असते. मात्र, या सार्‍या विपरीत परिस्थितीमध्येसुद्धा काही अशी लोकं असतात, जी आपल्या कामातून परिवर्तनाचे बीज रोवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषा अभिजात आहेच, कारण ती स्थळ-काळाच्या बंधनात बांधलेली नाही. तिचा प्रवास आणि प्रवाह मुक्त आहे. महाराष्ट्राच्या बाहेर मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा जागर करणारी व्यक्ती म्हणजे संतोष गोडबोले.
 
दि. १७ डिसेंबर १९६९ रोजी मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे, संतोष यांचा जन्म झाला. वडील अभियंता म्हणून कार्यरत होते. फिरतीची नोकरीमुळे आपसूकच प्रवास हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला. इटारसीला बदली झाल्यानंतर, शीख समाजाच्या वस्तीमध्ये ते राहात होते. मराठी आणि पंजाबी कुटुंब एकत्रितपणे नांदत होते. त्यामुळे त्या काळातील आत्मीयता, स्नेहभाव यांचा ते आजही विशेष उल्लेख करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा घरातच असल्यामुळे, पुढच्या पिढीमध्ये संस्कार रुजणे स्वाभाविकच. शिशु अवस्थेपासूनच संतोष शाखेमध्ये ते नित्य जात असत. आणीबाणीच्या काळात संघावर जेव्हा बंदी आणली गेली, त्या काळातसुद्धा त्यांचे वडील संघकार्यात सक्रिय होते. राष्ट्रविचारांची कास त्यांनी कधीही सोडली नाही. संस्कारांचा हाच वारसा घेत, संतोष मोठे होत होते. महाविद्यालयीन जीवनामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या कामामध्ये ते सक्रिय झाले. नगर संयोजक ते राष्ट्रीय कार्यकारिणी असा प्रवास करताना, वेगवेगळ्या अनुभवाचे संचित त्यांनी सोबत घेतले. ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायती’मध्ये १२ वर्षे ते कार्यरत होते.
 
समरसतेचा विचार संतोष गोडबोले यांनी, आपल्या कामातून लोकांसमोर आणला. २०१५ मध्ये आषाढी कार्तिकी वारी महामंडळाची स्थापना करून, संत साहित्य, दिंडी, सामाजिक समरसता यात्रा आणि नर्मदा पथावर सेवा कार्य सुरू केले. वारी महामंडळाच्यावतीने, प्रतिवर्षी बृहत् वृक्षारोपण (मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचा) कार्यक्रमही आयोजित केला जातो. याचवर्षी जिलहरी घाट येथील प्राचीन कुशावर्तेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून, माँ नर्मदा परिक्रमावासीयांसाठी भोजन, निवास आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली, ज्यामध्ये आतापर्यंत सुमारे २० हजार परिक्रमावासीयांची आणि तीर्थस्थानावर आलेल्या लोकांची व्यवस्था त्यांनी केली. नर्मदा नदी ही कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय आहे. या नर्मदा तटावरील त्यांचं साधना कामसुद्धा उल्लेखनीय आहे. जबलपुरातील नर्मदा काठी वसलेल्या श्री कुशावर्तेश्वर महादेव मंदिराचे उन्नयन करून, गेल्या १२ वर्षांपासून तिथे नियमित अन्नछत्र सुरू आहे. केवळ इतकेच नव्हे, तर पुणे, नागपूर आणि अमरावती येथे नर्मदा परिक्रमावासीयांचे संमेलनाचेही त्यांनी यशस्वी आयोजन केले.
 
युवाशक्तीला मराठी भाषेशी जोडण्याचा प्रयत्न म्हणून, युवाशक्ती संमेलनाचे आयोजन ते दरवर्षी करीत असतात. यामध्ये लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर अशा महानायकांचे चरित्र युवकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ते करतात. भा. रा. तांबे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार ते नियमितपणे करीत असतात. त्यांचे हेच कार्य लक्षात घेऊन, मध्यप्रदेश शासनाने मागच्या वर्षी सांस्कृतिक विभागातील ‘मराठी साहित्य अकादमी’च्या संचालकपदाची जबाबदारी टाकली. साहित्यासोबत युवकांचा परिचय असणे आवश्यक आहेच, मात्र नव्या काळासाठी आवश्यक तो उद्योजकतेचा गुणसुद्धा त्यांनी अंगी बाणवायला हवा म्हणून, जबलपूरमध्ये त्यांनी ‘मराठी उद्योजक संघा’ची स्थापना केली. एका बाजूला व्यापार, तर दुसर्‍या बाजूला सांस्कृतिक अनुबंध जुळवण्याचे कार्य त्यांनी पार पाडले. मातृशक्ती संमेलनाच्या माध्यमातून त्यांनी, स्त्रीशक्तीचा जागरसुद्धा घडवून आणला. समाजाला एकत्रित बांधण्याचे कार्य करताना, अडचणीच्या प्रसंगीसुद्धा त्यांचे सेवाकार्य सुरू होते. ‘कोरोना’काळात ‘आषाढी कार्तिकी वारी महामंडळा’च्या नेतृत्वाखाली लसीकरण मोहीम राबवण्यात आली, ज्यात २ हजार, ५०० हून अधिक लोकांना लस देण्यात आली. काळाच्या ओघात नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे, त्यांच्या कामाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे.
 
आजमितीला वयाच्या ५६व्या वर्षीसुद्धा ते कार्यरत आहेत. भारतासारख्या राष्ट्राला जो समृद्ध इतिहास लाभला आहे, त्या वारशाचा त्या संस्कारांचा प्रभाव पुढच्या पिढीवरसुद्धा पडला पाहिजे याच विचाराने संतोष कार्य करत आहेत. भाषा आणि संस्कृती समाजाला जोडण्याचे विषय आहेत, तोडण्याचे नव्हे, हे संतोष यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून भाषेसाठी मराठी संस्कृतीसाठी झटणारे जे निवडक शिलेदार आहेत, त्यांतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे संतोष गोडबोले. स्वार्थी विचार बाजूला सारून, ज्यांना खर्‍या अर्थाने समाजाच्या उत्कर्षासाठी काम करायचे आहे, त्यांच्या कामाची दिशा काय असली पाहिजे, हे आपल्याला त्यांच्या कार्यातून लक्षात येतं. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या खूप खूप शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0