(डावीकडून उजवीकडे मान्यवर) कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कुणाल रेगे, ‘पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर (पार्क)’चे कार्यकारी संचालक विक्रम शंकरनारायणन, ‘भारतीय विचार दर्शन’चे विश्वस्त सुश्रुत चितळे, ‘शिल्प असोसिएट्स’चे सीईओ निखिल दीक्षित, ‘कोकायू कॅमलिन’चे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम, ‘एबीपी माझा’च्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, सुप्रसिद्ध गायिका, गीतकार-संगीतकार वैशाली सामंत, ‘कालनिर्णय’च्या कार्यकारी संचालक शक्ती साळगावकर, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी
_202511191130588666_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि अंधेरी (प) विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमीत साटम यांच्याबरोबर दै. ‘मुंबई तरुण भारत’आयोजित ‘महाएमटीबी-मुंबई डायलॉग’ या मुक्त संवादाचा कार्यक्रम सोमवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी परळच्या ‘आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रल’ येथे मान्यवर व निमंत्रितांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात आ. अमीत साटम यांनी पालिकेच्या कारभारापासून ते मुंबईच्या पर्यावरणापर्यंत विविध प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे आणि मान्यवरांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया...
मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी मान्यवर आणि प्रेक्षकांशी साधलेल्या मुक्त संवादातून मुंबई महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार, पायाभूत सोयीसुविधा, अवैध घुसखोरीचे आव्हान, विविध समाजगटांचे प्रश्न, आरोग्याच्या समस्या, कला-संस्कृती क्षेत्राच्या अपेक्षा आणि मुंबईच्या पर्यावरणासंबंधी उपाययोजना अशा विविध विषयांवर भाष्य केले. त्यातील काही ठळक मुद्द्यांवर दृष्टिक्षेप...
’खान’ ही व्यक्ती नसून मानसिकता!
- पश्चिमी राष्ट्रांतील शहरांचा ’इस्लामिक रॅडिकल फंडामेंटलिस्ट एलिमेंट्स’कडून ताबा.
- दक्षिण मध्य मुंबईत प्रचारादरम्यान पाकिस्तानचे झेंडे फडकवणे, उत्तर पश्चिम मुंबईत बॉम्बस्फोटाच्या आरोपींकडून प्रचार ही ‘खाना’ची मानसिकता
- ‘खान’ ही व्यक्ती नाही, तर ती एक मानसिकता आहे. मुंबईचा ताबा घेण्यापासून आपल्याला त्यास रोखायचे आहे!
कनेक्टिव्हिटी, हाऊसिंगला चालना
- २०३०पर्यंत जेव्हा वाहतुकीशी संबंधित सगळे प्रकल्प पूर्ण होतील, तेव्हा मुंबईच्या एका भागातून दुसरीकडे पोहोचण्यासाठी केवळ ४० ते ५९ मिनिटांत प्रवास शय होईल.
- वांद्रे-वर्सोवा सी लिंक आणि तिथून पुढे वर्सोवाकडून मीरा-भाईंदरकडे जाणार्या मार्गाचे काम पूर्ण होईल, तेव्हा पश्चिम द्रुतगती मार्गाला समांतर एक दुसरा एक्सप्रेस वे तयार होईल.
- मुंबईत सीसी रस्ते होत असतानाच, ‘युटिलिटी कॉरिडोर’सह हे रस्ते तयार केले जात आहेत.
- बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना १६० चौ. फुटांमध्ये राहणार्या मराठी माणसाला ५६० चौ. फुटांचे घर मिळाले.
- धारावीत छोटेसे बिझनेस हब उभे राहणार आहे. याचाच अर्थ धारावीतील उद्योग हे धारावीतच राहतील.
मराठी शाळा, पार्किंग आणि कचरा
- धोकादायक म्हणून तोडलेल्या मराठी शाळांच्या जागांवर पुन्हा मराठी शाळाच उभ्या राहायला पाहिजे.
- २०१८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा ‘डीसीआर’ तयार करत असताना विद्यमान मोकळ्या जमिनी, आणि उद्यानांच्या खाली पार्किंगची जागा तयार करण्याचे प्रावधान समाविष्ट केले.
- मुंबईत दररोज दहा हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. पण, आता ते प्रमाण साडेसात हजार मेट्रिक टनवर आले आहे. पण, अजूनही मुंबईत कचर्यावर प्रक्रिया करणारा इलेट्रोनिक प्लांट नाही.
कला-संस्कृती संवर्धनासाठी...
- महानगरपालिकेमध्ये रस्ते, वाहतूक विभागाच्या धर्तीवर स्वतंत्र कला आणि संस्कृती विभाग असावा.
- मुंबईमध्ये कलावंतांसाठी खुले रंगमंच उपलब्ध व्हावे.
- मुंबईची खाद्यसंस्कृती जपायची असेल तर फेरीवाल्यांसाठी अधिकृत धोरण आणावे लागेल, त्यांचे क्षेत्र आरक्षित करावे लागेल.
मुंबईत सर्व समाजघटकांना न्याय
- नंदीसकट नंदीबैलवाला समाजबांधव किंवा मंदिराजवळ गायी घेऊन बसणारे बांधवांसाठी शहरात जागा प्रत्येक वॉर्डमध्ये आरक्षित केलेली असते. डिपी शीटप्रमाणे आरक्षण पाहून भटके-विमुक्त समाजातील बांधवांना जागा देता येईल.
- दिव्यांग आणि गतिमंद विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरामध्ये प्रत्येकी एक अशा किमान तीन शाळा सुरू करण्याचा विचार आहे.
- महानगरपालिकेमध्ये सत्ता आली, तर मुंबईतील ५० युवकांना प्रशासकीय वॉर्डमध्ये इंटर्नशीपची संधी.
मुंबईकरांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार
- भविष्यात’ डायबेटिसमुक्त मुंबई’चे उद्दिष्ट
- हवा तो कंत्राटदार मिळावा, यासाठी पालिका रुग्णालयांत एमआरआय मशीनसाठीची निविदा पुन्हा पुन्हा काढली जाते. पण, आता केईएम हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशीन दाखल झाली असून, त्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.
मुंबईच्या पर्यावरण संरक्षणासाठी...
- कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प असूनही मुंबईत महापालिकेचे ’सांडपाणी प्रक्रिया संयंत्र’ (एसटीपी) नाहीत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील कार्यवाही करुन सात ’एसटीपी’ प्रकल्पांचे काम सुरू केले आहे.
- मुंबईमध्ये निसर्गभ्रमंती सहली आणि निसर्ग शिक्षणाचे कार्यक्रम घेणे आवश्यक आहे.
- नाल्याच्या माध्यमातून कचरा थेट समुद्रात जातो. त्यामुळे नाल्यांवर ‘ट्रॅश बुम्स’ बसवणे आवश्यक असून, काही नाल्यांवर ते बसवण्यात आले आहेत.
हे संवादाचे सत्र असेच सुरु राहावे...
दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘मुंबई डायलॉग- मुंबई काल, आज आणि उद्या’ हा कार्यक्रम आयोजित करुन मुंबईकरांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच जे सांगण्यात आले होते की, ही मुलाखत नसून संवाद आहे आणि तो संवाद होणे गरजेचे आहे. त्यामुळे या संवादाचे सत्र असेच सुरु राहावे. मुंबईकरांच्या समस्या आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याविषयी अमीतजींनी जे सांगितले, ते खूप चांगल्या पद्धतीने अमलात येईल. २०१४ पासून जे काही बदल झाले आहेत, म्हणजे ‘मिल ते मेट्रो’ हा जो प्रवास आहे, तो सुंदर आहे. या सत्राच्या माध्यमातून मुंबईकरांनाही तो माहित झाला.
- अनघा बेडेकर, सहकार्यवाह, मराठी चेंबर ऑफ कॉमर्स
तरुणाईला आवाज देणारा कार्यक्रम
दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुंबईच्या वर्तमानाबद्दल आणि भविष्याबद्दल अर्थपूर्ण चर्चा झाली. या कार्यक्रमाने विशेषतः आजच्या तरुणांसाठी संवादासाठी एक मोकळी जागा निर्माण केली, हा कार्यक्रम तरुणाईला आवाज देणारा कार्यक्रम होता. मुंबईसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या चैतन्यशील शहरात, सर्जनशीलता, ओळख आणि सामूहिक विकासाला चालना देण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे.
- डॉ. सुजाता जाधव, प्रमुख, संदर्भ ग्रंथालय आणि दस्तऐवजीकरण केंद्र, एनसीपीए
असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हायला हवे!
खरंतर खूप छान कार्यक्रम होता. कारण, काय ‘काल’ व्हायला हवे होते, जे झाले नाही आणि ‘आज’ काय चालले आहे किंवा ‘उद्या’ काय आणखी छान होऊ शकते, याविषयी हा थेट संवाद झाला. यानिमित्ताने नागरिकांच्या मनातील प्रश्न मांडले गेले आणि त्याची अत्यंत समर्पक उत्तरे मुंबई भाजप अध्यक्षांनी दिली. त्यामुळे खूप छान संवाद झाला. जे काही प्रश्न राहून गेले असतील, तर त्यासाठी असे कार्यक्रम पुन्हापुन्हा व्हायला हवेत
- संदीप अध्यापक, सीईओ, वॉटर फिल्ड टेनोलॉजीज प्रा. लि.
मुंबईकरांसाठी चांगले व्यासपीठ
दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि किरण शेलार यांचे खूप अभिनंदन की, त्यांनी मुंबईकरांसाठी एक खूप चांगले व्यासपीठ निर्माण केले, ज्याला ‘एबीपी माझा’ने साथ दिली. आगामी काळात होणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमच्या प्रश्नांची अमीतजींनी समर्पक अशी उत्तरे दिली. जे लॉबिंग वर्षानुवर्षे चालू होते, कंत्राटे विशिष्ट लोकांनाच मिळत होती, नवउद्योजकांना संधी मिळत नव्हत्या. कारण, तिथे आमच्यासारख्या नवउद्योजकांना उभेही केले जात नव्हते. मात्र, अमीतजींनी सांगितल्याप्रमाणे आता यापुढे नवउद्योजकांना त्यामध्ये नक्की संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- दिनेश निमकर, उद्योजक, कॉम्प्यु सॉफ्ट
भविष्यातील मुंबईचे सुंदर व्हिजन
सर्वप्रथम मी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे अभिनंदन करतो की, मुंबईच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत, ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित केले. या सगळ्या प्रश्नांना मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी छान उत्तरे दिली. भविष्यात २०३० मध्ये मुंबई कशी असेल, याचे एक अतिशय सुंदर व्हिजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर ठेवले.
- विनोद कांबळे, उपाध्यक्ष, भाजप ईशान्य मुंबई
डोळ्यांमध्ये अंजन घालणारा कार्यक्रम
‘मुंबई डायलॉग’ या कार्यक्रमात अमीतजींच्यासमोर उपस्थित मान्यवरांनी जे काही प्रश्न मांडले, ते अतिशय मनाला भावणारे होते. मुंबई महापालिकेत काय व्हायला हवे आणि काय व्हायला नको होते, याचे सखोल दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाले. याकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘एबीपी माझा’ यांचे खूप आभार. डोळ्यांमध्ये अंजन घालणारा हा कार्यक्रम होता आणि लाखो मुंबईकरांसमोर त्यांनी मुंबईकरांचे प्रश्न, मुंबईबद्दल असणारे व्हिजन सादर केले.
- डॉ. विशाल कडणे, सदस्य, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ