कोणतीही संस्कृती त्या देशातील लोकांच्या पाठिंब्यावरच फुलते. भारतीयांची गौरवशाली सांस्कृतिक परंपरा सत्तेच्या जोरावर दाबून टाकण्यात आली होती. पण, ती नष्ट झाली नव्हती. तिला पुन्हा फुलविण्यासाठी आणि मानाचे स्थान देण्यासाठी राजकीय पाठबळाची गरज होती. मोदी यांनी ही गरज ओळखून दीर्घकालीन पावले टाकली आणि त्यात स्वतःचे मोठे योगदान दिले. आज भारत औद्योगिक क्षेत्रातच नव्हे, तर सांस्कृतिक क्षेत्रातही जागतिक स्तरावर उदयास येत आहे, त्याचे श्रेय निश्चितच मोदी यांना जाते.
नवी दिल्लीत रामनाथ गोएंका स्मृती व्याख्यानात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांच्या नेमया समस्येवर बोट ठेवले. ब्रिटिश वसाहतवादी थॉमस बॅबिंग्टन मेकॉले याने जवळपास २०० वर्षांपूर्वी भारतातील ब्रिटिश सत्ता घट्ट करण्यासाठी ज्या धोरणाची मुहूर्तमेढ रोवली, त्या धोरणाला उखडून टाकण्याचे आवाहन मोदींनी या भाषणात केले. भारताच्या मागासपणाचे खरे दुखणे बहुसंख्य भारतीयांमध्ये आपल्या धर्म-संस्कृती आणि उद्यमशीलतेवर असलेला आत्मविश्वास आणि अभिमानाचा अभाव हेच आहे, ही गोष्ट पंतप्रधान नरेंद मोदींनी अचूकपणे ओळखली होती. देशाला विकसित करण्यासाठी केवळ भौतिक विकासाचीच नव्हे, तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्थानाचीही गरज आहे, हे ओळखून मोदींनी त्यासाठी दीर्घकालीन पावले उचलली आहेत. आज भारताने केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे, तर सांस्कृतिक क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे, हे मोदी यांच्या प्रयत्नांना अंकुर फुटत असल्याचे चिन्ह आहे.
भारतावरील आपली सत्ता मजबूत करण्यासाठी भारतीयांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अभिमानाला नष्ट केले पाहिजे आणि पाश्चिमात्य संस्कृती ही भारतीय संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे, ही गोष्ट भारतीयांच्या मनावर बिंबविली पाहिजे, ही गोष्ट मेकॉलेने प्रतिपादित केली. ब्रिटिश सरकारने त्याची यशस्वी अंमलबजावणी केली आणि भारतातील पारंपरिक गुरुकुल शिक्षण पद्धती लयास गेली आणि ब्रिटिशांसाठी कारकुनांची पैदास होऊ लागली. परिणामी, भारतीय केवळ भौगोलिकदृष्ट्याच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही ब्रिटिशांचे गुलाम बनले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तरी यात बदल घडेल, ही आशाही मावळली. कारण, तत्कालीन नेतृत्व हे ब्रिटिशांनी राबविलेल्या गुलामगिरीच्या मुशीतूनच तयार झाले होते. परिणामी, हे धोरण स्वातंत्र्यानंतरही ७० वर्षे राबविले गेले.
मोदींनी ही गोष्ट ओळखून सत्तेवर येताच भारताच्या सांस्कृतिक उत्थानासाठी दीर्घकालीन योजना बनविली. ‘मेक इन इंडिया’ असो की नवे शैक्षणिक धोरण असो, त्यातून त्यांनी भारतीयांमध्ये आपल्या संस्कृती आणि परंपरांबद्दल अभिमान जागविण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर त्यात त्यांनी स्वत:ही सहभाग घेतला. भारत उत्सवप्रिय देश असून मोदी सरकार आल्यापासून या उत्सवांमध्ये नवा जोश फुंकला गेला. स्वत: मोदी यांनीच केदारनाथपासून रामेश्वरपर्यंत अनेक मंदिरांमध्ये देवतांची पूजाअर्चा केली आणि त्या प्रसंगांचे टीव्हीवर थेट प्रसारणही केले. अनेक तीर्थस्थळांचा जीर्णोद्धार मोदी सरकारने केला. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीने त्यावर कळस चढविला. यामुळे बहुसंख्याक समाजात आपल्या धार्मिक रितीरिवाजांबद्दल अभिमान आणि आपलेपणा निर्माण होत गेला. तेव्हापासून भारतात धार्मिक पर्यटनाने प्रचंड उचल खाल्ली आहे (त्यात परदेशी पर्यटकांचाही मोठा सहभाग आहे, हे विशेष.) या तीर्थस्थळांच्या आणि पर्यायाने संबंधित राज्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली. मंदिर बांधल्याने काय मोठा फरक पडणार आहे, या विरोधकांच्या कुत्सित प्रश्नाला या धार्मिक पर्यटनाने जोरदार चपराक लगावली आहे. थोडयात, मेकॉलेने भारतीयांचा आत्मविश्वास आणि सांस्कृतिक अभिमान नष्ट करण्यासाठी जे जे उपाय योजले, ते ते मोदी यांनी उद्ध्वस्त केले.
काँग्रेसने मोदी सरकारची जितकी मदत केली आहे, तितकी ती भाजपनेही केली नसेल. सतत सत्तेपासून दूर राहावे लागल्याने काँग्रेसचे नेतृत्व मानसिक समतोल गमावून बसले आहे. सत्तेसाठी भाजपला, विशेषत: मोदी यांना विरोध करता करता हा पक्ष आता देशाचा आणि बहुसंख्याकांच्या धार्मिक परंपरांचा विरोध करू लागला आहे. पण, काँग्रेस नेत्यांच्या या उघड देशविरोधी व मुस्लीमधार्जिण्या वक्तव्य आणि धोरणाचा देशातील हिंदू समाजावर अनुकूल परिणाम झाला. एरव्ही हिंदू हे त्यांच्या प्रथा-परंपरांबद्दल उदासीन होते. मात्र, मोदी यांनी या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे पुनरुज्जीवन करीत हिंदूंमध्ये नवे स्फुल्लिंग चेतविले.
काँग्रेसच्या धर्मविरोधी भूमिकेने हिंदूंमध्ये त्याबद्दल अभिमान आणि गौरवाची भावना निर्माण होत गेली. समाजमाध्यमांमुळे या समाजाला आपल्या गौरवशाली इतिहासाची नव्याने ओळख होऊ लागली. इतकेच नव्हे, तर स्वातंत्र्य चळवळीचा आणि तत्पूर्वीचा हेतूत: विपर्यस्त पद्धतीने सादर केलेला इतिहासही नव्या पुराव्यांसह या माध्यमांवर प्रसृत होऊ लागला, तेव्हा ही ओळख अधिक ठळक बनत गेली. भारतीय परंपरा, सण-उत्सव आणि धार्मिक रितीरिवाजांना पुन्हा प्रतिष्ठा मिळत गेली. आज अनेक पुरुष उघडपणे कपाळावर टिळा लावतात आणि गळ्यात रुद्राक्षाची माळही घालतात. हिंदू सणांच्या काळात प्रसिद्ध होणार्या जाहिरातींमधील स्त्रियांचेही पोषाख, चेहर्यावरील हावभाव, अगदी कपाळावरील टिकलीसह अधिक सकारात्मक होत गेले.
गेल्या सात दशकांमध्ये भारताचा डावलला गेलेला सांस्कृतिक ठेवा मोदींनी पुन्हा एकदा जगापुढे सादर केला. योग ही भारताने सार्या जगाला दिलेली मोठी देणगी आहे. मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच संयुक्त राष्ट्रांनी जागतिक योग दिन साजरा करण्यास प्रारंभ केला. आयुर्वेद हीसुद्धा भारताची फार मोठी देणगी असून मोदी यांनी आयुर्वेदाचे महत्त्व पुन्हा एकदा बिंबविले. ‘कोविड’च्या साथीमुळे भारतीयांच्या पारंपरिक आरोग्यदायक सवयी आणि आयुर्वेदिक औषधे यांचे महत्त्व जागतिक स्तरावर उदय पावले. संस्कृत भाषेबद्दल परदेशात नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. मोदी यांच्या प्रभावामुळेच ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’ (ब्रिटनच्या पंतप्रधानांचे निवासस्थान) आणि ‘व्हाईट हाऊस’मध्ये दिवाळी साजरी कली जाते.
अर्थात, ही लढाई दीर्घकाळ चालणारी असून हिंदूंनी धैर्याने आणि संयमाने ती जारी ठेवली पाहिजे. ज्याप्रमाणे पाश्चिमात्य संस्कृतीला भारतीयांवर लादले गेले, त्याप्रमाणे भारतीयांना तितयाच जोरकसपणे आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान जागृत करण्यासाठी एका सक्षम नेत्याची गरज होती. मेकॉलेला ब्रिटिश सत्तेचे पाठबळ मिळाले होते. मोदी यांनी आपल्या सरकारची ताकद भारतीय संस्कृतीमागे उभी केली आहे. परदेशातही अभिमानाने आपले भारतीयत्व मिरविणारे आणि भारतीय संस्कृतीला परदेशातही मोदींनी गौरव प्राप्त करून दिला आहे. मोदी यांनी जबरदस्तीने भारतीय संस्कृती अन्य देशांवर लादलेली नाही, तर या संस्कृतीतील दिव्य गोष्टींची जगाला ओळख करून दिल्याने जगाने ती आपणहून स्वीकारली आहे. यापुढील काळात भारतीय संस्कृतीचा विकास करून भारताला विश्वगुरू बनविण्याची जबाबदारी मात्र समस्त हिंदूंची आहे! पण, त्यासाठी मेकॉलेचे जे जे जुने, ते ते जाळुनी किंवा पुरुनी टाकावेच लागेल!