मुंबई : (RSS Chief Mohan Bhagwat) "भारतावर प्रेम करणारा आणि भारतीय असल्याचा अभिमान बाळगणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. त्याची उपासना-पद्धती कोणतीही असो. 'हिंदू' हा शब्द केवळ धार्मिक परिभाषा नसून, हजारो वर्षांच्या अखंड सांस्कृतिक परंपरेतून उदयास आलेली सभ्यतागत ओळख आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त गुवाहाटी येथे आयोजित बुद्धिजीवी, विद्वान, संपादक, लेखक आणि उद्योजकांच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संवादात्मक सत्रात संघाची सभ्यतागत दृष्टी, वर्तमान राष्ट्रीय प्रश्न आणि ईशान्य भारतातील चालू कार्य यावर सविस्तर चर्चा केली.
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक म्हणाले, "संघाची स्थापना कोणाचा विरोध करण्यासाठी किंवा कोणाला हानी पोहोचवण्यासाठी झालेली नाही, तर व्यक्तिमत्वनिर्माण आणि भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी समाजाचे संघटन करण्यासाठी झाली आहे. संघ समजून घ्यायचा असेल तर शाखेत जावे, पूर्वग्रहांच्या आधारे मत बनवू नये. विविधतेतून भारताला एका सूत्रात गुंफण्याची कार्यपद्धती म्हणजे संघ."
आसाम मधील जनसांख्यिकीय आव्हाने आणि सांस्कृतिक संरक्षण यावर बोलताना त्यांनी आत्मविश्वास, सतर्कता आणि आपल्या भूमी व ओळखीबद्दल दृढ निष्ठा राखण्याचा संदेश दिला. अवैध घुसखोरी, संतुलित लोकसंख्या धोरणाची गरज आणि विभाजनवादी धार्मिक रूपांतरणाच्या प्रयत्नांबाबत सावध राहण्याची सूचना केली. तसेच युवकांनी सोशल मीडियाचा संयमाने वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. ईशान्य भारत हा विविधतेतील एकतेचा तेजस्वी नमुना असल्याचे सांगून त्यांनी म्हटले की येथील विविधता ही भारताच्या अंतर्निहित एकतेचे प्रतिबिंब आहे.