मुंबई : (Al Falah University) दिल्ली बॉम्बस्फोटामागील 'व्हाईट-कॉलर' दहशतवादी मॉड्यूलचे केंद्र असलेल्या अल फलाह शिक्षण समूहाचे अध्यक्ष आणि विद्यापीठाचे संस्थापक जवाद अहमद सिद्दीकी यांना मंगळवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. मनी लाँड्रिंगच्या या गंभीर प्रकरणाची चौकशी १० नोव्हेंबरच्या लाल किल्ला स्फोटाशी संबंधित दहशतवादी निधीच्या दृष्टीनेही केली जात आहे.
ट्रस्टचा गैरवापर
सिद्दीकी हे १९९५ मध्ये स्थापन झालेल्या अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापन पाहत होते. तपासानुसार, १९९० नंतर या संस्थांची भरभराट झाली, पण त्याला आर्थिक व्यवहारांची योग्य जोड नव्हती. तपासणीत असे उघड झाले आहे की, ट्रस्टच्या नावावर जमा झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांना बांधकाम आणि केटरिंग करारांच्या नावाखाली वळवण्यात आला. ईडीने सिद्दीकी यांच्या निवासस्थानी आणि विद्यापीठाच्या आवारात तपासणी केल्यानंतर पुराव्यांच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय ४८ लाख रुपयांहून अधिक रोख आणि डिजिटल पुरावेही ईडीने जप्त केले आहेत. समूहाशी जोडलेल्या अनेक ‘शेल कंपन्यां’ची ओळख पटली आहे.
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) गुन्हेगारी तरतुदींनुसार सिद्दीकीला ताब्यात घेण्यात आले. बनावट मान्यता आणि फसवणुकीच्या दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या दोन एफआयआरमुळे (FIRs) ईडीच्या चौकशीला गती मिळाली. अल-फलाह विद्यापीठाने NAAC ची बनावट मान्यता आणि UGC कायद्याच्या कलम 12(B) अंतर्गत अनुदानासाठी पात्र असल्याचा खोटा दावा करून विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.UGC ने स्पष्ट केले आहे की विद्यापीठ केवळ राज्य खासगी विद्यापीठाच्या यादीत आहे आणि अनुदान मिळवण्यासाठी पात्र नव्हते.