अंतर्मुखतेतून स्व-बोध...

18 Nov 2025 12:49:55

बिहार विधानसभा निकालानंतर आणि एरवीही निवडणुकांनंतर विजयी पक्षांकडून पराभूतांना सल्ला दिला जातो तो आत्मचिंतनाचा. जसे हे पक्षीय आत्मचिंतन महत्त्वाचे, तसेच आपल्यालाच आपल्या व्यक्तिगत आयुष्याकडेही असेच अगदी तटस्थपणे असेच डोकावता आले पाहिजे. आपल्याच मनाला, भावनाला प्रश्न विचारायला हवे. अशा या अंतर्मुखतेतून स्व-बोधाच्या शोधाच्या प्रक्रियेवर टाकलेला हा कटाक्ष...

आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट बदलत राहते, म्हणून आपण बरेचदा अस्वस्थ असतो. आपली अंतर्गत मनःस्थिती, आपले शरीर, आपले काम, आपण ज्या लोकांवर प्रेम करतो, आपण ज्या जगात राहतो, आपण काहीही काबूत ठेवू शकत नाही. एक सुंदर सूर्योदय, एक गोड चव, प्रियकरासह एक जवळचा क्षण, या सर्व गोष्टी येतात आणि जातात. कायमस्वरूपी समाधानाचा अभाव असल्याने, आपल्याला सतत काहीतरी अधिक बनण्यासाठी, काहीतरी वेगळे अनुभवण्यासाठी प्रेरित केले जाते.

ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल म्हणाला होता, “स्वतःला जाणून घेणे हीच खरी ज्ञानाची सुरुवात आहे.” तेव्हा त्याने कल्पनाही केली नसेल की, काही लोकांसाठी हे किती आव्हानात्मक ठरू शकते. सोक्रेटिस आणि प्लेटो यांसारख्या तत्त्वज्ञांनी आत्मपरीक्षणाच्या संकल्पनेचा प्रसार केला. त्यांच्या मते, ‘स्वतःला जाणून घेणे’ हेच खऱ्या ज्ञानाचे मूळ आहे आणि मानवी अस्तित्व समजून घेण्याचा तो सर्वोत्तम मार्ग आहे. आज हेव्यादाव्यांच्या युगात खरंच त्याची खूप गरज आहे.

अंतर्मुख होणे म्हणजे काय?

‘Introspection’ हा शब्द लॅटिन ’introspectus' म्हणजेच स्वतःच्या आत डोकावणे या शब्दावरून निर्माण झाला आहे. अंतर्मुखता म्हणजे आपल्या मनाच्या आणि भावनांच्या परिघात शिरून, आपले वर्तन, आपली प्रेरणा, प्रतिक्रिया, विचारसरणी यांचा शोध घेणं. ही केवळ आत्मविलेषणाची क्रिया नाही; ती आत्मजागरूकतेकडे, आत्मपरिवर्तनाकडे नेणारी एक गहन प्रवासयात्रा आहे. ताणतणावाच्या युगात याचा आपल्याला मोठा फायदा होऊ शकतो.

अंतर्मुखता आणि मानसिक आरोग्य

अंतर्मुखता केवळ वैयक्तिक वाढीसाठीच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही तितकीच महत्त्वाची आहे. नियमित आत्मचिंतनामुळे चिंता कमी होते, ताण सहन करण्याची क्षमता वाढते आणि थकवा टाळला जातो. परंतु, अंतर्मुखतेचा अभाव असेल, तर भावनिक स्थैर्य डळमळते, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि असमाधान वाढतं. जसं शारीरिक व्यायामाने शरीर मजबूत होतं, तसं अंतर्मुखतेने मन बळकट होतं. स्वतःच्या भावनिक पॅटर्न्सचा अभ्यास केल्याने आपण ताण वाढू देत नाही.

अंतर्मुखता ही भावनिक बुद्धिमत्तेचा गाभा आहे. ती आपल्याला आपल्या भावनांना समजून घ्यायला आणि त्यांचा संतुलित वापर करायला शिकवते. मानसिक संशोधनानुसार, जे लोक आपल्या भावनांवर नियमित विचार करतात, त्यांना ताण कमी जाणवतो आणि ते बिकट प्रसंगी अधिक स्थिर राहतात. मतभेदांमध्ये सुसंवाद साधतात. अंतर्गत शांतता आणि संतुलन वाढते.
प्रत्येक भावनिक प्रतिक्रियेनंतर स्वतःला विचारा, मी काय अनुभवत होतो आणि त्या क्षणी मला खरोखर काय हवं होतं, या प्रश्नात भावनिक परिपक्वतेचा मार्ग लपलेला आहे. स्वतःला समजून घेतल्यावर इतरांविषयीची करुणाही वाढते.

लवचिकता वाढवणे

जीवन अनपेक्षित असतं. त्यात निराशा, अपयश, आणि वेदना येतात. अंतर्मुखता आपल्याला या आव्हानांतून उभं राहण्याची शक्ती देते. भूतकाळातील संकटांवर आपण मात कशी करावी? आपल्या ताकदींची क्षमता कशी निभवावी? अपयशाकडे शिकवणी म्हणून कसे पाहावे? शास्त्रज्ञांच्या मते, जे लोक भूतकाळातील अडचणींवर विचार करतात, ते भविष्यातील अडथळ्यांना अधिक शहाणपणाने हाताळतात.

अंतर्मुखतेद्वारे आपण आपल्या मूल्यांना, विश्वासांना, सामर्थ्यांना आणि मर्यादांना ओळखू लागतो. अंतर्मुखता आपल्याला जाणीवपूर्वक जगायला मदत करते. आपल्या अनुभवांबद्दल लिहिल्याने विचारांची आणि भावनांची पद्धत लक्षात येते. माझी खरी प्रेरणा काय आहे किंवा मी अशी प्रतिक्रिया का दिली, हे स्वतःला विचारावे; पण आपले जवळचे मित्र किंवा मार्गदर्शक कधीकधी आपल्याला स्वतःकडून न दिसणारी बाजू दाखवू शकतात. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो, तेव्हा आपले निर्णय अधिक स्पष्ट आणि सुसंगत होतात.

विचारवंत देकार्तच्या प्रसिद्ध विधानात ’Cogito, ergo sum' (मी विचार करतो, म्हणून मी आहे) आत्मपरीक्षणाच्या या तत्त्वाचा गाभा प्रतिबिंबित होतो. त्यामुळे आत्मपरीक्षण ही केवळ धार्मिक किंवा तात्त्विक साधना नाही, तर मानवी चेतना आणि अंतर्मनाच्या जाणिवेकडे नेणारा सर्वकालीन प्रवास आहे. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनामुळे अर्जुनाला उमजते की, त्याचे कर्तव्य हे वैयक्तिक आसक्तींपेक्षा अधिक उंच आहे. या आत्मपरीक्षणाच्या प्रवासातून अखेरीस तो आपल्या योद्ध्याच्या भूमिकेचा प्रेमपूर्वक आणि शांतपणे स्वीकार करतो. आत्मोन्नती साधण्याचा हा एक मार्ग आहे.

प्रत्येक बदलाची सुरुवात जाणिवेतून होते. अंतर्मुखता आपल्याला आपल्या सवयी, भीती आणि चुकीच्या धारणा ओळखून त्यांना बदलण्याची प्रेरणा देते. अंतर्मुखता म्हणजे आत्मविकासाची किल्ली, ती आपल्याला ‘मी आहे’पासून ‘मी होऊ शकतो’ या प्रवासावर नेत असते. स्वचिंतनामुळे सर्जनशीलता वाढते आणि विचारांची लवचिकता निर्माण होते. शांततेत काही वेळ घालवा. अनेकदा सृजनशीलतेचा जन्म नीरवतेतच होतो.

भावनिक जवळीक कमी होत चालल्याने नात्यांमध्ये विश्वास आणि आपुलकीचा अभाव जाणवतो. नात्यांमध्ये सहानुभूती, समज आणि जबाबदारी अंतर्मुखतेतच दडलेल्या आहेत. त्यामुळे आपण अधिक संवेदनशील आणि भावनिकदृष्ट्या प्रगल्भ होतो.

वादानंतर या प्रसंगात माझी भूमिका काय होती, हा एक साधा प्रश्न नात्यातील बचावात्मक वृत्तीऐवजी परिपक्वता निर्माण करू शकतो. आत्मचिंतनामुळे स्वतःच्या भावनांची जाणीव झाल्याने इतरांबद्दल परानुभूती वाढते. ‘इंट्रोस्पेक्शन’ हे विचारप्रक्रिया आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका बजावते. कारण, त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या विचारसरणी आणि पूर्वग्रहांवर चिंतन करू शकतात. ही प्रक्रिया मानसोपचार आणि काऊन्सिलिंगमध्ये वारंवार वापरली जाते. कारण, ती व्यक्तींना स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि त्यांच्या अनुभवांशी जुळवून घेण्यास साहाय्य करते.

अंतर्मुखता म्हणजे जगापासून दूर जाणं नव्हे; तर जगाशी आणि स्वतःशी अधिक सखोल संबंध प्रस्थापित करणं आहे. प्रत्येक चिंतनाचा क्षण म्हणजे, स्वतःशी चाललेला एक निःशब्द संवाद, जिथे ज्ञानाचा जन्म होतो, उपचाराला सुरुवात होते आणि ‘मी कोण आहे’ या प्रश्नाचं शांत उत्तर सापडतं. ध्यान आणि संरचित स्व-प्रश्न विचारण्याच्या चिंतनशील कृतीमुळे व्यक्ती अधिक भावनिक स्थैर्य, सर्जनशीलता आणि जीवनसमाधान अनुभवतात. अंतर्मुखता आधुनिक जीवनात फुलून जगण्यासाठी एक अत्यंत व्यावहारिक साधन आहे.


Powered By Sangraha 9.0