नुकताच दि. 14 नोव्हेंबर रोजी ‘जागतिक मधुमेह दिन’ साजरा झाला. मधुमेह या आजाराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. जीवनशैलीशी निगडित या आजाराचा सामना करण्यासाठी जीवनशैलीमध्ये सुधारणा करणे, हाच उपाय असतो. भारतामध्ये प्रौढांबरोबरच बालकांमध्येही हा आजार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानिमित्ताने बालमधुमेह या आजाराच्या व्याप्तीचा घेतलेला मागोवा...
जगातील तरुण देश’ म्हणून ख्याती असलेल्या भारतात, बालकांमधील मधुमेहाची लागण वाढत असल्याचा गंभीर इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. काही वर्षांपूवपर्यंत प्रामुख्याने प्रौढांपुरता मर्यादित असलेला हा आजार, आता बालवयातच जीवनामध्ये प्रवेश करु पाहत आहे. विशेषतः ‘टाईप-1’ मधुमेहाची नवीन प्रकरणे सातत्याने वाढत आहेतच, ‘टाईप-2’ मधुमेह जो पूव ‘लाईफस्टाईल डिसीज’ म्हणून प्रौढांमध्येच आढळत असे, तोही आता वाढत्या प्रमाणात बालकांमध्ये दिसू लागला आहे. त्यामुळे ‘बालमधुमेह’ हा केवळ वैयक्तिक पातळीवरचा प्रश्न नसून, सार्वजनिक आरोग्यासमोरील एक गंभीर आव्हान ठरताना दिसते.
वाढत्या बालमधुमेहामागील प्रमुख कारणे ही आपल्या बदलत्या जीवनशैलीत दडली असल्याचे तज्ज्ञ सांगतात. आज शहरीकरणासोबतच लहान मुलांचे खेळणे कमी झाले, व्यायामाशी असलेला संपर्क कमी झाला आणि शाळा तसेच घरातील दैनंदिन जीवनात ‘स्क्रीन-टाईम’ने मध्यवत स्थान मिळवले. परिणामी, बालकांमधील लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आणि शरीराची इन्सुलिनवरील संवेदनशीलता कमी होऊन, ‘टाईप-2’ मधुमेहाचा धोका वाढू लागला. जंक फूड, पॅकेज्ड स्नॅक्स, अतिप्रमाणात साखर असलेली शीतपेये आणि प्रक्रियायुक्त पदार्थांचा वाढता वापर मुलांच्या चयापचय प्रक्रियेत बिघाड निर्माण करत असल्याचे, अनेक वर्षांपासून सांगत आहेत. मुलांचे वजन जलद गतीने वाढणे, सतत थकवा, वारंवार लघवी, जास्त भूक किंवा तहान अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्तीही वाढत आहे.
मधुमेहातील अनुवंशिकतेची भूमिका नाकारता येत नाही; परंतु त्याचबरोबर जीवनशैलीचीही भूमिका तितकीच महत्त्वाची ठरते. आईवडिलांना मधुमेह असेल, तर मुलांमध्ये धोका निश्चितच अधिक असतो. परंतु, योग्य आहार, नियंत्रित ‘स्क्रीन-टाईम’ आणि नियमित शारीरिक हालचाल यांमुळे हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.
बालकांमधील मधुमेह रोखण्यामध्ये पालकांचीही भूमिका तितकीच निर्णायक ठरते. मधुमेहाविरोधाच्या लढाईमध्ये मुलांच्या आहारात ताज्या भाज्या, फळे, कमी साखर असलेले पदार्थ आणि घरगुती जेवणाचा समावेश वाढवणे अत्यावश्यक आहे. अनेकदा पालकांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे मुलांच्या प्लेटमध्ये ‘जे पटकन मिळेल’ असेच अन्न येते. मात्र, जे पटकन मिळते, ते नेहमी आरोग्यदायी असेलच, असे नाही. त्यामुळे मुलांचे पोट भरण्याबरोबरच, भरणपोषण होण्याकडेही पालकांनी लक्ष देणे आवश्यक झाले आहे. त्याचबरोबर, मुलांना मैदानी खेळ, सायकलिंग, धावणे किंवा कोणत्याही स्वरूपातील व्यायामाचे प्रोत्साहन देणे ही पालकांची पहिली जबाबदारी आहे. दिवसात किमान 40 मिनिटे केलेला व्यायाम मुलांच्या आरोग्यासाठी हितकारक मानला जातो.
यात शाळांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. शाळांनी आहारशिक्षण, मधुमेहाविषयी जागरूकता आणि नियमित आरोग्यतपासणी यांचे कार्यक्रम राबवणे अत्यावश्यक आहे. अनेकदा मुलांमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत ‘प्री-डायबिटिस’ची लक्षणे दिसू शकतात. त्यावर त्वरित उपाययोजना केल्यास पुढील गुंतागुंत टाळता येणे सहज शक्य असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा ही आगामी दशकातील सर्वांत महत्त्वाची गुंतवणूक ठरणार आहे.
‘तरुणांचा देश’ अशी ख्याती असलेल्या भारतात, लहान मुलांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा आहे. हे वास्तव पालक, शिक्षक आणि समाजातील सर्वांनीच गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. बालमधुमेह रोखायचा असेल, तर त्याविषयी भीती बाळगण्यापेक्षा, त्याच्या प्रतिबंधकात्मक उपचारांवर आज चर्चा होणे आवश्यक आहे. उद्याच्या प्रतीक्षेत आजार अधिक बळावतो. म्हणूनच, मुलांच्या आहार-शिक्षणाची सुरुवात घरातून होणे, शाळांनी आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे आणि नियमित तपासणी ही तीन परस्परपूरक पावले त्वरित उचलावी लागणार आहेत.
मधुमेह हा उपचारक्षम आजार असला, तरी मुलांच्या आयुष्यावर त्याचा दीर्घकालीन प्रभाव टाळायचा असेल, तर आजच्या पिढीसाठी ‘साखरमुक्त आरोग्याची शिस्त’ आपणच घडवावी लागणार आहे. मुलांचे आरोग्य वाचवायचे असेल, तर जीवनशैलीतील बदल हा इलाज नाही, तोच प्रतिबंध आहे.
(प्रतिनिधी)