पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा युद्धाची भाषा करत, भारत आणि तालिबान या दोन्ही आघाड्यांवर लढण्याची तयारी दाखवली आहे. त्यांच्या या विधानाला फारसे गांभीर्याने घेण्याचे कारण नाही, पण हे वक्तव्य पाकिस्तानच्या आजच्या राजकीय व सामाजिक वास्तवाचे अत्यंत अचूक दर्शन घडवते. कारण, पाकिस्तानात लोकशाही, अर्थव्यवस्था आणि जनजीवन या तिन्ही आघाड्यांवर अभूतपूर्व संकटं ओढावलेली असताना, युद्धाच्या वल्गनेतून सरकार जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानच्या इतिहासाकडे पाहिलं, तर हे काही नवीन नाही. या देशाने लढलेली सर्व युद्धं ही स्वतःच्या संरक्षणासाठी नव्हती; ती दुसऱ्या देशाचे भूभाग काबीज करण्यासाठी किंवा धार्मिक कट्टरवादाला चालना देण्यासाठीच होती. काश्मीरचा दुराग्रह, ‘जिहाद’चा वापर आणि दहशतवादी संघटनांना मिळणारा राजकीय पाठिंबा हेच पाकिस्तानच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत.
दोन बाजूंच्या युद्धाच्या वल्गना करणाऱ्या पकिस्तानची राजकीय स्थिती तर अधिकच चिंताजनक आहे. आज पाकिस्तानात निवडून आलेले नेतृत्वाला दुय्यम करून, जनरल असीम मुनीर हे जवळपास लष्करी हुकूमशहाच्या भूमिकेत आले आहेत. कमकुवत न्यायालयीन यंत्रणा, दुबळी संसद आणि विरोधकांवर सुरू असलेली दडपशाही हीच पाकिस्तानच्या राजकारणाची पद्धत झाली आहे. स्वतःच्या जनतेच्या मूलभूत अधिकारांना चिरडणे हाच आजवरचा पाकिस्तानी सैनिकांचा सर्वांत मोठा ‘पराक्रम’ ठरावा. कोणत्याही देशातील सैन्याचे काम सीमांचे रक्षण करणे हेच असते; परंतु पाकिस्तानात सैन्याने सर्वांत जास्त ताकद स्वतःच्या नागरिकांवरच वापरली आहे.
या राजकीय अराजकतेसोबतच पाकिस्तानची अर्थव्यवस्था खोल खाईत कोसळली आहे. परकीय कर्ज प्रचंड वाढले आहे आणि महसुलापेक्षा कर्जफेडीवर अधिक खर्च होत आहे. महागाई इतकी उसळली आहे की रोजच्या गरजेच्या वस्तूही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. आर्थिक परिस्थितीबरोबरच पाकिस्तानातील सामाजिक परिस्थितीही ढासळलेली आहे. रोजगाराच्या संधी कमी होत गेल्याने युवकांची, महिलांची परिस्थिती तर आणखीनच कठीण आहे. सुरक्षिततेचा अभाव, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि सामाजिक बंधनांच्या जोखडात त्यांचे जीवन अधिकच कठीण झाले आहे.
देश अशा गंभीर परिस्थितीत असताना, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी युद्धाची वल्गना करणे, हा वास्तवातल्या संकटांवर पांघरुण घालण्याचाच प्रयत्न आहे. युद्धाची तयारी करण्याची पाकिस्तानची क्षमता आज जवळजवळ संपलेली आहे. ज्या देशाच्या सैन्याला गेल्या काही दशकांत प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव नाही, अशा देशाने दोन आघाड्यांवर युद्ध लढण्याची घोषणा करणे, ही वास्तवापासून तुटलेली, दिशाभूल करणारी भाषा ठरते. पाकिस्तानचे खरे युद्ध बाहेर नाही, ते आत आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणारी यंत्रणा मोडून काढणे, लोकशाही संस्थांना बळकटी देणे, भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक सुधारणा राबवणे आणि जनजीवन उभे करणे हीच आज पाकिस्तानची खरी लढाई आहे. परंतु, या संघर्षाकडे दुर्लक्ष करून सत्तेत आलेला कोणताही पाकिस्तानी पक्ष, भारताचा संदर्भ देत युद्धाच्या घोषणा करण्यातच धन्यता मानतो. अर्थात सुधारणा करण्यापेक्षा हे करणे अधिक सोपे असते.
आज पाकिस्तानचे राजकीय नेतृत्व लष्करी हुकुमशहा असलेल्या असीम मुनीर यांच्या आदेशावर कठपुतळीप्रमाणे वागताना दिसत आहे. अमेरिकेतून आर्थिक मदतीची आशा ठेवण्यासाठी पाकिस्तानने जणू स्वतःचा देशच गहाण टाकला आहे, अशीच आजची स्थिती आहे. युद्धाचे ढोल वाजवले तरच काहीतरी निधी मिळेल, आंतरराष्ट्रीय मदतीचे दरवाजे पुन्हा उघडतील आणि देशातील राजकीय-अराजकीय संकटांकडून जनतेचे लक्ष हटेल, अशी भाबडी अपेक्षा पाकिस्तानचे सैन्य आणि राजकारणी धरून बसले आहेत, पण वास्तव उलटेच आहे. भविष्यात भारताशी झालेल्या कोणत्याही संघर्षाची किंमत पाकिस्तानलाच चुकवावी लागेल. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून त्याची दाहकता पाकिस्तानने अनुभवली आहेच. युद्धात इतर देशांचा कितीही पाठिंबा मिळाला, तरी विनाश मात्र पाकिस्तानी जनतेचाच होणार आहे. युद्धाच्या नावावरचा जिहादी उन्माद, पाकिस्तानला आणखी खोल दरीत ढकलण्याची शक्यता वाढली आहे.
- कौस्तुभ वीरकर