काँग्रेसचा ‌‘मनसे‌’ विरोध

    18-Nov-2025
Total Views |

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चांगलेच वारे वाहत असून, प्रमुख राजकीय पक्षांकडून हालचाली सुरू आहेत. बहुतेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी असा सरळ सामना होईल, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीही बघायला मिळतील. हा भाग वेगळा असला तरी सध्या बिहार निवडणुकीत निर्विवाद यश मिळविलेल्या भाजपसाठी, राज्यात अनुकूल वातावरण आहे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत भाजपला हरवायचेच या इराद्याने निवडणुकांची रणनीती आखणाऱ्या महाविकास आघाडीच्या डब्यांना, राज ठाकरे यांच्या मनसेचे इंजिन लावण्याचा प्रयत्न नाशकात झाला. काँग्रेस, शरद पवार गट, उबाठाबरोबर मनसेच्या नेत्यांनी संयुक्त बैठक घेत, पत्रकार परिषदेचा घाटही घातला. पण, नेमकी माशी शिंकली आणि ऐन रंगात आलेल्या बैठकीतून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना निघण्याच्या सूचना देत, मनसेपासून चार हात लांब राहण्यास सांगण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना, बिहारच्या विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करण्यात आले. पण, तेथील मतदारांनी महागठबंधनला साफ नाकारत पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी दिली.

बिहारचे कारण देत काँग्रेसने दोन हात लांब राहणे त्यांच्यादृष्टीने योग्य असले, तरी नाशिकमध्ये निश्चितच राजकीयदृष्ट्या व्यवहार्ह नाही. येथे काँग्रेस पक्ष प्रमाणापेक्षा अधिक क्षीण झालेला आहे. शहरात काँग्रेसचे पदाधिकारी शोधण्यासाठी दिवसाढवळ्याही विजेऱ्या घ्यावा लागतात. तरीही त्यांनी मनसेसोबत जाण्यास नाक मुरडावे, एवढे 100 हत्तींचे बळ काँग्रेस नेतृत्वात कोठून येते, हे देवच जाणो. काँग्रेस हे जळते घर असल्याचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेच आहे. त्याचाच अनुभव राज्यात उद्धव ठाकरे यांनी घेतला असून, आपल्या पूर्ण पक्षाचीही वाताहत करून घेतली. ठाकरेंपाठोपाठ 15 वर्षे सत्तेची फळे चाखणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही वाताहत झाली. आता राजकीय पटलावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने तग धरून राहिलेल्या मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरेही त्याच मार्गाने निघाले असून, काँग्रेसने मनसेला विरोध करावा इतकी वाईट परिस्थिती मनसेची शहराततरी नाही.

बिबटे दिसतात, मविआ नाही!

नाशिक तसे वर्षभर हिरवेगार आणि थंड असलेला भाग. सभोवताली चौफेर डोंगर असल्याने अनेकांना नाशिकची भुरळ पडते. एकदा नाशकात येणारा पुन्हा परत जाण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून जंगली श्वापदांनाही नाशिकची चांगलीच भुरळ पडली असून, शहराच्या कोणत्याही भागात दिवसा-ढवळ्या बिबट्यांचा मुक्त संचार दिसून येतो. दोन-चार दिवसांमागे रहिवासी भागात घुसलेल्या बिबट्याने असा काही उच्छाद मांडला की, त्याला पकडताना नाशिककरांच्या नाकीनऊ आले. अनेकांना जखमी करत, वनविभागाच्या दोन कर्माचाऱ्यांनाही त्याने चांगलेच घायाळ केल्याने थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नाशकात दर्शन दिलेल्या बिबट्याने काही काळासाठी राजकीय गप्पांना विराम दिला असला, तरी माध्यमांत महायुती आणि बिबटे यांनीच सर्वाधिक जागा व्यापल्याचे दिसून येईल. कधीतरी मधूनच एखादी बातमी महाविकास आघाडीची दिसेल, त्यातही पक्ष सोडणाऱ्या बातम्याच अधिक दिसतील.

नाशिकचे खा. राजाभाऊ वाजे यांच्या काकांनीही भाजपवासी होण्यातच धन्यता मानली आहे. मधल्या काळात मविआच्या खांद्याला खांदा लावून मनसेला उभे करण्याचा प्रयत्न झाला पण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बिहार निवडणुकीचे कारण पुढे करत तोही हाणून पाडला. माध्यमांमध्ये पहिल्या मथळ्याची बातमी होईल, लक्षात राहील अशी कोणतीही हालचाल महाविकास आघाडीच्या गोटात झाल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळेच महायुतीच्या झंझावातापुढे आपले राजकीय अस्तित्व शाबूत राहावे, यासाठी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमधील एकेक मोहरा संधी मिळताच, महायुतीच्या गोटात डेरेदाखल होताना दिसत आहेत. जसजसा महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, तसतसा महाविकास आघाडीत शहरासह जिल्ह्यात गळतीला अजून सुरुवात होईल, असे राजकीय जाणकार शपथेवर सांगत आहेत. एकूण महाविकास आघाडीचे दिवस कठीण आहेत. त्यामुळेच नाशकात बिबट्यांची चर्चा होते आहे, पण महाविकास आघाडीची होत नाही असा विनोद नव्याने प्रचलित नाही झाला, तरच नवल म्हणावे लागेल.

- विराम गांगुर्डे