मनातील भावना जेव्हा तीव्र, उत्कट होतात, तेव्हा स्वरूप आवेगांमध्ये बदलते. हे आवेग तीव्र (Intense) असतात. त्यांवर नियंत्रण आणणे सोपे नसते. भावनांची उत्कटता ही सकारात्मकही असू शकते. पण, बहुतांशी वेळेस या उत्कट वेगांमुळे नकारात्मक कृती, विचार उत्पन्न होतात, ज्यांचा स्वतःला व इतरांना त्रासच होतो. अशीच एका भावना म्हणजे क्रोध. हा क्रोध केवळ मानसिक, भावनिक स्वास्थ्यासाठीच वाईट असतो असे नव्हे, तर त्याचे शरीरावरही दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे या क्रोधाची नेमकी कारणे आणि त्याचे दुष्परिणाम या सगळ्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
क्रोध हा एक मानसदोष आहे आणि ही भावना मनुष्य सर्वाधिक अनुभवतो. राग आणि क्रोध यांच्या तीव्रतेमध्ये फरक असतो. अतिप्रमाणात राग-संताप म्हणजे ‘क्रोध’ असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. या क्रोधामुळे त्या क्रुद्ध व्यक्तीमध्ये शारीरिक व मानसिक बदल तर होतातच, पण त्या क्षणी स्वभाव, सदसद्विवेक, विचारपूर्वक कृती इ.मध्येही बिघाड, ऱ्हास होताना दिसतो.
क्रोधाची चरकसंहितेतील व्याख्या पुढीलप्रमाणे आहे, ‘प्रद्वेषो येन प्रज्वलीतम् इव आत्मनाम् मन्येत|’ म्हणजे द्वेष (जो खूप प्रखर स्वरूपाचा आहे) याने (grudge) हेवा/मत्सर (jealousy) उत्पन्न होते. प्रखर द्वेषामुळे ज्वाला पेटाव्या/वणवा लागावा तशी उत्कट भावना मनात उत्पन्न होते. ती उत्कट भावना, आवेग म्हणजे ‘क्रोध.’ या उत्कट स्वरूपामध्ये ती व्यक्ती क्रोधाग्निमध्ये स्वतः जळते व त्यातूनच आक्रमकता उत्पन्न होते. ही आक्रमकता कायिक, शाब्दिक/वाचिक किंवा मानसिक असू शकते. ज्यामुळे ती व्यक्ती टोकाची भूमिका/निर्णय घेते. हा निर्णय स्वतःसाठी किंवा इतरांसाठी त्रासदायक आणि घातक ठरू शकतो. क्रोध अशी एक भावना आहे, ज्यामुळे विद्ध्वंसक वृत्ती उत्पन्न होऊ शकते आणि ज्यात स्वतःला (inner self) इजा करवून घेण्याची क्षमता आहे. यालाच ही उपमा दिली आहे. आगीत जळताना शरीराची लाही लाही होते. तसेच क्रोधामध्ये शरीर-मन-आत्मा यांमध्ये तेवत असलेला अग्नि/धगधगत्या अग्निज्वालामुखीत जळल्यासमान होते. वणवा जसे शेतातील सर्वच जाळून राख करतो, तसाच क्रोधही मनुष्याचे सर्वस्व उद्ध्वस्त करू शकतो; एवढी त्याची क्षमता आहे. रागाचे रुपांतर क्रोधात नेहमी होत नाही. काही वेळेस खोटा रागही असतो किंवा क्षणिक राग असतो. पण, तो लवकर शमतो, आटोक्यात येतो, नियंत्रित करता येतो. पण, वारंवार राग (एकाच कारणामुळे, विषयामुळे परिस्थितीमुळे, व्यक्तीमुळे इ.) धुमसत राहिला, तर त्याचे सदसद्विवेकबुद्धीवर एक झापड आल्यासारखे होते आणि त्या व्यक्तीचे वर्तनच बदलून जाते. हा क्रोध आधी आतल्या आत धुमसत राहतो, नंतर त्याची वाच्यता होते. शाब्दिक कटु उद्गार बोलले जातात. समोरच्या व्यक्तीशी अपमानास्पद वागणूक, पाणउतारा, बदनामी केली जाते. पण, काही वेळेस क्रोधाची तीव्रता इतकी असते की, केवळ शाब्दिक आग ओतून पुरत नाही. अशा वेळेस शारीरिक इजा व हिंसा (स्वतःला, वस्तूंवर, इतर प्राणीमात्र/व्यक्तींवर) केली जाते. रागासाठी/क्रोधासाठी कारण जर एकच असेल, तर त्याच्या विचारानेही ठिणगी पेटल्यासारखी मनात भावना उत्पन्न होते. या भावनांचा वारंवार उद्रेक झाला, तर मनुष्य तडकाफडकी, विद्ध्वंसक वागू लागतो. काही वेळेस ही ठिणगी क्षुल्लक कारणानेही पेटू शकते. उदा. ट्रेनमधील प्रवासांमधील भांडण, रोडरेज, गुण कमी मिळाले. अपयश/चोरी/खोटं बोलल्याबद्दल राग. असे बरेचदा घडते की, मन आधीच अशांत असते, कुठलातरी तणाव निर्माण करणारा विषय डोक्यात सुरू असतो आणि त्या वेळेस इतर काहीतरी ठिणगी पडली, तर ज्वाळा भडकायला वेळ नाही लागत. अशा वेळेस मनावर, विचारांवर नियंत्रण प्रस्थापित करणे खूप कठीण होते. म्हणूनच असे म्हटले जाते की, भावना नियंत्रित करता येतात, मानसिक वेग नियंत्रित करणे सोपे नाही.
क्रोध हा नेहमी वाईट नसतो. क्रोधातही थोडी सकारात्मकता आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी, उत्तम कामगिरी फत्ते करण्यासाठी, स्वयंप्रेरणेसाठी (self motivation), भीतीवर मात करण्यासाठी, स्वतःचे संरक्षण, बचाव करण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती असताना, मन खचलेले असताना, मनाला उभारी देण्यासाठी आत्मविश्वास कमी असल्यास तो वाढविण्यासाठीदेखील क्रोधाचा आधार घेतल्यास फायदा होतो, उपयोग होतो. साशंक मन, स्वतःमधील नकारात्मकता घालविण्यासाठी रागाचा-क्रोधाचा आधार घ्यावा लागतो. ही क्रोधाची सकारात्मक बाजू आहे आणि ही ऊर्जा नीट वापरली, Channelize केली, तर त्याचे हे सकारात्मक रूप वारंवार दैनंदिन जीवनात अमलात आणता येतात.
क्रोधामुळे व्यक्तीचे पर्सेप्शन- बघण्याचा दृष्टिकोन, आकलनशक्तीही बिघडते. तर्कशुद्ध विचार करण्यास ती व्यक्ती सक्षम राहात नाही. परिणामी, ती व्यक्ती आक्रमक वृत्तीची होऊ शकते, हिंसा करू शकते. मानवी स्वभाव सोडून पशुप्रवृत्ती प्रवृत्त होऊ लागतात. या क्रोधाचा फक्त मनावर-विचारांवर परिणाम होतो, असे नाही. शरीराच्या विविध संस्थानांवर (Systems)वरही त्याचा अनिष्ट परिणाम होतो. हृदयाची गती तीव्र होते, रक्तचाप (Blood Pressure) अचानक वाढू शकते, रक्तशर्करा (Blood Sugar) वाढू शकते, ADRENALIN नामक हार्मोनचा शरीरात स्राव वाढतो, प्रमाण वाढते. याने मन अधिक सजग होते आणि भांडायला, लढायला तयार होते. (तेवढी शारीरिक ताकद नसेल तर उसने अवसान येते) याचा भयानक परिणाम होऊ शकतो. क्रोध आलेला असताना पित्ताचे विकृत, अनैसर्गिक (Abnormal) कार्य घडू लागते. चेहऱ्यावर रक्तपुरवठा वाढतो, घाम अतिप्रमाणात येऊ लागतो. अंगाचे/शरीराचे तापमान वाढते. तहान-भूक हरपते. हृदयाचे ठोके अधिक प्रमाणात व जोरात पडतात. याचा परिणाम आहार-पचनावर व शांत निद्रेवर होताना दिसतो. (पचनशक्ती बिघडते, Quality of sleep disturb होते.) असे वारंवार होऊ लागल्यास वजन झपाट्याने कमी होऊ लागते. पचन व पोटाची गति (Motility) यामध्ये बदल घडून येतो.
अशा वेळेस रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होऊ लागते आणि ही व्यक्ती क्षुल्लक कारणाने सारखी आजारी पडू लागते. क्रोध (आधी म्हटल्याप्रमाणे) दर वेळेस फक्त शारीरिक प्रकटीकरणातून व्यक्त केले जात नाही. काही वेळेस शाब्दिक, तर काही वेळेस मानसिकरित्याही व्यक्त केले जाते. वरील शारीरिक परिणाम या तिन्ही प्रकारच्या क्रोधामध्ये घडतो.
शारीरिक विविध व्याधींमुळे क्रोध हा मूळ हेतू/कारण असू शकते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. उदा. क्रोधामुळे पित्ताचार हा प्रकोप होतो. म्हणजेच, पित्ताची दुष्टी झाल्याने पित्तामुळे होणाऱ्या विविध व्याधी उत्पन्न होऊ लागतात. पित्ताचा आणि रक्ताचा आश्रय-आश्रयी नातं आहे, भाव आहे. पित्ताच्या कोपामुळे रक्तातही दुष्टी उत्पन्न होते आणि रक्तातील विविध व्याधी बळावू लागतात. त्याचबरोबर स्वेदवह स्रोत (स्वेदाच्या निर्मिती, कार्य आणि विनाश ज्या संस्थेच्या रचनेद्वारे होते, ते स्वेदवह स्रोतस होय)ही बिघडते आणि त्याचे कार्य बिघडते/बाधा येते. क्रोधामुळे तापाचा उपप्रकार (ज्याला पित्तज ज्वर म्हणतात), तो उत्पन्न होऊ शकतो. तसेच क्रोधज ज्वरही उत्पन्न होऊ शकतो. विविध व्याधींच्या हेतू (उत्पन्न होण्याचे कारण) मध्ये क्रोध हा हेतू आयुर्वेदांत सांगितला आहे. तसेच केवळ कारण नाही, तर व्याधीच्या लक्षणांमध्ये, अपश्यामध्ये क्रोधाचा उल्लेख/संदर्भ आहे. याबद्दल पुढील लेखात सविस्तर वाचू. (क्रमशः)
- वैद्य किर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429
vaidyakirti.deo@gmail.com