पेशवा बाजीरावांच्या सत्यासाठी!

18 Nov 2025 12:03:48

पेशवा बाजीरावांच्या नावाने समाजात दुही माजवली जाते, खोटा इतिहास सांगितला जातो. याविरोधात वैचारिक चळवळ उभी करणाऱ्या जगन्नाथ लडकत यांच्या विचारकार्याविषयी...

पेशव्यांचा खरा धर्माभिमानी आणि समाजरक्षक हा इतिहास जगासमोर यावा, यासाठी जगन्नाथ लडकत प्रचंड मेहनत घेत होते. त्यांनी सारसबागेच्या गणपतीसमोर शपथ घेतली होती की, पेशवा बाजीरावांचा खरा इतिहास ते एक लाख तरुणांसमोर मांडतील. कारण, त्यांच्या अभ्यासानुसार त्यांचा असा निष्कर्ष होता की, पेशव्यांच्या नावाने आपल्या महाराष्ट्रात दोन समाजांत तेढ निर्माण केली जात आहे. पेशवा ब्राह्मण होते आणि ते इतर समाजावर अत्याचार करत होते, असे लोकांच्या मनात बिंबवले जात आहे. पण हे सगळे खोटेच होते.

घेतलेल्या शपथेप्रमाणे जगन्नाथ आज महाराष्ट्रभर बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व सांगत आहेत. त्यातून सर्व समाजाची एक असलेली धर्म, संस्कृती आणि इतिहास यांची मांडणीही ते करतात. हे सगळे करतानाच, प्रत्यक्ष पेशव्यांच्या स्मृतींनी पावन झालेल्या धर्मस्थळांचे विश्वस्त व्हाल का? असे समोरून पेशव्यांचेच वंशज आपल्याला कधी विचारतील, याचा विचारही जगन्नाथ यांनी केला नव्हता. पण, तो दिवस उजाडला. ‌‘तुम्ही सारसबागेत या लगेच‌’ असा निरोप डॉ. विनायक विश्वनाथ तथा उदयसिंह पेशवे यांनी जगन्नाथ यांना दिला. मिळालेल्या निरोपाप्रमाणे जगन्नाथ सारसबागेत गेले. तिथे उदयसिंह पेशवा म्हणाले, “तुम्ही श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पर्वती व कोथरूडचे विश्वस्त व्हावे”, अशी त्यांची इच्छा आहे. उदयसिंह पेशवा यांनी दिलेल्या या प्रस्तावाला, जगन्नाथ यांनी मान्यता दिली. आज या देवस्थानाच्या पाच विश्वस्तांपैकी, जगन्नाथ लडकत हे एक विश्वस्त आहेत.

या देवस्थानाच्या अंतर्गत पर्वती देवदेवेश्वर मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, विष्णू मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, रमणा गणपती मंदिर, सारसबाग गणपती मंदिर, काळी जोगेश्वरी मंदिर, प्रभू राम मंदिर, पौड फाटा येथील दशभुजा गणपती मंदिर, कोथरूड येथील श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, सासवड येथील बाळाजी भट (पहिले पेशवा) यांची समाधी, अशा धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्थळांची जबाबदारी आहे. या सगळ्यांची देखरेख नियोजन त्यांच्या देवस्थांनामार्फत केले जाते.

जगन्नाथ यांनी कला शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, ‌‘सहकारिते‌’मध्ये त्यांनी उच्चशिक्षणही घेतले आहे. हिंदी भाषेच्या पंडित पदवीपर्यंत त्यांनी भाषेचा अभ्यास केला असून, ज्योतिषशास्त्रातही ते पारंगत आहेत. त्यांच्याकडे ऐतिहासिक आणि ज्योतिष विषयाचा एकूण तीन हजारांवर पुस्तकांचा संग्रह तर आहेच, त्याचप्रमाणे त्यांचा लोकसंग्रहही दांडगा आहे. याला कारण त्यांची ज्योतिषशास्त्रातली सिद्धहस्तता आणि त्यांनी या क्षेत्रात कमावलेले प्राविण्य.

माळी समाजाचे लडकत कुटुंब मूळचे पुण्याचेच. कोंडिबा लडकत आणि जानकी लडकत यांचे सुपुत्र जगन्नाथ. जगन्नाथ य़ांचे वडील कोंडिबा हे ‌‘पीएमटी‌’मध्ये कामाला होते, तर जानकीबाई गृहिणी होत्या. कोंडिबा हे रा. स्व. संघाच्या शाखेत जात. ते संघाचे स्वयंसेवक होते. त्यामुळे घरात राष्ट्रनिष्ठा, समाजभान याचे संस्कार, आपसुकच जगन्नाथ यांच्यावर झाले. मुलांनी खूप शिकावे अशी लडकत कुटुंबीयांची इच्छा होती. समाजातील चारचौघांसारखचे त्यांच्या कुटुंबाचे जगणे होते. जगन्नाथ लहानपणापासूनच हुशार विद्याथ. खूप शिकण्याची आईवडिलांची इच्छा आपण इच्छा पूर्ण करायची, हा ध्यास जगन्नाथ यांनी घेतला. त्यांना वाचनाचीही आवड होतीच. पुढे जुनी अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर, जगन्नाथ यांना बँकेत नोकरी लागली. त्यानंतरही त्यांनी शिक्षण सुरुच ठेवत, पदव्युत्तर शिक्षण घेत जनरल मॅनेजरपदावर कार्यरत झाले.

पण याचकाळात पुण्याच्या सामाजिक जीवनात होत असलेला बदल जगन्नाथ अनुभवत होते. हे नक्की काय आहे? हा विचार त्यांच्या मनात येई. त्यातूनच त्यांनी या सगळ्या प्रकाराचा ऐतिहासिक धांडोळा घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना पेशवा बाजीराव आणि तत्कालीन समाजजीवन उलगडत गेले. पेशवा आणि इतर समाज एकमेकांचे वैरी नव्हते, तर सगळा समाच धर्मासाठी एकवटून संघर्ष करत होता हे त्यांना कळले. हे सत्य लोकांना सांगण्याची गरज भासली. त्यासाठी त्यांनी अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई, या विषयांवर व्याख्याने द्यायला सुरुवात केली. ते सांगतात, “बाजीराव पेशवे धर्म आणि संस्कृतीसाठी 40 लढाया लढले. या सर्व लढाया ते जिंकले. त्यामुळे बाजीराव पेशव्यांना अय्याशीसाठी उसंतच नव्हती. तसेच मस्तानी बाईसाहेब या राजा छत्रसालच्या कन्या होत्या आणि पेशवा बाजीराव यांच्यासोबत त्यांचा विधिवत विवाह झाला होता. दुर्दैवाने या लढवय्या कर्तृत्ववान पेशव्यांच्या नावावर जे नाही तेच आज बोलले जात आहे. हा त्यांचाच नव्हे, तर आपल्या इतिहासाचाही अपमान आहे.”

ऐतिहासिक संदर्भ तसेच, ज्योतिषी सल्ला यांसंदर्भात त्यांचा संबंध अनेक मान्यवरांशी आला. त्यांचे ऋणानुबंध जुळले ते श्रीकांत जिचकर यांच्याशी. जिचकर यांच्याकडे असलेली 50 हजार पुस्तके पाहून, जगन्नाथ यांनीही पाच हजार पुस्तके तरी विकत घेऊन वाचण्याचे ठरवले. या पुस्तकातील ज्ञान समाजापर्यंत पोहोचवत समाजाचे ऐक्य साधण्यासाठी, त्यांनी आजवर तीन हजार पुस्तकांचा संग्रह केला आहे. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाजातील अंतर मिटवून, त्यांच्यात समरसभाव निर्माण करणारे जगन्नाथ लडकत यांचे कार्य समाजासाठी आवश्यक आहे. त्यांच्या कार्याला दै.‌’मुंबई तरुण भारत‌’च्या हार्दिक शुभेच्छा!

9594969638

Powered By Sangraha 9.0