मासेमारीच्या ‘कुटा’चे करायचे काय?

    17-Nov-2025
Total Views |
Fishing
 
या लेखाच्या माध्यमातून मत्सव्यवस्थापन आणि नियोजन शाखेतील एका व्यापक शास्त्रीय गोष्टीची माहिती देण्यात आली आहे, ती म्हणजे ‘बायकॅच’ अर्थात ‘कुटा’.
 
मासेमारी करून जगातील खूप छोटा समाजघटक हा जगभरातील फार मोठ्या समाजघटकाची अन्नपूर्ती करतो. परंतु, आज आधुनिक पद्धतीची यंत्र, तंत्र आणि व्यापारनीती आणि औद्योगिकीकरणाची सांगड घालून मासेमारी केली जाते. त्यामुळे मासेमारी ही एखाद्या समाजघटकाची शान वा मान न राहता अमर्याद व्यापारनीतीचे धोरण बनले आहे. मासेमारी करण्याची पद्धत पारंपरिक असो वा आधुनिक परंतु मासेमारी करताना काही गोष्टी या सर्वसामाईक असतात. ज्या मत्सप्रजातीला ध्यानात घेऊन आपण मासेमारी करतो, त्याला ‘टार्गेट फिशिंग’ म्हणजेच ‘ध्येय निश्चित प्रजातीला अनुरूप मासेमारी’ म्हणतात मात्र, हे करताना काही मासे वा इतर सागरी जीव हे गरज नसताना जाणीवपूर्वक वा अनवधानाने पकडले जातात.
 
या सर्व सागरी जीवांना ‘फिशरीज बायकॅच’ म्हणजेच ‘ध्येय निश्चित नसलेल्या मत्स वा सागरी प्रजाती’ म्हणतात. ‘फिशरीज टार्गेट कॅच’ आणि ‘फिशरीज बायकॅच’ या दोन शब्दांना योग्य पर्यायी शब्द तूर्तास मला अजून सापडला नाही आहे. मुरवस्की या मत्सशास्त्रज्ञांच्या एका संशोधन पत्रिकेत ‘फिशरीज बायकॅच’ ही संज्ञा एका वायातून अधोरेखित होते ती म्हणजे, 'Yesterday's bycatch may be tomorrow's target catch.'सोप्या शब्दात जे मासे आपणास मासेमारी करताना पकडायचे नसतात, परंतु आपण जे पकडतो, ते मासेच येणार्‍या काळात पोट भरण्यासाठी आणि आपली रोजी चालवण्यासाठी उपयुक्त ठरणारे असतात.
 
"का रं दादा? आज काय साथ (टार्गेट कॅच) होती डोलीला?” "काय नं दोन पाटके होती साथ; पण नुसता कुटा (बायकॅच) आणि पाला होता आज.” मुरुड तालुयातील माझ्या ज्या गावी मासळी बाजार भरतो, तिकडे हा संवाद मी बालपणापासून ऐकत आहे. फरक फक्त एवढाच पडला आहे की, माझ्या बालपणी म्हणजे १९९०-२००० पर्यंत ‘साथ’ अर्थात ‘टार्गेट कॅच’ ही जास्त असायची आणि ‘कुटा’ म्हणजे ‘बायकॅच’ ही तुलनात्मकरित्या कमी असायची. आजच्या घडीला म्हणजे २०१५ नंतर ‘कुटा’ जास्त आणि ‘साथ’ कमी आणि जोडीला प्लास्टिक आणि कचरा हा डोलीच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात सापडतो. १९९० ते २००० या दहा वर्षांत आणि त्याआधी आपल्या इथे भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात मासेमारी हा एक पारंपरिक व्यवसाय आणि काही मासेमारी समाज जसे की (कोळी, आगरी, वैती, मांगेला, वाघरी इ.) समाजघटक करत होते. ही मासेमारी मुख्यतः दैनंदिन गरजेच्या गोष्टीची परिपूर्तता व्हावी आणि जीवन सुखकर व्हावे, यासाठी होत होती.
 
यामुळे मासेमारी समाज आणि या समाजातील प्रत्येक घटक हा समाधानी आणि आनंदी जीवन जगत होता. परंतु १९९० नंतर हळूहळू मासेमारी ही एक परंपरा न राहता, व्यापारी आणि विदेशनीतीचे हत्यार झाले. फिश फायंडिंग मशीन आणि छोट्या आसाची जाळी यामुळे पूर्वी पकडणे शय नव्हते, तितया मोठ्या प्रमाणात मासे पकडणे शय झाले. मासे पकडण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या आणि सहकारी संस्था एकत्र येऊ लागल्या. यातून मासे पकडणे ही पोटाची भूक भागवणे इथपर्यंत मर्यादित न राहता, समुद्राचे पोट फाडून जेवढं शय आहे, तितका समुद्र रिता करता येणे शय आहे, असे प्रयत्न चालू झाले. यातूनच सुरुवातीला छोटी दिसणारी ‘बायकॅच’ वा ‘कुटा’ यांचे प्रमाण हळूहळू मोठे विक्राळ रूप धारण करू लागले.
 
‘बायकॅच’ म्हणजेच ‘कुटा’ ही संज्ञा शास्त्रीय पद्धतीने समजून घेणे खूप गरजेचे आहे. 'Bycatch is catch that is either unused or unmanaged' अर्थात जे मासे आपण पकडल्यावर उपयोगी नाही म्हणून गृहीत ठरवतो आणि असे मासे जे योग्य नियोजनाअभावी चुकून पकडले जातात, त्याला ‘बायकॅच’ वा ‘कुटा’ असे म्हणतात बांगलादेश या आपल्या शेजारील राष्ट्रात पकडलेल्या एकूण माशांपैकी शेकडा ९५.७ टक्के मासे हे या ‘बायकॅच’ प्रकारात मोडले जातात.
 
जर या प्रमाणाची व्याप्ती आपण लक्षात घेतली, तर आपण समजू शकतो की किती मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचे आपण नियोजनशून्यतेमुळे नुकसान करत आहोत. एकूण पकडलेल्या मत्स्यसाठ्यापैकी जर ९० टक्क्यांहून अधिक मासे हे खाण्यायोग्य आकारापेक्षा लहान आहेत किंवा आपण ज्यांना भविष्यात उपयोगात आणू शकतो, अशा मोठ्या सागरी मत्स्यप्रजातींचे पिल्ले वा अंडी असतील, तर आपलं भविष्य किती अंधारात आहे. याउलट कॅनडा या प्रगत राष्ट्राकडे पहिले, तर हे प्रमाण शेकडा ८.१ टक्के इतके नगण्य आहे. योग्य पद्धतीचे मत्स्यसाठे पकडणे याबद्दल प्रशिक्षण तसेच नियमांची योग्य अंमलबजावणी आणि मत्स्यसंवर्धन पूरक शासकीय मत्स्यधोरण यामुळे हे तिकडे शय झाले आहे.
 
आपण आपल्या देशाचा विचार केला, तर आपल्या येथील हे प्रमाणदेखील चिंताजनक आहे. शेकडा ५६.३ टक्के हे प्रमाण आपल्या इथे नोंदवले गेले आहे. म्हणजे आपण सर्व मिळून या देशात जितके मासे पकडतो, त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक मासे आपण फुकट घालवत आहोत. मासेमारी व्यवसायात आता काही उरले नाही, अशी ओरड जी सध्या आपण ऐकतो, त्यातील एक न दिसणारी बाब म्हणजे ही गोष्ट. आपण ज्या कोणत्याही मासे पकडण्याच्या पद्धतीने मासे पकडतो, मग ते डोल, रापण, धरण असो की पर्सनेट असो, जाळ्याचा शेवटी आपला जो आस असतो, म्हणजे जाळ्याचा आकार हा साधारण त्या ठराविक राज्य आणि जिल्हानुसार निर्धरित केल्याप्रमाणे असायला हवा.
 
जसे की कोणत्याही यांत्रिक पद्धतीने मासेमारी करणारी ट्रॉलर जी ठाणे, बृहन्मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या अंतर्गत येणार्‍या सागरी मासेमारी भागात आहे, त्यांनी ३५ मिमीपेक्षा कमी आस असलेले मासेमारीचे जाळे वापरू नये. रत्नागिरी जिल्हा सागरी क्षेत्रासाठी ही मर्यादा २५ मिमीपेक्षा कमी नसावी, अशी आहे. विशिष्ट प्रदेशातील सागरी भूभाग आणि समुद्राच्या अंतर्गत असणार्‍या रचनेवरून ही मापे निश्चित केली गेली आहेत. असे झाले, तरच जाळ्यात अडकणारे छोटे मासे आणि इतर निरुपद्रवी जीव म्हणजे कासवे आणि सस्तन प्राणी यांची सुटका करणे शय आहे. जाळ्याची आस जर छोटी असेल, तर आपल्याला एकूण मासे किंवा कोळीभाषेत ‘साथ’ ही जास्त मिळेल.
 
- प्रदीप चोगले 
(लेखक ’वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’मध्ये सागरी संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)