अनिष्ट प्रथांना छेद देणारा अवलिया

17 Nov 2025 10:22:41

Pandurang Ghuge
 
समाजातील अनिष्ट रुढी व परंपरा यांना छेद देण्यासाठी सामाजिक कार्याची धुरा हाती घेणार्‍या, निवृत्त ‘पीएसआय’ निवृत्ती पांडुरंग घुगे यांच्याविषयी...
 
निवृत्ती यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. ते मूळचे नाशिकमधील सिन्नर तालुयातील पिंपळे या गावचे. त्यांची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. सर्व काही पावसावरच अवलंबून असल्याने, पाऊस चांगला झाला, तरच शेतात चांगली पिके येत होती. शेतात काही पिकले, तर उदरनिर्वाहाची फारशी चिंता नव्हती. पण पाऊस झाला नाही, तर पोटाची खळगी कशी भरायची? ही चिंता वडिलांना सतावत असे. निवृत्ती यांचे वडील पांडुरंग हे शेती करत, तर आई सखुबाई ही त्यांना शेतीच्या कामात मदत करत असे.
 
घरच्या गरीब परिस्थितीमुळे निवृत्ती यांचे शिक्षण जेमतेमच झाले. निवृत्ती हे भावंडांमध्ये थोरले असल्याने, दोन भाऊ व एक बहीण यांची जबाबदारीही त्यांच्यावरच होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळे या गावातच झाले. पाचवी ते सातवीचे शिक्षण, हे गावापासून सहा ते सात किमी अंतरावर असलेल्या हिवरे या गावी झाले. त्यासाठी त्यांना रोज पायी प्रवास करून शाळेत जावे लागे. त्यांचे आठवी ते दहावीचे शिक्षण हे मूळ गावापासून नऊ ते दहा किमी अंतरावर असलेल्या दापूर गावात झाले. निवृत्ती दररोज नऊ ते दहा किमी पायी चालत जात. पण त्यांनी शिक्षणाची साथ कधीही सोडली नाही. खडतर परिस्थितीतही त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चयच मनाशी केला.
 
आर्थिक परिस्थितीमुळे, शाळेच्या गणवेशासाठीही वडिलांकडे हट्ट करावा लागत असे. पण निवृत्ती यांचे हट्ट आईच अनेकदा पूर्ण करायची. खडतर परिस्थितीत शिकून, १९८५ साली निवृत्ती दहावी उत्तीर्ण झाले. पुढचे शिक्षण परिस्थितीमुळे घेता येणे शयच नव्हते. त्यातच उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम पाहणेही गरजेचे झाले होते. दहावीनंतर काहीतरी काम मिळेल, या उद्देशाने नातेवाईक निवृत्ती यांना घेऊन मुंबईत आले. पण, मुंबईत येऊनही त्यांना विशेष असे काही काम मिळाले नाही. शेवटी त्यांनी बसवर लिनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या कामातून जे पैसे मिळत होते, त्यातून निवृत्ती यांनी आपल्या कुटुंबांची थोडी-फार जबाबदारी उचलली होती.
 
हे काम सुरू असतानाच, एके दिवशी त्यांना पोलीसभरतीची संधी आली. त्यासाठी लागणार्‍या सर्व आवश्यक चाचण्या व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, निवृत्ती पोलीस कॉन्स्टेबलपदावर रूजू झाले. १९८६ साली पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झालेल्या निवृत्ती यांना, त्याकाळात ८०० रु. वेतन मिळत होते. त्यातील ५०० रुपये गावी आईवडिलांना व भावंडाना खर्चासाठी ते देत. त्यातील शिल्ल्क ३०० रुपयातून, महिन्याला १४० रुपयाची दोन वेळची खानावळ देऊन, बाकी पैसे स्वतःला खर्चासाठी ठेवत.
नोकरीत स्थिरावल्यानंतर १९८८ साली निवृत्ती यांची विवाहगाठ, सविता यांच्याशी बांधली गेली. या दांपत्याला तीन मुले आहेत. त्याच्या मोठ्या मुलीने ‘बीई इलेक्ट्रिक’चे शिक्षण घेतले आहे. निवृत्ती यांचे जावई वापीतील ‘पंजान नॅशनल बँके’मध्ये, येथे शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. निवृत्ती यांची दोन्ही मुलेही उच्च शिक्षित असून, सुनादेखील उच्च शिक्षित आहेत. सध्या त्यांची मुले, मुंबई येथे गव्हर्नमेंट कॉन्ट्रटर म्हणून काम पाहात आहे.
 
निवृत्ती यांनी मुंबई येथे अनेक पोलीस ठाण्यांत सेवा बजावताना, अनेक गुन्ह्यांची उकल केली. निवृत्ती यांना त्यांच्या सेवेसाठी मुंबई कमिशनर ऑफ पोलिस यांच्याकडून, विशेष प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले व अनेक बक्षिसेही मिळाली. ते मुंबई पोलीस दलातून ‘पोलीस उपनिरीक्षक’पदावरून २०२३ साली सेवानिवृत्ती झाले. परंतु, समाजकार्याची आवड असल्यामुळे त्यांनी, कल्याण येथे रामनवमी कार्यक्रम केला. निवृत्ती यांनी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून, साईबाबा मंदिर खडकपाडा, कल्याण येथे मुख्य आयोजक म्हणून काम पाहिले आहे. सदर ठिकाणी सहा ते सात हजार साईभक्त, दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतात. तसेच निवृत्ती ‘अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण’ या संस्थेतही, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी निवृत्ती यांच्यावर वंजारी वधू-वर मंडळांची जबाबदारी दिली आहे.
 
निवृत्ती यांनी ’बांधिलकी’ या वधू-वर परिचय मंडळांची स्थापना करून, संपूर्ण महाराष्ट्रभर नववधू-वरांसाठी विवाह मेळाव्यांचे आयोजनही केले. कोणतेही नाव नोंदणीशुल्क अथवा पालकांकडून कोणताही निधी न घेता, सदर मेळावे मंडळ स्वखर्चाने आयोजित करते. सदर मंडळाकडून आजपर्यंत ५५० ते ५७५ विवाह पार पडले आहेत. समाजात जनजागृती करण्याचे काम निवृत्ती यांनी, संस्थेच्या माध्यमातून केले. समाजात अनिष्ट रुढी व परंपरा आजही चालूच आहेत. त्या प्रथा बंद करण्यासाठी ‘राज्यस्तरीय वंजारी शिखर परिषद’ आयोजित करण्यात येणार आहे. त्या परिषदेला यश येऊन समाजात परिवर्तन व्हावे, हीच निवृत्ती यांची अपेक्षा आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, अशा या हरहुन्नर व्यक्तिमत्त्वाला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0