हिंगोलीतून 'श्रीलंकन पेंटेड फ्रॉग'ची दुर्मीळ नोंद

17 Nov 2025 10:46:37
srilankan painted frog


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
हिंगोलीतून दुर्मीळ श्रीलंकन पेंटेड फ्रॉग या बेडकाच्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे (srilankan painted frog). गवताळ माळरानावरील उभयचर प्राणी सर्वेक्षणादरम्यान अभ्यासकांना बेडकाची ही प्रजात आढळून आली (srilankan painted frog). श्रीलंकन पेंटेड फ्रॉगची महाराष्ट्र राज्यातील ही अधिकृत पाचवी नोंद असेल. (srilankan painted frog)
 
हिंगोलीच्या गवताळ माळरानावर अनिल उरटवाड (कोहकाळ), वनरक्षक गणेश कुरा, आणि अमोल सोनवणे यांनी उभयचरांसदर्भात सर्वेक्षण केले. सोनगाव तालुक्यातील लिंबाळा गावात ३ नोव्हेंबर रोजी रात्री या सर्वेक्षणादरम्यान अभ्यासकांना एक बेडूक निदर्शनास आला. येलदरी धरणाच्या पाणलोटक्षेत्राच्या बाजूला माळरानावर रेती आणि लाल माती असलेल्या आधिवासात हा बेडूक त्यांना सापडला. निरीक्षणाअंती हा बेडूक श्रीलंकन पेंटेड फ्रॉग असल्याचे निदर्शनास आले.
 
श्रीलंका, बांगलादेश, आणि भारताच्या पश्चिम भागात दिसून येणारा दुर्मिळ श्रीलंकन पेंटेड फ्रॉग (युपेरोडॉन टॅप्रोबॅनिकस) परभणीच्या अभ्यासकांना शोधून काढण्यास यश आले. गुजरात,आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र,ओडिसा,मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार आणि आसाम या राज्यात हा बेडूक आढळून येतो. रिप्टाइल्स अँड अँफिबियन्स या नियतकालिकामध्ये या बेडकाच्या नोंदीसंदर्भात शोध निबंध प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील या बेडाकाची ही अधिकृत पाचवी नोंद असेल. वृक्षतोड, शेती आणि शहरीकरणामुळे बेडकांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. शेतीमधील रासायनिक खते कीटकनाशके आणि इतर प्रदूषित घटकामुळे बेडकांच्या जीवन चक्रावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे अनिल उरटवाड यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0